पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नव्याने प्रारूप प्रभाग रचना करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या २३ किंवा २४ जुलैला हे काम पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली. पुणे महापालिकेमध्ये चार सदस्यांच्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार आहेत. यासाठी २०११च्या जनगणनेचा आधार घेतला जाणार आहे. शहरात १६५ नगरसेवक असणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नगरविकास विभागाने नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा कालबद्ध कार्यक्रम नगरविकास विभागाने जाहीर केला आहे.
‘महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाकडून गुगल मॅपिंगचा वापर करून सध्या प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या २३ किंवा २४ जुलैपर्यंत हे संपूर्ण काम पूर्ण करण्यात येईल. यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रभागांच्या सीमारेषांची पाहाणी करण्यात येईल. त्यानंतर ही प्रारूप रचना महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात येईल. महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने अंतिम झालेली रचना ४ ऑगस्टपर्यंत नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येईल,’ असेही काटकर यांनी सांगितले.
माजी स्थायी समिती अध्यक्षांची त्रुटी टाळण्याची मागणी
महापालिकेच्या २०१७ ची प्रभागरचना करताना निवडणूक आयोगाने अनेक त्रुटी ठेवल्या होत्या. हे टाळण्यासाठी आगामी निवडणुकीची प्रभाग रचना कायदेशीर, पारदर्शक आणि नागरिक हिताच्या चौकटीत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष नीलेश निकम यांनी केली आहे. याबाबत निकम यांनी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांना नोटीस पाठविली आहे.
अशी काळजी घेतली जाते
महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करताना एकाच इमारतीचे, घराचे विभाजन दोन प्रभागांमध्ये करू नये, शहरातील मोकळ्या जागांसह इतर जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात येणे गरजेचे आहे. प्रभागांच्या सीमांचे वर्णन करताना रस्ते, नाले, नद्या, सिटी सर्व्हे क्रमांकाचा उल्लेख करणे गरजेचे आहे. प्रभागातील वस्त्यांचे शक्यतो विभाजन होणार नाही याची दक्षता घ्यावी, प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, उड्डाणपूल या नैसर्गिक मर्यादा विचारात घेउन निश्चित करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.