पेंचमधील वाघाच्या स्थानांतरणातील आणखी एक नवा पैलू समोर आला आहे. वाघ पिंजऱ्यात येत नसल्याने त्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात टाकण्याची तयारी पेंच आणि पुण्याच्या चमूने केली. मात्र, या वाघाला बेशुद्ध करण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत यांच्याकडून घेतली नसल्याचे सत्य समोर आले आहे.
सेमिनरी हिल्सवरील पायात रॉड टाकलेल्या वाघाला उपचारासाठी नेण्याकरिता डॉ. चित्रा राऊत यांनी सर्जन भगत यांना परवानगी मागितली. नियमानुसार उपचारात असलेल्या वन्यप्राण्याला बेशुद्ध करायचे असेल तर त्याची परवानगी लागत नाही. तरीही, डॉक्टरांनी परवानगी मागितली म्हणून ती देण्यात आली. वास्तविकतेत अजूनही या वाघावर उपचार झालेले नाहीत. एकीकडे ज्याला परवानगीची गरज नाही, त्या ठिकाणी परवानगी मागण्यात येत आहे. पिंजऱ्यातील वाघाच्या स्थानांतरणासाठी बेशुद्धीकरणाची परवानगी गरजेची आहे, पण येथे अजूनही ती परवानगी घेण्यात आलेली नाही. शनिवारपासून पुण्याच्या कात्रज प्राणिसंग्रहालयाची चमू आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाची चमू या वाघाला पिंजऱ्यात टाकण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, पुणे आणि नागपूर या दोन्ही ठिकाणच्या चमुला वाघ हुलकावणी देत आहे. पेंचमधील हा वाघ आणि इतर दोन वाघिणींना सुरुवातीपासूनच मानवी सहवासापासून दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या बऱ्याचश्या सवयी या जंगलातील वाघांप्रमाणेच आहेत. त्यामुळे मांसाचे आमिष त्या वाघाला दाखवले असले तरीही रात्रीतून तो हे मांस फस्त करून पिंजऱ्यात जात नसेल हे कशावरून, अशीही शंका आता उपस्थित होत आहे.
 गेल्या चार दिवसांपासून या वाघाला पिंजऱ्यात आणण्यासाठी प्रयोगावर प्रयोग सुरू आहेत. वनखात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाघ सहजासहजी पिंजऱ्यात आला नाही, तर त्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात टाकण्याची तयारी दोन्ही चमूने केली आहे. पुण्याहून आलेले डॉ. निघोट व आणखी एका डॉक्टरांची चमू त्याठिकाणी तयार आहे. मात्र, ही सर्व तयारी असली तरीसुद्धा त्यासाठी लागणाऱ्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या परवानगीचे काय, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही ते बोलायला तयार नाहीत. त्यांच्याच कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार अजूनपर्यंत तरी वाघाला बेशुद्ध करण्याची परवानगी मागितली गेली नाही, त्यामुळे विना परवानगी त्याला बेशुद्ध करण्याचा घाट तर या दोन्ही चमूने घातला नाही ना, अशीही शंका आता उपस्थित झाली आहे.