तळोजा औद्योगिक वसाहतीमधून होणाऱ्या जलप्रदूषणाला कोण जबाबदार याचे उत्तर प्रदूषणावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेला अद्याप सापडू शकलेले नाही. घोट गावालगतच्या नदीमधील हजारो मासे मृत्युमुखी पडले, त्या नदीच्या पाण्यावर काळ्या रंगाचा तवंग तरंगू लागल्यानंतर तेथे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी ग्रामस्थांसोबत पोहचले. तरीही हे प्रदूषण कोणी केले याचा शोध लागलेला नाही. एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित पाण्याचे नमुने जमा केले आहेत. मात्र हे जलप्रदूषण कारखान्याच्या सांडपाण्यामुळे झाले की औद्योगिक विकास महामंडळाच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीमुळे याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकारी ठाम नाहीत. प्रदूषणकर्त्यांना पकडणे एमपीसीबी प्रशासनाला मुश्कील झाल्याचे पाहायला मिळते.
६५० कारखाने असलेल्या तळोजा औद्योगिक वसाहतीलगतच्या नदी, गावे, वसाहतीमध्ये प्रदूषण हा जोखमीचा विषय बनला आहे. मंगळवारी घोट गावाच्या नदीकिनाऱ्याला मासे मृत्युमुखी होऊन तरंगू लागल्यानंतर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. औद्योगिक विकास महामंडळाची सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीच्या गळतीमुळे हे जलप्रदूषण झाल्याची शक्यता एमपीसीबी प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. येथील ग्रामस्थांचा जवळपासचा कारखाना हे प्रदूषण करत असल्याचा संशय आहे. मात्र हे प्रदूषण कोण करत आहे याचा शोध एमपीसीबी लावू शकली नाही. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर एमपीसीबीचे साहाय्यक प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांनी नदीच्या पाण्यावर काळ्या रंगाचा तवंग पाहिला, मृतमासे तरंगत असल्याचे पाहिले असून त्यांनी या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. हा प्रकार रविवारी निर्दशनास आला असल्याचे यादव यांनी सांगितले. मात्र चार दिवस उलटले तरीही यादव हे घोट गावालगतची नदी कशामुळे प्रदूषित झाली याचे ठाम उत्तर देऊ शकलेले नाहीत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर प्रदूषणकर्त्यांवर कारवाई करणार असल्याचे यादव यांनी सांगितले. तळोजातील प्रदूषण रोखण्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. माझ्या विभागातील संपूर्ण पथक यासाठी दिवसरात्र झटत आहोत. औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाची मात्रा तपासण्यासाठी अवेळी धडक देणारी दोन पथके आम्ही स्थापन केली आहेत. रात्रीच्या वेळी आम्ही एमआयडीसी क्षेत्रात त्यासाठी फिरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

एमआयडीसीची सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी फुटल्याने ही वाहिनी बदलण्यासाठी एमआयडीसीच्या उच्चपदस्थांसोबत बैठका घेऊन संबंधित वाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. वाहिनी बदलण्याचे काम पूर्ण झाल्यावर तळोजा परिसर प्रदूषणमुक्त होईल.
यशवंत सोनटक्के ,प्रादेशिक अधिकारी , एमपीसीबी