महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाने महापाल्किेच्या शाळा व त्या अनुषंगाने निरनिराळी आवश्यक असणारी कामे करून घेण्यासाठी सातत्याने आजवर पाठपुरावा केला असला तरी महापालिका प्रशासनाकडून त्याकडे नेहमीच कानाडोळा करण्याची भूमिका घेण्यात आल्याचा अनुभव आहे. प्रशासनाच्या चालढकल करण्याच्या धोरणामुळे शाळेच्या इमारतींची अवस्था मोडकळीस आली आहे. आता शिक्षण मंडळाचे अस्तित्वच संपुष्टात आल्यामुळे प्रशासनाचे हे धोरण कायम राहिल्यास पालिकेच्या शाळांचे भवितव्य दोलायमान बनणार आहे.
शिक्षण मंडळाचे अस्तित्व संपुष्टात येण्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी २०१३ मध्ये पालिका शाळांच्या स्थितीविषयी महापौर, आयुक्त व स्थायी समिती सभापतींना पत्राद्वारे माहिती देण्यात आली होती. जवळपास २० शाळांच्या इमारती व बांधकामांची माहिती देऊन त्यांच्या दुरुस्ती व देखभालीची नितांत गरज व्यक्त करण्यात आली. परंतु, प्रशासनाने त्यातील कुठल्याही कामाकडे गांभीर्याने पाहिले नाही. वर्गखोल्या, क्रीडांगण आदी आवश्यक कामांना प्राधान्य देण्याची गरज या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. पण, दुर्दैवाने शिक्षण मंडळाच्या या पत्राला कोणी काडीचीही किंमत दिली नव्हती. शाळा क्रमांक ३ च्या सहा खोल्यांमधील फरशी बसविणे व विद्युतीकरण अपूर्ण असून ते काम पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच पाण्याची टाकी बसविणे, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, शाळेच्या पाठीमागील बाजूस संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वार बसविण्याची गरज आहे. शाळा क्रमांक सहाच्या वर्गखोल्यांमध्ये पुरेसा प्रकाश मिळावा म्हणून फायबरचे पत्रे बसविणे, छत, दरवाजे व खिडक्यांची दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. या ठिकाणी क्रीडांगणावर वाळू पसरवून भूसपाटीकरणाची गरज व्यक्त करण्यात आली. शाळा क्रमांक आठच्या भिंतीचे सिमेंट प्लास्टर करून भिंतीवर फळे तयार करणे, मुलांसाठी स्वच्छतागृह आणि क्रीडांगणाच्या भिंतीची उंची वाढविण्याची गरज आहे. शाळा क्रमांक नऊमध्ये कौलाचे छत असून त्याऐवजी पत्रे बसविणे आणि कौलाचे छत असून त्याऐवजी पत्रे बसविणे आणि विद्युतीकरण तसेच पिण्याच्या पाण्यासाठी नळ दुरुस्ती करण्याची गरज आहे.
शाळा क्रमांक दहाच्या वर्ग खोल्यांसह खिडकी व फरशी दुरुस्ती करून या ठिकाणी शोष खड्डा करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. शाळा क्रमांक १४ चे छत अक्षरश: गळते. भिंती ओलावा धरतात. व्हरांडय़ात पावसाचे पाणी साचते. खिडक्यांची तावदाने तुटकी आहेत. शाळा इमारतींच्या उत्तर दिशेला संरक्षक भिंत आणि तारेच्या कुंपणाची गरज असून इमारतीच्या पूर्वेला असणारी गटार मुख्य गटारीला जोडून ती बंदिस्त करण्याची गरज आहे. शाळा क्रमांक २० च्या चार वर्गाच्या छतांना प्लास्टर करणे आवश्यक आहे. या ठिकाणी रखवालदारासाठी खोली, सभागृह आणि स्वच्छतागृहासाठी पुरेशा पाण्याची गरज आहे. शाळा क्रमांक २५, २६, २८, ४३, ४४, ५३, ५५, ५६ (मोहाडी उपनगर) आणि वनश्री कॉलनीतील शाळा व अन्य शाळांचेही प्रश्न मांडण्यात आले होते.