आपल्या स्वरमाधुर्याने अवघ्या गानविश्वावर अमीट मोहिनी घालणाऱ्या लता मंगेशकर यांच्या ८५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत एका विशेष आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात रविवार २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी हा कार्यक्रम होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या हस्ते लतादीदींचा सन्मान करण्यात येणार आहे. हृदयेश आर्टस व स्वरभारती या संस्थांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही दोन ‘भारतरत्ने’ एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे या सत्कार समारंभासाठी आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर, पं. हृदयनाथ मंगेशकर असे सर्व मंगेशकर कुटुंबीय उपस्थित राहाणार आहेत. हृदयनाथ मंगेशकर यांच्या सांगीतिक कारकीर्दीला ६० वर्षे झाल्याच्या निमित्ताने त्यांचाही सत्कार होणार आहे. लता मंगेशकर यांनी गायलेल्या व हृदयनाथांनी स्वरबद्ध केलेल्या संत मीराबाईंच्या लोकप्रिय रचनांवर आधारित ‘चाला वाही देस’ हा बॅले यावेळी सादर होणार आहे. या बॅलेची संकल्पना आदीनाथ मंगेशकर यांची असून प्रख्यात कथ्थक नृत्यांगना शमा भाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० नृत्यांगना हा बॅले करतील.