ऐरोली परिसरात कामानिमित्त येणारा आणि जाणाऱ्या नोकरवर्गाला सार्वजनिक वाहतुकीची सुविधा पुरेशी नसल्याने रिक्षाचा प्रवास करावा लागतो. याचाच फायदा घेत ऐरोली ते मुकंद परिसरातील रिक्षाचालकांनी मनमानीप्रमाणे भाडेवाढ केली आहे. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयालाची मान्यता न घेता बेकायदेशीरपणे भाडय़ात वाढ करण्यात आली असून, त्या आशयाचे फलक रिक्षा स्टॅण्डच्या ठिकाणी लावण्यात आले आहे.
ठाणे- बेलापूर मार्गावरील मुकंद कंपनी ते ऐरोली रेल्वे स्टेशन या उद्योगनगरीतून हजारो चाकरमानी आणि नागरिक रिक्षाने प्रवास करतात. या ठिकाणी आलेल्या कंपन्या आणि प्रवाशांची गरज पाहता रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून मनमानीप्रमाणे भाडे आकारणीचा मागील काही महिन्यांपासून सपाटाच सुरू केला आहे. रिक्षाचालकांनी तीन महिन्यांपूर्वीच मुकंद कंपनी ते ऐरोली रेल्वे स्टेशन या प्रवासासाठी बेकायदेशीरपणे दोन रुपयांनी भाडेवाढ केली होती. त्यातून मोठय़ा प्रमाणावर युनियनने पैसे गोळा केला होता, मात्र आता सीएनजीचे दर वाढल्याचे कारण पुढे करत रिक्षाचालकांनी मनमानी पद्धतीने एक  रुपयांपासून ते तीन रुपयांपर्यंत भाडेवाढ केली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी सकाळच्या वेळेस वाहतूक पोलीस असतानादेखील रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट सुरू असते.
ऐरोली रेल्वे स्थानकांच्या बाहेर शिवसेनाप्रणीत ऐरोली रिक्षाचालक-मालक संघटना आणि इतर दोन राष्ट्रवादीच्या रिक्षा स्टॅण्डवरील रिक्षाचालकांनी या ठिकाणी थेट भाडेवाढीचे फलकच लावले आहे. मॉइड स्पेस, रिलायबल प्लाझा, मुकंद कंपनी येथील जाणाऱ्या चाकरमान्यांना, त्याचबरोबर मुकंदपासून ऐरोलीत जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना या मनमानी भाडेवाढीचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. मुकंद ते ऐरोली एनएनएमटी आणि एसटी सहा रुपये भाडे घेते. रिक्षाचालकांनी याच मार्गावर दुपटीने म्हणजेच १२ रुपये भाडेवाढ केली आहे, तर किमान भाडे सात रुपयांवरून आठ रुपये करण्यात आले आहे.
याबाबत रिक्षाचालक-मालक संघटनेचे उपाध्यक्ष मनोज हळदणकर यांच्याशी संपर्क साधला असता या भाडेवाढीची काहीच माहिती त्यांना नसल्याचे सांगितले. राष्ट्रवादीच्या रिक्षा स्टॅण्डच्या युनियनने ही भाडेवाढ एक बठक घेऊन करण्यात आल्याचे उत्तर दिले आहे. हा निर्णय जरी रिक्षा संघटनांनी घेतला असला तरी या भाडेवाढीबाबत आरटीओने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे मनमानीप्रमाणे भाडेवाढ करून सर्वसामान्य प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षाचालकांना आरटीओ कधी लगाम घालणार, असा जळजळीत सवाल प्रवाशांनी केला आहे. त्याचप्रमाणे हे रिक्षाचालक सर्रासपणे चार ते पाच प्रवासी पोलिसांच्याच आशीर्वादाने एकाच वेळी घेत असल्याचा आरोपही प्रवाशांनी केला आहे.
ऐरोली रेल्वे स्थानकातील दोन रिक्षा स्टॅण्डने आरटीओकडून परवानगी घेतली आहे. मात्र या स्टेशनच्या बाहेर भुयारी मार्गालगत नव्याने राष्ट्रवादीप्रणीत युनियनने रिक्षा स्टॅण्ड बिनधास्तपणे ठोकला आहे. मुकंद आणि माइंड स्पेस येथील रिक्षा स्टॅण्ड विनापरवानाच आहे. याकडे मात्र आरटीओने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

प्रवाशांची या संदर्भात तक्रारी आल्या आहेत. येत्या २४ तासांत संबंधित रिक्षाचालकांवर तपास करून कारवाई करण्यात येईल.
 संजय धायगुडे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई</strong>