यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदाराच्या पावत्या घरपोच करण्यात येतील, असा दावा निवडणूक आयोगाने केला होता. मात्र, तो फोल ठरला असून ही प्रक्रिया सुलभ होण्याऐवजी अधिकच किचकट झाल्यामुळे मतदारांना केंद्रावर दोनदा रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. एकीकडे निवडणूक खर्चाच्या काटेकोर तपासणीमुळे राजकीय पक्षांनी मतदार पावत्या वितरित करण्यात यंदा फारसा उत्साह दाखविला नाही, तर दुसरीकडे शासकीय यंत्रणेद्वारेही पावत्या बहुतेक घरात पावत्या पोहोचल्या नाहीत. थोडक्यात निवडणूक विभागाने पावत्यांची जबाबदारी घेतल्याने मतदारांची सोय होण्याऐवजी अडवणूकच झाली. सर्वच निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष मतदार पावत्या घरपोच करत असतात. राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मतदारांशी जनसंपर्क असल्यामुळे दर निवडणुकीआधी मतदान क्रमांक असणाऱ्या पावत्या घरपोच पोहोचतात. तसेच ज्या मतदारांपर्यंत पावत्या पोहोचत नाहीत, त्यांच्यासाठी मतदान केंद्राबाहेर राजकीय पक्ष बूथ उभारतात. त्याद्वारे मतदारांना यादीतील नाव शोधून पावत्या देण्यात येतात. यंदा लोकसभा निवडणुकीत मतदार पावत्या प्रत्येकाच्या घरात पोहोचविण्यात येतील, असा दावा निवडणूक आयोगाने केला होता. ही प्रक्रिया राबविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेसाठी नेमून दिलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना परिसराची फारशी माहिती नव्हती. त्यामुळे बऱ्याच मतदारांपर्यंत त्यांच्या क्रमांकाच्या पावत्या पोचल्याच नाहीत. तसेच निवडणूक खर्चामुळे राजकीय पक्षांनीही मतदार पावत्या देण्यासाठी फारसा उत्साह दाखविला नाही. परिणामी, बहुतेक मतदारांपर्यंत ही यंत्रणा पोहोचू शकली नाही. त्यामुळे मतदार यादीतील नावे शोधण्यासाठी मतदारांनी केंद्रावर गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण
ज्यांना पावत्या मिळाल्या नाहीत, त्यांच्या मदतीसाठी राजकीय पक्षांप्रमाणेच यंदा निवडणूक विभागानेही मतदान केंद्राजवळ बूथ उभारले होते. त्या ठिकाणी मतदार यादीतील नाव आणि क्रमांक शोधून पावत्या देण्यात येत असल्याने तिथे मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. बूथवरील कर्मचाऱ्यांनी पावती दिल्यानंतर मतदानासाठी मतदारांना पुन्हा रांग लावावी लागत होती. त्यामुळे ही प्रक्रिया सुलभ होण्याऐवजी अधिकच किचकट झाल्याचे दिसून आले. तसेच या प्रक्रियेमुळे दोनदा रांगेत उभे राहावे लागल्यामुळे मतदारांमध्ये कमालीचे गोंधळाचे वातावरण होते.