मुक्या प्राण्यांना समाजात क्रूरतेने वागवले जाते. त्यांना व्यक्त होता येत नाही. त्यामुळे कोणी कसेही वागवतात. त्यांच्याप्रती सहानुभूती वाटत असल्यानेच आम्हाला पशूंचे डॉक्टर व्हावेसे वाटले, असे आत्मविश्वासाने सांगणारे सात सुवर्णपदकांची मानकरी ठरलेली युनिस जॉर्ज थॉमस आणि दोन सुवर्णपदके पटकावणारा प्रणव चौहान हे दोघेही महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या सातव्या पदवीप्रदान समारंभाचे मुख्य आकर्षण ठरले.
मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेली युनिस तेथील एका खासगी क्लिनिकमध्ये सराव करीत आहे. युनिसने सात सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावून व्यासपीठावरील मान्यवरांबरोबरच सभागृहाची वाहवाही मिळवली. या क्षेत्रातील लिना दलाल तिच्या आदर्श असून प्राण्यांवर वेगवेगळ्या उपचार पद्धती विकसित करण्याबरोबरच याच क्षेत्रात शल्यचिकित्सक म्हणून नाव कमवायचे, अशी तिची मनीषा आहे. युनिसने दहावीत ८७ टक्के आणि बारावीत ८६ टक्के गुण मिळवून माणसांपेक्षा प्राण्यांवर उपचार करून त्यांचा स्नेह संपादन करण्याचे ठरवले आहे. गंमत म्हणजे, तिची आई रोवेना थॉमस हिला प्राण्यांचे वावगे आहे. अंगाखांद्यावर प्राण्यांनी नाचून, बागडून चाटणे तिला आवडत नाही. प्राण्यांचे दूरूनच दर्शन आईला आवडत असले तरी मी केलेल्या कामगिरीचे तिला कौतुक आहे, असे युनिस हसत-हसत सांगत होती. वडील भारतीय रेल्वेत वैद्यकीय अधिकारी आहेत.
पदवीप्रदान समारंभातील आकर्षण ठरलेला दुसरा विद्यार्थी म्हणजे प्रणव चौहान. त्याने दोन सुवर्णपदके आणि सात रौप्यपदकांची कमाई करून इतरांबरोबरच कुटुंबालाही अचंबित केले. प्रणव मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगडचा. बारावीनंतर पशूवैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तो नागपुरात आला. वैद्यकीय क्षेत्रात त्याला प्रवेश न मिळाल्याने त्याने पशूवैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेतला. बारावीनंतर पाच वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमानंतर अन्नसुरक्षेवर तो काम करू इच्छितो. म्हणूनच त्याने बरेलीच्या भारतीय पशू संशोधन संस्थेत प्रवेश मिळवला आहे. त्यासाठी त्याला कनिष्ठ संशोधन अभ्यासवृत्तीही प्राप्त झाली आहे. जेआरएफसाठी आयसीएआरने घेतलेल्या परीक्षेत देशात तो दुसऱ्या क्रमांकावर होता, हे विशेष. या दोघांचाही कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. आदित्य मिश्रा, उत्तराखंडमधील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मंगला राव व्यासपीठावर होते.

नागपूरचे गुणवंत विद्यार्थी : पशुवैद्यक विद्याशाखेत नागपूरच्या प्रणव चौहान याने दोन सुवर्ण आणि पाच रौप्य पदके पटकावली. मत्स्य विज्ञान शाखेतील एकमेव सुवर्णपदकाचा मानकरी नागपूरचा जसप्रीत सिंग ठरला विदर्भातील वरूडच्या दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाचा शंकर प्रकाश गडसिंग याला एक सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे तपस्विनी सावित्रीबाई मेश्राम या सुवर्णपदकाने योगिता ललित पिंपलवाल, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ सुवर्णपदक नागपुरातील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी जसप्रित सिंग यांनी पटकावले.

क्षणचित्रे
* महसूल मंत्र्याची अनुपस्थिती खटकली.
* समारंभाच्या अध्यक्षस्थानी पहिल्यांदाच कुलपती.
* अध्यक्षीय भाषण झाले नाही.
* वर्ष २०१३-१४ च्या विद्यार्थ्यांसाठी हा समारंभ.
* विद्यार्थ्यांमध्ये फारसा उत्साह नव्हता.