एकाच ठिकाणी १४ स्क्रीन, दर दहा मिनिटांनी नव्या चित्रपटाचे खेळ, दिवसभरात ७० ते ७२ शो, ठाण्यात पहिल्यांदाच ४डीएक्स तंत्रज्ञानाचा वापर अशा विविध वैशिष्टय़ांनी सजलेले देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मेगाप्लेक्स ठाण्यातील व्हीव्हीयाना मॉलमध्ये गुरुवारी सुरू झाले. ‘सिनेपोलीस’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या शृंखलेतील हा मेगाप्लेक्स, मुंबई परिसरातील सर्वात मोठा मल्टिप्लेक्स ठरणार आहे. या आधुनिक सिनेमासंकुलात अद्ययावत साधनांनी सिनेमाचा मनमुराद आनंद घेता येता येणार आहे. 

26ठाण्यात कॅडबरी जंक्शनजवळ असलेल्या व्हीव्हीयाना मॉलमधील सिनेपोलीसमधील चार स्क्रीन खास व्हीआयपी प्रेक्षकांसाठी राखीव असणार आहेत. तिथे प्रत्येक प्रेक्षकास सिनेमा पाहण्याबरोबरच मागणीनुसार खाद्य पदार्थ, जेवण या सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच स्नेह संमेलन, वाढदिवस अथवा तत्सम समारंभांना हे स्क्रीन उपलब्ध करून दिले जातील. या व्हीआयपी स्क्रीन विभागात ७२ आसने आहेत. एका स्क्रीनमध्ये फोरडी एक्स सुविधा आहे. त्यात विविध इफेक्टस्सह सिनेमा पाहता येणार आहे. त्यात वारा, धुके, विजांचा कडकडाट, सुगंधाचा दरवळ आदी अनुभवांमुळे पडद्यावरील दृश्यांची परिणामकरता वाढेल. आयमॅक्स, डॉल्बी एटमॉस, रिअल थ्रीडी आणि फोर के प्रोजेक्शन या आधुनिक सिनेमा तंत्राचा वापर या सिनेमासंकुलामध्ये करण्यात आला आहे. डॉल्बी एटमॉसमध्ये तब्बल ६४ स्पीकर्स असल्याने प्रसंग जणू आपल्या समोर घडत असल्याचा भास प्रेक्षकांना होणार आहे. इतर मल्टिप्लेक्सप्रमाणेच येथेही शनिवार-रविवार आणि आठवडय़ातील इतर दिवसांचे तिकीट दर वेगळे असतील. या सिनेमासंकुलात हिंदी-मराठी सिनेमांचे प्रीमीयर्स होतील, अशी माहिती सिनेपोलिस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जेव्हियर सोटोमेयर यांनी दिली.

मराठी सिनेमांना विशेष स्थान
एकूणच भारतीय चित्रपट व्यवसायात दक्षिण भारतीय सिनेमांचा वरचष्मा असला तरी मराठी सिनेमानेही चोखंदळ रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे या सिनेसंकुलात मराठी सिनेमांना विशेष स्थान असेल, अशी माहिती व्यवस्थापनातर्फे देवांग संपत यांनी दिली. ठाणे हे कॉस्मोपॉलीटन शहर आहे. इथे मराठी, हिंदीबरोबरच बंगाली, तेलगू, तमिळ आदी भाषीक नागरिक मोठय़ा प्रमाणात राहतात. त्यामुळे हॉलीवूड-बॉलीवूड सिनेमांप्रमाणेच प्रादेशिक भाषेतील सिनेमांचेही प्रसारण केले जाईल.