पदव्युत्तर व्यवसाय व्यवस्थापनाच्या (एमबीए) जागा भरपूर, ऑनलाईन अर्जही भरपूर मात्र, प्रवेश ५० टक्केही झाले नसल्याने गेल्यावर्षीप्रमाणेच याहीवर्षी विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवली आहे. एमबीएला एकेकाळी आलेले सुदिन केव्हाच इतिहास जमा झाले आहेत. त्याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांना मनासारखे न मिळणारे पॅकेज होय. त्यामुळेच पुन्हा एमबीए महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची वाणवा भासू लागली आहे. दुसरे म्हणजे अभियांत्रिकीच्या पाठोपाठ एमबीएचे महाविद्यालये आहेत.
अभियांत्रिकीचे ५७ महाविद्यालये आहेत तर एमबीएच्या ५२ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमार्फत(कॅप) प्रवेश सुरू आहेत. प्रवेशासाठी कॅपची दुसरी फेरी आटोपली असून येत्या ३१ जुलैपासून एमबीएच्या समुपदेशन फेरी अंतर्गत प्रवेश दिले जातील. मात्र, सामान्यपणे समुपदेशन फेरीत फारसे प्रवेश होत नाहीत असा अनुभव आहे.
तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार नागपूर विभागात एकूण ४ हजार ६०८ जागा आहेत. दुसऱ्या फेरीनंतर २ हजार ८३० जागा रिक्त आहेत. म्हणजे अध्र्यापेक्षाही जास्त जागा रिक्त आहेत. कॅपद्वारे भरावयाच्या एकूण जागा ४ हजार ४७ आहेत. त्यात केवळ १ हजार ७७८ एवढेच प्रवेश झाले आहेत. अद्यापही कॅपच्या २ हजार २६९ जागा रिक्त आहेत. आश्चर्य म्हणजे एमबीएसाठी ३ हजार ९३५ अर्ज आले असताना केवळ १ हजार ७७८ एवढेच प्रवेश झाले
आहेत. केवळ ४४ टक्के प्रवेश आतापर्यंत झाले आहेत. कॅपद्वारे भरायच्या जागांची संख्या अल्पसंख्याक संस्था किती जागा तंत्रशिक्षण विभागाला ‘सरेंडर’ करतात यावर अवलंबून असतात. एमबीएच्या एकाही महाविद्यालयात पूर्ण जागा भरल्या गेल्या नाहीत. सावंगी मेघेच्या दत्ता मेघे एमबीए महाविद्यालयात ५४ पैकी १५ प्रवेश झाले. गोंदियातील गणखैरा येथील एमबीए महाविद्यालयातील कॅपच्या सर्वच्या सर्व ४८ जागा रिक्त आहेत तर रायसोनी एमबीए महिला महाविद्यालयातील ४८ पैकी केवळ एक जागा भरली आहे. यावरूनच एमबीए अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे लक्षात
येते.
ऑनलाईन अर्ज- ३ हजार ९३५
एकूण जागा- ४ हजार ६०८
कॅपच्या जागा- ४ हजार ४७
दुसऱ्या फेरीत प्रवेश- १,७७८
रिक्त जागा- २ हजार २६९
समुपदेशन फेरी- ३१ जुलैपासून