रेल्वेने प्रवास करताना सर्वसामान्य प्रवाशांना तृतीय पंथियांकडून सर्वाधिक त्रास होत असल्याचे दिसून येते. त्यांनी केलेल्या मागणीनुसार ‘दान’ दिले नाही तर शिव्या खाण्याची तयारी प्रवाशांना ठेवावी लागते. १ एप्रिल २०१३ ते ३० ऑक्टोबर २०१४ या दीड वर्षांच्या कालावधीत प्रवाशांना त्रास देणारे ४१३ तृतीयपंथी पकडण्यात आले व त्यांच्याकडून ४ लाख, १४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तृतीय पंथियांवर नेहमीच कारवाई होत असली तरी त्यांच्या कार्यशैलीत फारसा फरक पडलेल्या दिसून येत नसल्याचे चित्र रेल्वेने प्रवास करताना हमखास दिसून येते.
नागपूर रेल्वे स्थानकाहून दररोज हजारो प्रवाशी प्रवास करीत असतात. १ एप्रिल २०१३ ते १५ ऑक्टोबर २०१४ या कालावधीत नागपूर रेल्वे स्थानकातून १ कोटी ८७ लाख ०७ हजार ३६६ प्रवाशांनी प्रवास केला. त्यांच्याकडून ४१२ कोटी ०५ लाख २५ हजार २१४ रुपयांचा महसूल मिळाला. १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत १ कोटी २० लाख ४७ हजार ६१८ प्रवाशांनी प्रवास केला व त्यांच्याकडून २५७ कोटी ०४ लाख ३६ हजार ८४३ रुपयांचा महसूल मिळाला. तसेच १ एप्रिल २०१४ ते १५ ऑक्टोबर २०१४ या कालावधीत ६६ लाख ५९ हजार ७४८ प्रवाशांनी प्रवास करून त्यांच्याकडून १५५ कोटी ०० लाख, ८८ हजार ३७१ हजार रुपये महसूल मिळाला.
रेल्वेमध्ये महिला व अपंगांसाठीही काही राखीव डबे असतात. काही महाशय अशा राखीव डब्यात जबरदस्तीने घुसून प्रवास करतात. या कालावधीत अशा ८५५ प्रवाशांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्याकडून १ लाख ९२ हजार ८५० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. याच कालावधीत ३८७२ अनधिकृत फेरीवाल्यांना पकडण्यात आले व त्यांच्याकडून ३० लाख ९८ हजार ७८३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अनेक जण आपल्या नातेवाईकांना रेल्वे स्थानकावर सोडून देण्यासाठी येतात. परंतु आपली वाहने पार्किंग झोनमध्ये न ठेवता नो पार्किंग झोनमध्ये ठेवतात. अशा नो पार्किंगमध्ये वाहने ठेवणाऱ्या ८५३ व्यक्तींकडून १ लाख ९७ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये काही माहिती मागितली होती. त्यानुसार मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयातून त्यांना ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली. माल वाहतुकीद्वारे रेल्वेला मोठय़ा प्रमाणात उत्पन्न मिळते. गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत मध्य रेल्वेला १९ कोटी २८ लाख २५ हजार ९१६ रुपयांचा महसूल मिळाला.