चैतन्य काळेचा दुहेरी मुकूट, सना शेखचे एकेरीतील विजेतेपद ही येथील यशवंत व्यायामशाळेच्या मैदानावर नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल संघटनेच्या वतीने आयोजित वरिष्ठ गट जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेची वैशिष्टय़े ठरली. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे जिल्हा प्राथमिक संघाची निवड करण्यात आली असून या संघाचे सराव शिबीर २८ एप्रिल ते पाच मे या कालावधीत होणार आहे. त्यानंतर निवडलेला अंतिम संघ आठ ते १० मे या कालावधीत वर्धा येथे आयोजित १६ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा सचिव आनंद खरे यांनी दिली.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी चैतन्य काळेने हेमंत पाटीलचा २-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. दुहेरीत काळेने चैतन्य दादरच्या साथीने सचिन वाघ-मयूर भावसार जोडीचा १५-११, १५-१३ असा पराभव केला. मुलींमध्ये सना शेखने गायत्री वाघचा १५-९, १५-१० असा दोन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद मिळविले. दुहेरीत मात्र सना शेख व भाग्यश्री सोनावणे यांना धनश्री माळी-पूजा वाघ जोडीने १२-१५, १५-११, १५-१२ असे पराभूत केले. विजेत्यांना उत्तर महाराष्ट्र शिक्षक सेना अध्यक्ष संजय चव्हाण, अशोक दुधारे, अविनाश खैरनार, नितीन हिंगमिरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी चिन्मय देशपांडे, मधुकर देशमुख हेही उपस्थित होते.
त्रिरत्न महोत्सनानिमित्त कुस्ती स्पर्धा
उपनगर येथे बहुउद्देशीय सामाजिक मंच व धिरज पगारे वाचनालय यांच्या वतीने त्रिरत्न महोत्सवानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत आर्टीलरी सेंटर, हैदराबाद, इंदूर, नांदगाव, मनमाड, येवला, त्र्यंबकेश्वर, भगूर परिसरातील मल्लांनी सहभाग घेतला. प्रभाग सभापती प्रा. कुणाल वाघ, पहिलवान अ‍ॅड. गोरख बलकवडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून हिरामण वाघ,  डॉ. भास्कर म्हरसाळे, वाळू नवले, शांताराम बागूल आदी उपस्थित होते.
विजेत्या पहिलवानास ५१ रुपयांपासून पाच हजार एक रुपयांपर्यंतची बक्षिसे देण्यात आली. याशिवाय स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व चषक देण्यात आला. परिसरातील हजारो नागरिकांनी कुस्त्या पाहण्यासाठी गर्दी केली होती. पंच म्हणून संदीप सहाणे, गोरख कासार, तांबोळी यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन वाळू नवले यांनी केले.
नाशिकमध्ये राज्य ब्रीज स्पर्धा
नाशिक जिल्हा ब्रीज संघटना व मित्रविहार क्लब यांच्या वतीने ३५ वी राज्य ब्रीज स्पर्धा नाशिकमध्ये होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विनोद कपूर यांनी दिली. महाराष्ट्र राज्य ब्रीज संघटनेच्या मान्यतेने या स्पर्धा अंबड येथील नाशिक इंजिनिअरींग क्लस्टरमधील वातानुकूलीत सभागृहात एक ते तीन मे या कालाावधीत होणार आहेत. स्पर्धेत यजमान नाशिकसह मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद, वर्धा या ठिकाणचे सुमारे ४० संघ सहभागी होणार असून त्यात हेमा देवरा, विमल सिक्का, अनिल पाध्ये, आनंद सामंत, राजू तोलवाणी यांसारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती स्पर्धा संयोजक सचिव सूर्या रेड्डी यांनी दिली.
एकूण ५३ हजार रुपयांची रोख पारितोषिके व स्मृतीचिन्ह पहिल्या आठ विजेत्यांना दिली जाणार आहेत. स्पर्धा सांघिक व वैयक्तीक जोडी प्रकारात घेतली जाणार आहे. रोज सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० हा स्पर्धेचा वेळ आहे.