अनेक वर्षांपासून अपूर्ण असलेल्या गोधनी ते कळमना व नागपूर ते कळमना दुसऱ्या रेल्वे मागार्ंची मध्य रेल्वे व दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी रविवारी सकाळी पाहणी केली. त्यानंतर एकत्र बसून चर्चा केली. या चर्चेचा गोषवारा उपलब्ध झाला नसला तरी या दोन्ही प्रकल्पांची पूर्णत्वाकडे वाटचाल वेगाने सुरू झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गोधनी- कळमना कॉर्ड लाईनचे दुहेरीकरण २०१३-४ मध्ये पूर्ण होणार होते. दोन्ही कामे कासवालाही लाजवेल, इतक्या मंद गतीने सुरू आहेत. नोगा फॅक्टरी ते मोहननगर या दरम्यान सहा किलोमीटरचेही काम अपूर्णच आहे. अतिक्रमण हा मुख्य अडथळा असून रेल्वेने ते हटविण्यात राजकीय दबावामुळे रस घेतला नाही. १३.७ किलोमीटरची ही कॉर्ड लाईनमुळे बिलासपूर ते इटारसी दरम्यान मालगाडय़ांचा साडेतीन तास वेळ वाचणार आहे. दुसरी कॉर्ड लाईन नसल्याने बिलासपूरकडून येणाऱ्या मालगाडय़ा नागपूरला येतात. इंजिनची दिशा बदलल्यानंतर त्या इटारसीकडे रवाना होतात. या मार्गाचे केवळ सहा किलोमीटर एवढेच काम झाले आहे. कोराडी येथे औष्णिक वीज केंद्राचा विस्तार सुरू असून तेथे आणखी एक वीज निर्मिती संच उभारला जात आहे. त्यास कोळसा मोठय़ा प्रमाणावर लागणार असून त्यामुळेही गोधनी रेल्वे स्थानक भविष्यात महत्त्वाचे ठरणार आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद व दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नवीन टंडन यांनी रविवारी सकाळी गोधनी- कळमना कॉर्ड लाईन व कळमना-नागपूर दुहेरीकरण या दोन्ही कामांचे प्रत्यक्ष तेथे जाऊन निरीक्षण केले. गोधनी रेल्वे स्थानकावर जाऊनही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर मध्य रेल्वेच्या व्यवस्थापक कार्यालयात जाऊन त्यांनी चर्चा केली. मध्य रेल्वेचे नागपूर मंडळ व्यवस्थापक ओ.पी. सिंह व दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे नागपूर मंडळ व्यवस्थापक आलोक कंसल यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी व्यवस्थापक कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स सव्‍‌र्हिलन्स व ई- अटेंडन्स कम मस्टर प्रणाली तसेच रेल्वे रुग्णालयात एका कार्यशाळेचे उद्घाटन केले.