‘चांदनी’ म्हणा किंवा ‘मिस हवाहवाई’. जवळपास तीनशे चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांना नेमकं कोणत्या आणि किती नावांनी संबोधायचं हा चाहत्यांच्या मनात घर करणारा एक मोठा प्रश्नच जणू. मुळात आता हा प्रश्न सर्वांनाच भेडसावतोय, कारण सर्वांच्या लाडक्या श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. आयुष्य म्हणजे अनिश्चिततेचा एक खेळच आहे, या वाक्यावर आता अनेकांचा विश्वास बसतोय. कौटुंबिक समारंभात सहभागी होण्यासाठी मोठ्या उत्साहात दुबईला गेलेल्या या अभिनेत्रीच्या निधनाचीच बातमी येईल अशी पुसटशी कल्पनाही कोणी केली नव्हती. पण, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं आणि श्रीदेवी आपल्यातून निघून गेल्याचं वृत्त खरं ठरलं.

पाच दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्रीच्या शेवटच्या व्हिडिओच्याच चर्चा होत असताना, तो व्हिडिओ अनेकजण पुन्हा पुन्हा पाहात असतानाच त्यांच्या शेवटच्या फॅमिली फोटोने अनेकांच्या काळजाचा ठाव घेतला. कुटुंबासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या, प्रसिद्धी आणि लोकप्रियतेला क्षणाचाही विचार न करता दूर लोटणाऱ्या ‘श्री’ यांनी नेहमीच आपल्या जबाबदाऱ्या ओळखल्या. कुटुंबासाठी त्या जवळपास पंधरा वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर राहिल्या. याच कुटुंबासोबतचा त्यांचा हा शेवटचा फोटो पाहिला की, खरंच त्या आपल्यात नाहीयेत का, हा प्रश्न पुन्हा मनात काहूर माजवून जातोय.


 वाचा : ‘ख्वाबों की शहजादी’ निघून जाते तेव्हा…

नवविवाहित मोहित मारवा आणि त्याच्या पत्नीच्या साथीने या फोटोसाठी पोझ देणाऱ्या बोनी कपूर, श्रीदेवी आणि खुशी कपूरच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहून त्या वेळी नेमका काय जल्लोष असेल याचा अंदाज लावता येणं सहज शक्य झालं आहे. मुख्य म्हणजे ‘चाँदनी’च्या अदा कैद करणारा हा फोटो काढतेवेळी तो त्यांचा अखेरचा फोटो असेल याची कल्पनाही नसेल कोणाला. पण, सत्य हेच आहे की या फोटोच्या रुपात आता फक्त आठवणी उरल्या आहेत. कारण, निर्मळ मनाच्या श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला आहे.