पुणे : परदेशी विद्यापीठांना थेट भारतात शिक्षण संकुल सुरू करणे आव्हानात्मक आहे. मात्र, परदेशी विद्यापीठांनी भारतीय विद्यापीठांशी परस्पर सहकार्य करार करून अभ्यासक्रम राबवणे अधिक योग्य ठरेल, असे मत पद्म पुरस्कारप्राप्त डॉ. दीपक धर, प्रा. के. एन. गणेश यांनी व्यक्त केले.
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतर्फे (आयसर पुणे) डॉ. धर आणि प्रा. गणेश यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे संचालक प्रा. जयंत उदगावकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. पद्म पुरस्काराद्वारे राष्ट्राने आमच्या कार्याची दखल घेतल्याची भावना डॉ. धर, प्रा. गणेश यांनी व्यक्त केली. सत्कारापूर्वी डॉ. धर, प्रा. गणेश यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रा. गणेश म्हणाले, की विद्यापीठ सुरू करण्यासाठी जमिनीपासून ते पाणी पुरवठ्यापर्यंत अनेक परवानग्यांची मोठी प्रक्रिया आहे. येथील कार्यसंस्कृती आणि प्रशासन समजणे अवघड आहे. त्यापेक्षा भारतीय विद्यापीठांशी करार करत अभ्यासक्रम राबवणे अत्यंत सोपे आहे.
सध्या अनेक प्रकारचे ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यामुळे परदेशी विद्यापीठांनी भारतात येऊन अध्यापन करणे व्यवहार्य असल्याचे डॉ. धर यांनी नमूद केले. प्राथमिक स्तरावरील अध्यापन पद्धतीत आमूलाग्र बदल आवश्यक देशातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणावर सर्वाधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. काही मिळाले नाही म्हणून शिक्षकी पेशा स्वीकारण्याचा कल बदलावा लागेल. सध्याच्या काळात चांगल्या शिक्षकांची कमतरता असल्याचे प्रा. गणेश म्हणाले.