माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

आठ वर्षांच्या मुलीला अश्लील चित्रफीत दाखवणाऱ्या ६० वर्षांच्या व्यक्तीला मंगळवारी दादर पोलिसांनी अटक केली. आरोपींने आणखी मुलींचाही विनयभंग केल्याचा आरोप या मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. पण अद्याप एकाच मुलीचे कुटुंबिय तक्रार देण्यासाठी पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरोधात माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा >>>नायर रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी केला मानवी शरीरावर थेट सराव, सरकारी रुग्णालयामध्ये प्रथमच अशी सुविधा

तू एकटी असशील तेव्हा पिक्चर बघायला ये, असे आरोपीने पीडित मुलीला सांगितले. हा प्रकार तिच्या आईला समजताच तिने मुलीला विचारणा केली. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. आरोपी मुलीला एकटीला बोलवून अश्लीलच चित्रपट दाखवत होता. तक्रारीनुसार यापूर्वी दोन-तीन वेळा मुलीला आरोपीने अश्लील चित्रफीत दाखवल्या होत्या.

हेही वाचा >>>मुंबईच्या अनेक भागात ४८ तास पाण्याविना, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक विभागात पाणी पुरवठा झालाच नाही

हा प्रकार समजल्यानंतर पीडित मुलीच्या आईने मंगळवारी याप्रकरणी दादर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरोधात विनयभंग, माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर दादर पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी आणि पीडित मुलगी एकाच परिसरात वास्तव्यास आहेत. आरोपीने परिसरातील इतर मुलींनाही चित्रफीत दाखवल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. पण आरोपीविरोधात अद्याप एकच तक्रारदार पुढे आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.