बेस्ट उपक्रमाच्या तोटय़ात चाललेल्या परिवहन विभागाला सावरण्यासाठी बेस्टने फेब्रुवारी आणि एप्रिल अशा दोन महिन्यांत भाडेवाढ लागू केल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यातच वातानुकूलित बसगाडय़ांचे भाडे भरमसाट वाढूनही सुविधांच्या नावाने बेस्टचा ‘ठणठण गोपाळ’ असल्याचे दिसत आहे. पोयसर आगारातील एका वातानुकूलित बसमध्ये एका महिलेला दुखापत झाल्यानंतर तिच्यावर प्रथमोपचार करण्यासाठी बसमधील प्रथमोपचार पेटीत औषधेच नसल्याची कबुली खुद्द वाहकानेच दिली.
बोरिवली पश्चिमेकडील पोयसर आगारातील ३८८ क्रमांकाच्या वातानुकूलित बसगाडीत एका महिलेला छोटीशी दुखापत झाली. या महिलेला झालेली दुखापत गंभीर नसल्याने याच बसमधून प्रवास करणाऱ्या राजेश गाडे नावाच्या सहप्रवाशाने बसमधील वाहकाकडे प्रथमोपचारासाठी औषधांची मागणी केली. बेस्टच्या सर्वच बसगाडय़ांमध्ये ही प्रथमोपचार पेटी उपलब्ध असते. मात्र या वातानुकूलित गाडीत असलेल्या प्रथमोपचार पेटीत औषधेच नसल्याचे या वाहकाने सांगितले. हा प्रकार बेफिकीर मनोवृत्तीतून आला असून त्यातून बेस्ट प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार दिसून येतो, अशी टीका गाडे यांनी केली आहे. बेस्टने भरमसाट भाडेवाढ केली आहे.
ही भाडेवाढ सहन करूनही प्रवासी बेस्ट बसमधून प्रवास करतात, त्या वेळी त्यांची बेस्टकडून काही माफक अपेक्षा असते. एखादा मोठा अपघात झाला आणि त्या वेळीही बेस्ट बसमधील ही प्रथमोपचार पेटी रिकामी असेल, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही गाडे यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत बेस्टचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफणे यांच्याशी संपर्क साधला असता, ‘नेमकी कशी जखम झाली होती, ही जखम बेस्टच्या गाडीतच झाली का, त्याबाबतचे काही तपशील आहेत का’, असे असंवेदनशील प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रथमोपचार पेटीतील नसलेल्या औषधांबाबत काहीच सांगितले नाही.