नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला जमीन देणाऱ्या दहा गावांतील प्रकल्पग्रस्तांना या महिनाअखेपर्यंत सिडको साडेबावीस टक्के योजनेतील भूखंड प्रदान करणार आहे. त्यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रकल्पग्रस्तांना अ‍ॅवार्ड देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही संगणकीय सोडत काढली जाणार आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर ही सोडत निघणार आहे. यात एक हजार ३५० प्रकल्पग्रस्त लाभार्थी आहेत.
नवी मुंबईतील विमानतळासाठी एकूण दोन हजार २६२ हेक्टर जमीन लागणार असून दहा गावांतील ६७१ हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी महत्त्वाची आहे. ही जमीन मुख्य रणवेच्या पट्टय़ात येत असल्याने ती मिळाल्याशिवाय हा प्रकल्प पुढे जाऊ शकणार नव्हता. त्यामुळे सिडकोने जाहीर केलेल्या पॅकेजला विरोध करणाऱ्या सहा गावांतील प्रकल्पग्रस्तांची सिडकोने समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. तरीही काही प्रकल्पग्रस्तांनी विरोध कायम ठेवून मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यावेळी न्यायालयाने पॅकेज सर्वोत्तम असल्याचा निर्वाळा दिल्याने प्रकल्पग्रस्तांना जमीन देण्यावाचून पर्याय शिल्लक राहिला नाही. त्यामुळे सहा सप्टेंबपर्यंत ९० टक्के प्रकल्पग्रस्तांनी सिडकोला लेखी संमतीपत्र दिले. शिल् लक दहा टक्के प्रकल्पग्रस्तांचे संमतीपत्र घेण्याचे काम सुरू असून प्रकल्पग्रस्तांनी पॅकेजप्रमाणे साडेबावीस टक्के योजनेतील भूखंड देण्याची तयारी सुरू करण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळणाऱ्या अ‍ॅवार्ड कॉपीची वाट पाहिली जात होती. या प्रकल्पग्रस्तांना नवीन वर्षांत नवीन भूखंडाची भेट देणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी कबूल केले आहे. त्यानुसार सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यावर काम करीत असून एक वेगळे सॉप्टवेअर तयार केले जात आहे. यापूर्वी सिडकोकडे साडेबारा टक्के योजनेचे सॉफ्टवेअर आहे, पण ही योजना देशात पहिल्यांदाच राबविली जात असल्याने त्यासाठी स्वतंत्र सॉप्टवेअर तयार केले जात आहे. त्यानंतर अ‍ॅवार्ड आलेल्या प्रकल्पग्रस्तांची सोडत काढली जाणार आहे. देशातील पहिल्या या सोडतीचा भव्य-दिव्य कार्यक्रम करण्याचा सिडकोचा मानस असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलविले जाणार आहे. पण सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ते व्यस्त होणार असल्याने हे शानदार वितरण अधिवेशनानंतर करण्याचे सिडकोने ठरविले आहे. सोडतीची तयारी झाली असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.मोहन निनावे यांनी स्पष्ट केले.