ठिकाण मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक. वेळ साधारण सकाळी ११.३० ची.. कुणी बाहेरगावच्या गाडय़ांची प्रतीक्षा करीत होते, तर कुणी गाडी पकडण्याच्या गडबडीत. अन् अचानक ‘लुंगी डान्स’ गीताचे सूर कानी पडले आणि विशी-पंचविशीतील तरुण-तरुणींनी या गीतावर ठेका धरला. गडबडीत असलेल्या प्रवाशांचेही पाय या प्रकारामुळे जागीच थबकले आणि तेही नृत्याविष्कारात सहभागी झाले. निमित्त होते क्षयविषयक जनजागृतीचे.
जागतिक क्षय दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या ‘डी’ विभागातर्फे मुंबईत सेंट्रल रेल्वे स्थानकात – ‘फ्लॅश मॉब’चे आयोजन करण्यात आले होते. रेल्वे प्रशासनाने सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत या ‘फ्लॅश मॉब’ला परवानगी दिली होती पण सकाळी ११ च्या सुमारास रेल्वे स्थानकात फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे नृत्याविष्कार साकारणाऱ्या तरुणाईला अर्धा तास वाट पाहावी लागली. कर्णावती एक्स्प्रेसची वेळ जवळ येताच प्रवाशांची वर्दळ वाढू लागली आणि हीच संधी साधून ११.३० वाजता फ्लॅश मॉब सुरू झाला. पालिकेच्या आरोग्य विभागासाठी काम करणाऱ्या आरती म्हात्रे आणि कोरिओग्राफर विनय म्हात्रे गर्दीत शिरले आणि त्यांनी लुंगी डान्स गीतावर ताल धरला. हळूहळू २५ तरुण-तरुणींनीही प्रवाशांच्या गर्दीतच ताल देण्यास सुरुवात केली. अचानक सुरू झालेला हा नृत्याविष्कार पाहण्यासाठी रेल्वे कर्मचारी व हमाल यांनीही प्रवाशांबरोबर गर्दी केली होती. गाणी संपताच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गर्दीचा ताबा घेतला आणि क्षयरुग्णाची काळजी कशी घ्यावी, क्षयाचा प्रसार होऊ नये यासाठी काय करावे, उपचार कसे करावेत आदींची माहिती प्रवाशांना दिली. या ‘फ्लॅश मॉब’साठी सिद्धार्थ महाविद्यालय व डी. जी. टी. महाविद्यालयाचे विद्यार्थी .आले होते. विनय म्हात्रे यांनी हा नृत्याविष्कार साकारला.