अक्षय्य तृतीयेपासून आंब्याचा स्वाद चाखणाऱ्या ग्राहकांसमोर यंदा प्रतिकूल हवामानामुळे बोटावर मोजता येतील एवढेच पर्याय शिल्लक राहिल्याने आणि त्याचा परिणाम दरावरही झाल्याने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी म्हणजे मंगळवारी आंबे खरेदी करताना ग्राहकांना हात आखडता घ्यावा लागला. यामुळे ग्राहकांच्या उत्साहात फरक पडला नसला तरी खरेदीचे प्रमाण मात्र कमी राहण्याची शक्यता आहे. एरवी, या दिवशी विविध प्रकारचे आंबे बाजारात सहजपणे दाखल होत असले तरी या वर्षी बेमोसमी पाऊस आणि गारपीट यामुळे नेमके उलट चित्र असून हापूस, बदाम अन् लालबाग या केवळ तीन प्रकारच्या आंब्यांवर हा सण साजरा करावा लागल्याचे पहावयास मिळाले. महत्वाची बाब म्हणजे, आवक मोठ्या प्रमाणात घसरल्याने आंब्याचा स्वाद चाखण्याकरिता खिसे रिकामा करावा लागणार आहे.
अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सोने खरेदीला जसे ग्राहकांकडून प्राधान्य दिले जाते, तसेच आंब्याचा स्वाद चाखण्याचाही हा हंगामातील पहिला दिवस मानला जातो. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील फळांच्या बाजारात आंबे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते. दरवर्षी, अक्षय्य तृतीयेपूर्वी हापूस, लालबाग, पायरी, केशर, लंगडा, दशहरी असे विविध प्रकारचे आंबे बाजारात दाखल होत असतात. त्यामुळे ग्राहकांना योग्य पर्याय निवडण्याची संधी मिळते. यंदा, मात्र, तशी संधी नसल्याचे बाजारात फेरफटका मारल्यावर अधोरेखीत झाले. संपूर्ण राज्यात सातत्याने बेमोसमी पाऊसाचा तडाखा, गारपीट यामुळे आलेला चांगला मोहोर कालांतराने गळून पडला. सध्या नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील फळ बाजारात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हापूस, पायरी व लालबाग असे हे तीन प्रकारचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध होते. नेहमीच्या तुलनेत यंदा आंब्याची आवक मोठय़ा प्रमाणात घसरली. त्याचा परिणाम आंब्याचे दर वधारण्यात झाला आहे. नाशिकच्या बाजारात हापूस आंबा ५०० ते ९०० रुपये डझन असून इतर प्रकारांच्या तुलनेत हापुसला ग्राहकांची विशेष मागणी आहे. आतापर्यंत ३५०० पेटय़ा संपल्या असून १८०० पेटय़ा मागविण्यात आल्याचे कोकण पर्यटन महोत्सवाचे आयोजक दत्ता भालेराव यांनी सांगितले. तसेच, लालबाग ८०, बदाम ७० रूपये प्रती किलो असे दर आहेत. गतवर्षीच्या तुलनेत त्यात १५ ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी मान्य केले आहे. प्रतिकुल हवामानामुळे यंदा केशर, लंगडा व दशहरा हे आंबे बाजारात येऊ शकले नाहीत. जे आंबे बाजारात आले आहे, त्यांची आवक अतिशय कमी असल्याने दरात वाढ झाल्याचे भद्रकाली फळ बाजारातील घाऊक व्यापारी परेश ठक्कर यांनी सांगितले. या सर्व घडामोडींचा परिणाम ग्राहकांच्या खरेदीच्या प्रमाणावर झाला. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांकडून सरासरी पाच ते दहा किलो आंब्याची खरेदी केली जाते. मात्र, हेच ग्राहक या दिवशी तीन ते सहा किलो खरेदी करून आर्थिक समीकरण जुळवताना पहावयास मिळाले. म्हणजे ग्राहकांचा आंबा खरेदीला प्रतिसाद लाभला असला तरी खरेदी करण्याचे प्रमाण कमी झाल्याचे ठक्कर यांनी स्पष्ट केले.