गणपती व महालक्ष्मी पूजन या दोन सणांच्या आगमनामुळे ऐरवी भाज्यांचे भाव दुपटीने वाढलेले असतात, पण यावेळी बाजारात भाज्या स्वस्त आणि हार-फुलांचे भाव मात्र वाढलेले आहेत. उद्या बुधवारी महालक्ष्मी पूजन असल्यामुळे कॉटेन मार्केटसह विविध बाजारपेठेत भाजी आणि हार-फुले घेण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.
यावर्षी राज्यात अनेक भागात पाऊस नसल्यामुळे त्याचा परिणाम भाज्यावर झाला होता त्यामुळे गेल्या महिन्यापर्यंत भाज्यांचे भाव ६० ते १०० रुपये किलो प्रमाण होते मात्र यावर्षी गणपती आणि महालक्ष्मीमध्ये भाज्यांचे भाव कमी झाले आहे. एरवी महालक्ष्मीसमोर ठेवण्यात येणारे पडवळ एरवी १५ ते २० मिळत असताना आज मात्र ८० ते १५० रुपयाला त्याची विक्री केली जात होती. यावेळी ४० ते ५० रुपयाला त्याची विक्री केली जात आहे. पालेभाज्यांचे भाव कमी झाले आहे. महालक्ष्मीला सोळा भाज्यांचे महत्त्व असल्यामुळे अनेक अनेक लोक वेगवेगळ्या सोळा भाज्या खरेदी करीत असतात. १६ भाजी मिळून एत्रक केलेली भाजी आज ६० रुपये किलो प्रमाणे विक्रीला होती. जूनच्या पहिल्या आठवडय़ापासून विदर्भात पावसाने तोंड लपविल्याने फळ व पालेभाज्यांची आवक घटली असल्यामुळे बहुतेक भाज्या ६० रुपये किलोच्यावर होत्या. त्यामुळे अनेकांच्या घरातील बजेट बिघडले आहे. नागपुरात येणारा भाजीपाला नागपूर जिल्ह्य़ातील आसपासच्या गावातून येत असला तरी आंध्रप्रदेश, नाशिक आणि विदर्भातील अन्य जिल्ह्य़ातून मोठय़ा प्रमाणात येत असतो. यावेळी भाज्यांची आवक वाढली असून त्याचा उठाव मात्र कमी झाल्याचे भाजीविक्रेत्यांनी सांगितले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आवक कमी झाल्यामुळे फुलांचे भाव २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहे. महागाईचा फटका सुगंधी फुलांना पडला असून नागरिकांना तो चढय़ा किमतीमध्ये विकत घेण्याशिवाय पर्याय नाही. महालक्ष्मी पूजनामुळे सीताबर्डीवरील नेताजी मार्केटमधील फुलांच्या बाजारात चिल्लर फुल विक्रेत्यांची आणि नागरिकांची गर्दी दिसून आली. दरवर्षी महालक्ष्मीचा चार हाराचा सेट ४०० ते ५०० रुपयाला मिळत होता. मात्र यावर्षी ७०० ते २००० हजार रुपयापर्यंत बाजारात विक्रीला आहे. मोठय़ा प्रमाणात मागणी असलेली शेवंतीची फुले यावर्षी बाजारात कमी आली त्यामुळे भाव दुप्पट झाले आहेत. साधरणत: महालाक्ष्मीला मोठय़ा प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे शेवंती, गुलाबशिवाय शोभिवंत फुलांची मागणी जास्त असते. यावर्षी पांढरी शेवंती बाजारात कमी आल्याचे फुल विक्रेता संघाचे पदाधिकारी जयंत रणणनवरे यांनी सांगितले.