विद्यमान आमदार आणि नेत्यांच्या वारसांना पुन्हा देण्यात आलेली उमेदवारी, सामान्य कार्यकर्ता आणि इच्छुक दावेदारांवर झालेला अन्याय बघता काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त करून पदांचे राजीनामे पाठविले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या नाराजीमुळे काँग्रेसच्या कार्यालयातील वर्दळ निवडणुकीच्या धामधुमीतही कमी झाल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली आघाडी संपुष्टात आल्यानंतर काँग्रेसच्या अनेक इच्छुक दावेदारांनी उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे इच्छा व्यक्त केली होती. शहरातील माजी मंत्री, विद्यमान आमदार आणि काही वरिष्ठ नेत्यांच्या वारसदारांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसच्या सामान्य कार्यकत्यार्ंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. मध्य नागपूरमधून इच्छुक दावेदार असलेले प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जयप्रकाश गुप्ता यांनी काँग्रेसकडे निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, ऐनवेळेवर त्या ठिकाणी माजी मंत्री अनिस अहमद यांचे नाव जाहीर करण्यात आली. असाच प्रकार उत्तर आणि दक्षिण नागपुरात झाला असून त्या ठिकाणी सामान्य कार्यकत्यार्ंवर अन्याय झाला आहे. कार्यकत्यार्ंना सन्मान मिळत नसेल तर पदावर राहण्याचा काहीच अधिकार नाही म्हणून गुप्ता यांनी नाराजी व्यक्त करून सरचिटणीसपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. गुप्ता यांच्याशिवाय प्रभावती ओझा, मुन्ना ओझा, अखिल भारतीय  मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी प्रकाश लोणारे, तानाजी वनवे, मारोतराव कुंभलकर, ब्लॉक अध्यक्ष शकील भाई, प्रभाकर खापरे, ब्रिजभूषण शुक्ला यांनी पदाचे राजीनामे देऊन पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली.
युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते पक्षश्रेष्ठीवर नाराज असून त्यातील अनेकांनी प्रचार यंत्रणेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मुन्ना ओझा हे युवा नेते असून त्यांची पश्चिम नागपुरातून निवडणूक लढण्याची इच्छा होती. प्रकाश लोणारे हे भाजपममधून काँग्रेसमध्ये गेल्यावर पक्षाने त्यांच्यावर प्रदेशाची जबाबदारी दिली होती. शिवाय मच्छिमार संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती. मात्र, त्यांना यावेळी डावलण्यात आले आहे. ब्लॉक अध्यक्षांपासून ते सामान्य कार्यकत्यार्ंपर्यंत नाराजी पक्षाला भोवणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
 या संदर्भात जयप्रकाश गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, प्रदेशचा पदाधिकारी असलो तरी पक्षात ज्या पद्धताने सामान्य कार्यकर्त्यांला सन्मान मिळाला पाहिजे तो मिळत नसल्यामुळे नाराज झालो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करीत असल्यामुळे आमच्यासारख्या कार्यकत्यार्ंची पक्षश्रेष्ठींकडून अपेक्षा आहे आणि ती जर पूर्ण होत नसेल तर पदावर कशाला राहायचे? असा प्रश्न उपस्थित करून गुप्ता यांनी नाराजी व्यक्त केली. पक्ष सोडणार नसून पक्षश्रेष्ठींकडून जो आदेश येईल, त्याप्रमाणे काम करणार आहे.