ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेचा उद्या, २७ फेब्रुवारीला शुभारंभ करण्यात येणार आहे. नासिकचे कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि नागपुरातील जोग हॉस्पिटय़ालिटी यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेला मराठी दिन आणि कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सुरुवात करण्यात येणार आहे. रामनगरातील श्रीराम सभागृहातून संध्याकाळी सहा वाजता महेश एलकुंचवार यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होईल.
महाराष्ट्र, दिल्ली व गुजरात या ठिकाणी आजपर्यंत ४५१ ग्रंथ पेटय़ा वितरित झालेल्या आहेत. अंदाजे ८५ लाख रुपयांची एकूण ४५,१०० पुस्तके विविध देणगीदार व कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विनायक रानडे यांच्या प्रयत्नाने असंख्य वाचकांपर्यंत पोहोचवली गेली आहेत. विदर्भातील या योजनेसाठी १३ ग्रंथ पेटय़ांचे वितरण करण्यात येईल. या योजनेसाठी परशुराम अर्बन क्रेडिट को.ऑप. सोसायटी, श्रीराम अर्बन को.ऑप. बँक, हिंदू मुलींची शाळा, श्रीमती जोग आणि गोखले या देणगीदारांचे सहकार्य लाभले आहे. येत्या गुरुवारी सकाळी नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी एक ग्रंथपेटी वितरित करण्यात येणार आहे. तसेच बाबा आमटे शताब्दी वर्षांनिमित्त एक मार्चला सकाळी आनंदवन येथे एक ग्रंथपेटी आणि संध्याकाळी चंद्रपुरातील श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयासाठी एक पेटी दिली जाईल. उर्वरित ग्रंथ पेटय़ांचे वितरण नागपुरातील विविध संस्थांना करण्यात येणार आहे. इच्छुक वाचक व देणगीदार यांनी श्रीराम सभागृहात येत्या २७ फेब्रुवारीला नाव नोंदणी करावी, असे आवाहन विनायक रानडे यांनी केले आहे.