चंद्रपूर तसेच गडचिरोली जिल्ह्य़ातील शेकडो वनरक्षक व वनपाल संपावर गेल्याने महाराष्ट्र, तेलंगणा व छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात सागवान तस्करीत वाढ झाली आहे. तसा अहवाल गडचिरोली वनखात्याने वन सचिवांकडे पाठविला आहे. दरम्यान, झिंगानूर येथे पाच लाखाचे सागवान तस्करांकडून जप्त करण्यात आले आहे.
या दोन्ही जिल्ह्य़ात राज्यातील ७० टक्के जंगल आहे. यातही गडचिरोलीत उच्च प्रतीच्या सागाचे घनदाट जंगल आहे. महाराष्ट्र, तेलंगणा व छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील सिरोंचा, एटापल्ली, आलापल्ली, अहेरी, धानोरा, कोरची या भागात उच्च प्रतीचे साग, तर चंद्रपूर जिल्ह्य़ात ताडोबा व लगतच्या जंगलात उच्च प्रतीच्या सागासह वाघ, बिबटे व अन्य वन्यजीव आहेत. मात्र, राज्यातील वनरक्षक व वनपाल संपावर गेल्यामुळे या दोन्ही जिल्ह्य़ातील जंगलातून सागाच्या तस्करीत प्रचंड वाढ झालेली आहे. सिरोंचा, एटापल्ली व अहेरी तालुक्यातील जंगलातून सागाचे झाड तोडायचे आणि वैनगंगेच्या पात्रात सोडायचे. हे साग नदीच्या प्रवाहातून शेजारच्या तेलंगणात पोहचायचे. तेथे तस्कर बैलगाडीने साग घेऊन पसार व्हायचे.
गेल्या कित्येक वर्षांंपासून ही तस्करी सुरू आहे. मात्र, आता संप सुरू होताच यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दोन दिवसापूर्वीच झिंगानूर येथील उपक्षेत्र सिरकोंडा येथे खडी पहाडीजवळ वनखंड क्रमांक ११६ येथे सागवान तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही तस्करांना पकडून १६ बैलांसह ८ गाडय़ा व किमान पाच लाखाचे साग फाटे जप्त करण्यात आले. याच परिसरात किमान ४० ते ५० साग तस्करांची टोळी सक्रीय आहे. या टोळीवर वनखात्याची नजर आहे, परंतु आता वनरक्षक व वनपाल नसल्याने या टोळीने येथे धुमाकूळ घातला आहे.
गेल्या आठ दिवसात लाखो रुपयाचे साग या टोळीने तस्करीच्या माध्यमातून तेलंगणात नेले आहे. तिच अवस्था सिरोंचा व एटापल्लीच्या घनदाट जंगलाची झालेली आहे. तेथील सागवान लाकडांची कटाई करून बैलबंडी किंवा सायकलवरून तस्कर घेऊन जात असल्याची माहिती वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना देण्यात आली, परंतु तस्कर सशस्त्र हल्ला करीत असल्याने वनाधिकारी मनुष्यबळाअभावी कुठलीही कारवाई करण्यास तयार नाही. दुसरीकडे तस्करांकडून बंदुकीपासून तर सर्व शस्त्रसाठा आहे. दोन दिवसापूर्वी अहेरीच्या जंगलातूनही मोठय़ा प्रमाणात सागवान तोड झाल्याची माहिती आहे. तिकडे धानोरा परिसरातील जंगलातूनही छत्तीसगडमध्ये मोठय़ा प्रमाणात सागवान नेण्यात आले. राजुरा तालुक्यातील जंगलातूनही अशाच प्रकारे सागवानाची तस्करी तेलंगणात सुरू आहे. सीमावर्ती भागात वनखात्याचे नाके आहेत, परंतु तेथे आता वनरक्षक व वनपाल नसल्याने तेथूनही खुलेआम सागवानाची ने-आण सुरू आहे. ही तस्करी वेळीच बंद करण्यासाठी वनखात्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचा अहवाल स्थानिक वनाधिकाऱ्यांनी वनमंत्री पतंगराव कदम, सचिव परदेशी यांच्याकडे पाठविला आहे. मात्र, अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. त्याचाच फायदा तस्कर घेत असून आतापर्यंत कोटय़वधीच्या सागवानाची तस्करी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर क्षेत्रातील जवळपास २५० वनरक्षक, वनपाल व कर्मचारी संपात सहभागी झाले असल्याने वाघ, बिबटे व अन्य वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे २५ रक्षकांची व ५० होमगार्डस्ची मदत घेण्यात आलेली आहे. या सर्वाना ताडोबा व लगतच्या परिसरात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. वाघ व बिबटय़ांचे संरक्षण महत्वाचे असल्यानेच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आलेली आहे. शिकार होऊ नये यादृष्टीनेही विशेष सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे.