सिंहस्थ निधीतून सुरू असलेल्या तालुक्यातील रायांबे-कावनई रस्त्याच्या कामांची पाहणी करून खा. हेमंत गोडसे यांनी काम निकृष्ठ होत असल्याबाबत नाराजी व्यकत् केली. यावेळी त्यांनी अधिकारी व टेकेदार यांना जाब विचारला. कावनई हे सिंहस्थाचे मूळ क्षेत्र असल्याने येथील विकासाकडे अधिकारी व प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देऊन विकास कामांची गती वाढविण्याचे निर्देश खासदारांनी दिले.
सुमारे ८० लाखाचे हे काम असून अतिशय तकलादू पद्धतीने हे काम सुरू असल्याची माहिती रमेश धांडे यांनी गोडसे यांना दिली. अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसेल तर बंद पाडू, असा इशारा यावेळी खासदारांसमवेत असलेल्या धांडे यांनी दिला. सिंहस्थ कुंभमेळ्यास अत्यंत कमी कालावधी उरला असल्याने प्रशासनापुढे कामे कशी पूर्ण करावीत, याचे संकट आहे. काम त्वरीत पूर्ण करण्याच्या घाईत कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष होण्याचे प्रकार नाशिकमध्ये होत आहेत. त्याचाच प्रत्यय कावनई येथेही खासदारांना आला. कावनई तीर्थक्षेत्राकडे व विकास कामांकडे प्रशासन व अधिकाऱ्यांचे फारसे लक्ष नसल्याची तक्रार कुलदीप चौधरी यांनी यावेळी खासदारांकडे केली. दरम्यान, तालुक्यातील रायांबे, ओडली, सातुर्ली, वैतरणा, कऱ्होळे या भागात अवकाळी पाऊस व गारपीटीने पिके उद्ध्वस्त झाल्याने झालेल्या नुकसानीची पाहणीही गोडसे यांनी केली.
पिकांचे झालेले नुकसान शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असून कृषी विभाग व तहसील प्रशासनाने तत्कळ पंचनामे करण्याच्या सूचना गोडसे यांनी दिल्या. शासन स्तरावर पाठपुरावा करून मदत मिळवून देण्याबाबत आपण बांधील आहोत, अशी ग्वाही गोडसे यांनी दिली. यावेळी माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, तालुकाप्रमुख भगवान आडोळे आदी उपस्थित होते. खासदारांनी प्रातिनिधीक स्वरुपात रामचंद्र खातळे, निवृत्ती पवार, भाऊसाहेब खातळे, पुंडलिक जमधडे आदींच्या शेतात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.