ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाच्या १५ विद्यार्थ्यांनी आपल्या समर्थ कलाविष्काराने दारूबंदीच्या निर्णयाचे स्वागत करीत या भिंती बोलक्या केल्या. या भिंतीवर दारूबंदीची चित्रे रेखाटण्यात आली असून या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
आम्ही चंद्रपूरकर, शील नाटय़ पथनाटय़ बहुउद्देशीय संस्था, श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालय, नवरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दारूबंदी ते दारूमुक्ती-बोलक्या भिंती अभियानाचा शुभारंभ ज्युबिली हायस्कूलमध्ये करण्यात आला.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ब्रशने स्वाक्षरी करत अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलिल, सपना मुनगंटीवार, आम्ही चंद्रपूरकर संस्थेच्या अध्यक्ष प्रा.डॉ. जयश्री कापसे गावंडे, ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाचे सदानंद बोरकर, सुशील सहारे यांची उपस्थिती होती.
ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाच्या १५ विद्यार्थ्यांनी आपल्या समर्थ कलाविष्काराने दारूबंदीच्या निर्णयाचे स्वागत करीत या भिंती बोलक्या केल्या. या भिंतीवर बंदीच्या समर्थनार्थ असंख्य बोलकी चित्रे रंगविण्यात आली आहेत. यात महात्मा गांधींचे तीन वानर दारूबंदीचा संदेश देत आहेत. तिन्ही वानर दारू विषयी बोलणार नाही, दारूविषयी ऐकणार नाही व दारूकडे बघणार नाही असे सर्वाना सांगत आहेत. तसेच यात एका गावातील चित्र पेंटींग केले असून एक शेतकरी दूध डेअरीतून दुधाची विक्री करीत आहेत तर बाजूला वाईन शॉप बंद झाले आहे.
अन्य एका चित्रात दारूबंदीनंतरचे दारूमुक्त सुखी कुटुंब दाखविले आहे. दारूबंदीनंतर एक मुलगी बगीचात आनंदाने खेळत आहे, या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेत आम्ही चंद्रपूरकर, शील नाटय़ पथनाटय़ संस्था आणि श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालय या तीन संस्थांनी हाती घेतलेल्या बोलक्या भिंती उपक्रम जनजागृतीच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरावा, असे कौतुकोद्गार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात जिल्हाभरातील शाळकरी विद्यार्थी, महिला व नागरिक सहभागी झाले होते.