महापालिकेच्या जागेत कोणतीही परवानगी न घेता शेकडो जणांना अनधिकृतपणे ती जागा वाटप केल्याच्या प्रकरणात अखेर महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती संघाचे अध्यक्ष जी. जी. चव्हाण यांच्यासह तीन जणांविरुध्द पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दिंडोरी रस्त्यावरील म्हसोबा वाडीतील अतिक्रमणे महापालिकेने हटविली होती. त्यानंतर चव्हाण यांच्या आवाहनावरून अतिक्रमणधारकांनी पुन्हा त्या जागेवर कच्च्या स्वरुपात घरे उभारली.
म्हसरुळ गावालगतच्या सर्वे क्रमांक २५७ व २५९ मध्ये महापालिकेची २५ एकर जागा आहे. गेल्या काही दिवसांपासून या जागेवर अनधिकृतपणे घर उभारण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी मोफत स्वरुपात जागा दिली जात असल्याची अफवा पसरल्याची चर्चा होती. मागील गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पोलीस बंदोबस्तासह अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली. जवळपास १५० कच्ची घरे जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी स्थानिकांनी विरोध करून पोलीस व पालिका पथकावर दगडफेक केली. इतकेच नव्हे तर, अतिक्रमणधारकांनी पंचवटी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी संघाचे अध्यक्ष चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर अतिक्रमणधारकांनी पुन्हा त्या जागेवर धाव घेऊन कच्ची घरे उभारली. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, अशोक वाघ यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोणतीही परवानगी न घेता पालिकेची जागा १५० ते २०० जणांना चव्हाण, कल्पना पांडे व संजय धुर्वे यांनी वाटप केली. पालवासियांचे नेतृत्व करण्यासाठी प्रोत्साहीत केले.