बुलढाणा : राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतच्या निवडणुकासाठी सध्या नामांकन सुरु आहे. मात्र संगणक प्रणाली (ऑनलाईन पद्धतीने) अर्ज भरताना बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील हजारो उमेदवारांना नाकी नऊ येत असून त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या परिणामी उमेदवारी अर्ज भरण्याच्या गतीवर गंभीर परिणाम झाला आहे.

यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी, हजारो उमेदवारांना भेडसावत लागणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता आयोगाने आता संगणक प्रणाली बरोबरच पारंपरिक ( ऑफलाईन ) पद्धतीने सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा दिली आहे. एवढेच नव्हे उद्या रविवारी, १६ नोव्हेंबर रोजी सुद्धा दोन्ही पद्धतीने उमेदवारी अर्ज सादर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे, राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भातील निर्देश दिले आहे.

नगरपालिका निवडणुकीत उतरणाऱ्या इच्छुकांना राज्य निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारी अर्ज ऑनलाईन करण्यास अडचणी येत असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत होते. त्याचा परिणाम अर्ज दाखल होण्यावर झाला आहे.

सोमवारपर्यंत (ता. १७) अर्ज दाखल करण्यास मुदत आहे. शेवटच्या दोन दिवसात संगणक प्रणाली वर ताण येऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने रविवारी देखील ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरु ठेवण्याचा आदेश काढला आहे. तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास अडचणी येत होत्या. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकात शासकीय सुट्टी दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असे सांगितले होते.

मात्र अडचण लक्षात घेऊन रविवारीही कामकाज सुरु ठेवले आहे. त्यामुळे शनिवार, रविवार व सोमवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी निर्गमित केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या ऑनलाईन संगणक प्रणालीत येत असलेल्या तांत्रिक अडचणी आणि शेवटच्या क्षणी सर्व्हरवर येणारा प्रचंड भार लक्षात घेता, आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.

आता १६ते १७ नोव्हेंबर दरम्यान, उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र ऑनलाइन तसेच पारंपारिक अशा दोन्ही पद्धतींनी सादर करता येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता आणि तेव्हापासून उमेदवारी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात होते. मात्र, अर्ज भरताना या संगणक प्रणालीत अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले. अर्ज सादर करण्यासाठी आता केवळ शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.

अशा परिस्थितीत, एकाच वेळी सर्व उमेदवारांचा ऑनलाईन प्रणालीवर भार येऊन ती ठप्प होण्याची शक्यता होती. यामुळे अनेक उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून, राज्य निवडणूक आयुक्तांच्या आदेशानुसार, आयोगाने आता नवीन निर्देश जारी केले आहेत.