बदलती जीनवशैली व परिश्रम न केल्यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. हे पाहूनच की काय अनेक कंपन्यांनी वजन कमी करणारी औषधे बाजारात उपलब्ध केली आहेत. परंतु अशा औषधांच्या वापरामुळे लाभापेक्षा हानीच अधिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावा, असे मत शहरातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

सध्या जिकडे तिकडे, औषधीच्या दुकानात, विविध वृत्तपत्रात वजन कमी होत असल्याच्या दावा करणाऱ्या औषधांच्या जाहिराती दिसून येत आहेत. वजन कमी होत असल्याचा दावा करणाऱ्या या औषधांमध्ये अत्यंत घातक असे घटक असतात. हे जाणून घेण्यासाठी लोकांना वेळच नाही. या औषधांमध्ये सिबुरामीन, रिमोनाबेंट, फेनिटॉयन, फिनोल्फील हे घटक द्रव्य असल्याचे आढळून आले आहे. फेनिटॉयन हे घटक तर फीट येणाऱ्या रुग्णांवर वापरले जाते. तर फिनोल्फील हे औषध कर्करोगावरच्या उपचारासाठी देण्यात येते. सिबुट्रॉमीन हे औषध उच्च रक्तदाब, हृदयविकार असलेल्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांमध्ये वापरले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रिबोनाबेंट या औषधावर अमेरिकेत बंदी आहे. या औषधाचे परीक्षण केले असता त्याचे दुष्परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. युरोपखंडात हे औषध बेधडक विकल्या जात आहे. अमेरिका आमच्यापेक्षा पुढे आहे, असे आम्ही समजत असताना तेथेही वजन कमी करण्याचा दावा करणारी औषधी विकली जात असल्याने तेथील अन्न व औषध प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहे.
भारतातही अशा औषधांच्या जाहिरातवर बंदी आणली पाहिजे, असे बोलले जात आहे. लठ्ठपणा हा जीवनशैलीशी निगडीत आजारांपैकी एक आजार म्हणून ओळखला जातो. लठ्ठपणामुळे वीसहून अधिक आजारांना आमंत्रण मिळते, असे सिद्ध झाले आहे. त्यामुळे लठ्ठ नागरिक आपला लठ्ठपणा कमी करण्यासाठी जाहिरातीला बळी पडून घातक औषधे खरेदी करतात.
या औषधांमुळे फायद्यापेक्षा तोटेच अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. औषधांपेक्षा शस्त्रक्रिया चांगली समजली जाते. परंतु त्यासाठी खर्च अधिक होत असल्याने नागरिक या बाजारू औषधांकडे वळतात.

यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (औषध) अशोक गिरी म्हणाले, अशा जाहिराती करणाऱ्यांवर आम्ही नोटीस बजाऊन कारवाई करतो. बहुतांश आयुर्वेदिक औषधांमध्ये अ‍ॅलोपॅथीची औषधे असतात. अशा औषधांमुळे लाभापेक्षा तोटेच अधिक होतात. सामान्य नागरिकांनी अशा जाहिरातींना बळी पडू नये. लाभापेक्षा हानीच होत असल्याने अशा उत्पादनावर बंदीच घातली पाहिजे. वजन कमी होत असल्याचा दावा करणाऱ्या अशा कंपन्या नागरिकांची दिशाभूल करीत असतात. त्यामुळे अशा जाहिराती बघून स्वत आपल्याच मनाने औषधे खरेदी करू नये. अशा औषधांचा दुष्परिणाम मूत्रपींड, यकृत व आतडय़ांवर होत असतो. त्यामुळे अशी औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशन, नागपूर शाखेचे सचिव डॉ. कुश झुनझुनवाला यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.

लठ्ठ नागरिकांनी हे करावे
* आठवडय़ातून किमान तीन दिवस अर्धा तास व्यायाम करावा.
* चरबीयुक्त पदार्थ व साखर टाळावी.
* मद्यपान कमी करा.
* ताण, राग व कंटाळा या भावनांना लांब ठेवा.
* बैठी जीवनशैली टाळा.
* लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करावा.