महापालिकेच्या डोंबिवली विभागात ठेकेदारांतर्फे सुरू असलेल्या रस्ते कामांचा महावितरण कंपनीला सुमारे आठ ते दहा लाखांचा फटका बसला आहे. रस्ते कामांसाठी खोदकाम करताना रस्ते ठेकेदार बेजबाबदारपणे ‘जेसीबी’ने रस्ते खणत आहेत. त्यामुळे महावितरणच्या जमिनीखालून गेलेल्या वीजवाहिन्या तुटत असल्याची माहिती महावितरणच्या अभियंत्यांनी दिली.

या नुकसानीबाबत महावितरणने पालिका प्रशासनाला आठ ते दहा लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे, असे महावितरणच्या अभियंत्यांनी सांगितले. उपकार्यकारी अभियंता रवी बागल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
महावितरणच्या वीजवाहिन्या तुटल्या की परिसरातील वीजपुरवठा खंडित होतो. गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवलीत हा प्रकार सुरू आहे. या सततच्या खंडित वीजपुरवठय़ामुळे नागरिकांचा रोष मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर आहे. या संदर्भातची वस्तुस्थिती नागरिकांना सांगूनही त्यावर त्यांचा विश्वास बसत नाही, असे महावितरणच्या अभियंत्याने सांगितले.
डोंबिवलीत पालिकेतर्फे सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांवर पालिकेचे ठेकेदार, अभियंते व अधिकाऱ्यांचा कोणताही वचक नाही. त्यामुळे ठेकेदाराचे कामगार जेसीबीने आडदांडपणे काम करून वीजवाहिन्या तोडत आहेत. अशा प्रकारे तुटलेल्या वाहिन्या नव्याने जोडण्यासाठी गेल्या काही दिवसांत महावितरणला सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचा फटका बसला आहे. ही रक्कम पालिकेने महावितरणला भरपाईच्या रूपाने देण्याची मागणी महावितरणने पालिकेकडे केली आहे.
पालिकेचे उपअभियंता प्रशांत भुजबळ म्हणाले, महावितरणच्या वीजवाहिन्या जमिनीखाली तीन फूट खाली असतील आणि त्यांचे नुकसान झाले असेल तर भरपाईचा दावा कंपनी करू शकते. पण त्या वाहिन्या तीन फुटांच्या वर असतील तर नुकसानभरपाई दिली जात नाही. प्रत्यक्ष पाहणीतून हा प्रकार स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.