नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला धक्का बसला असून महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव केला. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१, तर गाणार यांना ६३०९ मते मिळाली आहेत. दरम्यान, या पराभवानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवर?
“नागपूरची जागा २०१०च्या आधी १८ वर्ष काँग्रेस समर्थित उमेदवारांच्या ताब्यात होती. मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर १८ वर्षांनंतर ती जागा आमच्या ताब्यात आली. गेली १२ वर्षी ती जागा भाजपाकडे होती. साधारणत: विजय झाल्यानंतर माजायचं नाही, पराभव झाल्यानंतर गाजायचं नाही, या तत्वावर आम्ही काम करतो. त्यामुळे या पराभवानंतर नक्कीच विश्लेषण करू. जिथे उणीव असेल, ती भरून काढण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्न करू”, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
हेही वाचा – MLC Election : नागपूरमधील भाजपाच्या पराभवानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा पराभव…”
“शिक्षकांच्या जुन्या पेंशनच्या मुद्द्यामुळे भाजपाला फटका बसल्याची चर्चा असताना, याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. जुनी पेंशन योजना ही काँग्रेसच्या काळातील समस्या होती. त्याचा दोष जर आम्हाला दिला जात असेल तर हे दुर्देव आहे”, असे ते म्हणाले.
“कोणत्याही निवडणुकीत विजय असो किंवा पराभव दोन्ही गोष्टींचं विश्लेषण झालं पाहिजे. अनेकदा विजय झाल्यानंतर आपण शांत बसतो. पण विजय झाल्यानंतर त्याचं योग्य विश्लेषण केलं नाही. तर विजय हा पराभवात परिवर्तीत होतो. आज पराभव झाला म्हणजे खचायचं कारण नाही. या पराभवातून नियोजनबद्ध रितीने पुन्हा पराभवाकडे जाता येतं”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.