शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मध्यभागातील नारायण पेठ तसेच मंगळवार पेठ भागात दहशत माजविणाऱ्या दोन गुंडांच्या विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशाने गुंडांना वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. येरवडा, विश्रांतवाडी, चतु:शृंगी, लोणीकंद भागातील १४ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>जगताप कुटुंबीयांच्या उमेदवाराचा विजय हीच खरी दिवंगत लक्ष्मण जगतापांना श्रद्धांजली!

नारायण पेठ भागात दहशत माजविणारा सराइत उमेश वसंत जंगम (वय २५, रा. ६८०, नारायण पेठ, लोखंडी तालीमजवळ) आणि सागर भुजंग नायडू (वय २७, रा. सदाआनंदनगर, मंगळवार पेठ) अशी कारवाई करण्यात आलेल्या गुंडाची नावे आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी जंगम आणि नायडू यांना कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. फरासखान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे आणि समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.

हेही वाचा >>>Kasba Chinchwad by-election: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीमध्ये आता ‘आप’ची एन्ट्री

दरम्यान, शहराच्या विविध भागातील १४ गुन्हेगारांना शहरातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनोज भगवान कांबळे (वय ४८), इस्माइल रियाज शेख (वय २२), देवीबाई रमेश राठोड (वय ४५), सुमन मोहन नाईक (वय ५०), भारती कृष्णा चव्हाण (वय ३३), कमल राजू चव्हाण (वय ५०), लक्ष्मी गोपाळ पवार (वय ४६), मोहित संजय सूर्यवंशी (वय २३), सूरज मनोहर माचरेकर (वय ४०, रा. भीमनगर, विश्रांतवाडी), दिलीप गोविंद सूर्यवंशी (वय ३१), विवेक चंद्रकांत चव्हाण (वय २७), गौरव दीपक मिसाळ (वय २१), नागनाथ संभाजी गिरी (वय १९), जावे जानशा शेख (वय ५३) अशी तडीपार करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.

गुंड टोळीवर ‘मोक्का’ कारवाई
शुक्रवार पेठेतील शिंदे आळी परिसरात दहशत माजविणारा गुंड उमेश मुकेश वाघमारे याच्यासह साथीदारांच्या विरोधात पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाईचे करण्याचे आदेश दिले. उमेश मुकेश वाघमारे (वय २४), मंदार संजय खंडागळे (वय २५), आदित्य लक्ष्मण बनसोडे (वय १९), गणेश मारुती शिकदार (वय १९), विनायक सुनील शिंदे (वय २२) अशी कारवाई करण्यात आलेल्या गुंडाची नावे आहे. खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव यांनी वाघमारे टोळीच्या विरोधात कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, अतिरिक्त आयु्क्त राजेंद्र डहाळे यांनी या प्रस्तावाची पडताळणी केली.