भुवनेश्वर : या वर्षी होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा हॉकीसाठी ऑलिम्पिक पात्रता फेरी असेल, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) अध्यक्ष इक्रम तय्यब यांनी रविवारी केली.

आशियाई क्रीडा स्पर्धा नियोजित कार्यक्रमानुसार गेल्या वर्षी चीनमध्ये हँगझू येथे होणार होती. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्याने ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. आता या स्पर्धेचे आयोजन यंदा २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत केले जाणार आहे. तय्यब ‘एफआयएच’चे अध्यक्ष असून हँगझू आशियाई क्रीडा स्पर्धेच्या समन्वय समितीचे सदस्यही आहेत. आशियाई ऑलिम्पिक समितीचे प्रमुख भारताचे रणधीर सिंग या समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत.

‘‘मी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या समन्वय समितीचा सदस्य आहे. आशियाई स्पर्धा होणार यात शंका नाही,’’ असे तय्यब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘‘मार्चमध्ये समन्वय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत पूर्ण आढावा घेतला जाईल. सर्व केंद्र तयार असल्यामुळे नव्या तारखेनुसार स्पर्धा होण्यात काहीच अडथळे येणार नाहीत,’’ अशी माहितीही तय्यब यांनी दिली.

‘‘आशियाई क्रीडा स्पर्धेतून नेहमीच ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळते. मात्र, या स्पर्धा एकदा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. चीनमधील करोनाच्या परिस्थितीमुळे स्पर्धेच्या आयोजनाविषयी संदिग्धताच होती. परंतु, यातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. त्यामुळे आता पात्रता फेरीसाठी वेगळय़ा कुठल्या स्पर्धेची गरज नाही,’’ असेही तय्यब यांनी सांगितले.