गेल्या ७० वर्षांत प्रगतीच्या बाजूने देशात काहीच घडले नाही असे बोल लावताना अमित शहा यांना इतिहास आणि वास्तवाचा सोयीस्कर विसर पडलेला दिसतो..

गेल्या ७० वर्षांत देशाने काहीच प्रगती केली नाही असे शहा यांचे म्हणणे असेल तर त्यातील आठ वर्षे देशात भाजप सत्तेवर होते त्याचे काय? तसेच काँग्रेसची घराणेशाही हा जर शाप असेल तर भाजपमध्ये प्रमोद महाजन ते गोपीनाथ मुंडे व्हाया एकनाथ खडसे अशी अनेक राजकीय घराणी तयार झाली आहेत, हे कसे विसरायचे?

स्वातंत्र्य दिन म्हणजे मेरे देश की धरती.. हे कंटाळवाणे फिल्मी राष्ट्रवादी गाणे ऐकून कान किटवून घेण्याचा काळ. तसेच स्वातंत्र्यानंतर आपण काय साधले अथवा साधले नाही याचे पक्षीय हिशेब मांडण्याचाही हाच काळ. तेव्हा आज देशाच्या सत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रगतीची समीकरणे मांडली जातील आणि आगामी वर्षांत ही प्रगती अधिक जोमाने कशी साधली जाईल याचे स्वप्नचित्र लाल किल्ल्यावरून रंगीतसंगीत वातावरणात सादर केले जाईल. आपली ऐतिहासिक परंपरा आणि लौकिक लक्षात घेता या दोन्ही सादरीकरणांत प्रामाणिकपणाचा अभाव असेल, असा निष्कर्ष आताच काढून ठेवणे धोक्याचे ठरणार नाही. याचे कारण राजकीय पक्षांची आत्मकेंद्रितता. या आत्मकेंद्रिततेमुळे आपला ‘आज’ हा ‘काल’च्या पायावर उभा आहे, हे मान्य करण्याचा मोठेपणा आपल्या सत्ताधाऱ्यांठायी नसतो. परिणामी जे काही बरे चालले आहे ते माझ्यामुळे आणि जे काही बरे नाही, ते माझ्या पूर्वसुरींकडून जाणता-अजाणता घडलेल्या पापांमुळे, असे युक्तिवाद सर्रास केले जातात आणि सत्ताधाऱ्यांचे भक्तगण या आनंदारतीत सामील होतात. फरक होतो तो या भक्तगणांच्या झेंडय़ांच्या रंगात. मानसिकतेत नव्हे. याचे कारण पक्षीय निष्ठांच्या पलीकडे जाऊन वस्तुस्थितीचे आकलन करण्याची सामाजिक क्षमता आपल्या देशातील आम जनतेत अद्याप विकसित झालेली नसून तीअभावी कोणतेही मूल्यमापन ‘ते’ आणि ‘आपण’ या दोन कंसांतच करावे लागते. देशाला मिळालेले स्वातंत्र्य आणि तद्नंतर आतापर्यंतची वाटचाल यास अपवाद नाही. तेव्हा १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आकर्षक पेहरावात नव्या चतुर आणि चमकदार घोषणांची आतषबाजी होण्यास काही तासांचाच अवधी असताना या वस्तुनिष्ठतेच्या अभावाचा पंचनामा करणे आवश्यक ठरते.

त्याचे तातडीचे कारण म्हणजे सत्ताधारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा  यांचे ताजे निवेदन. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने तिरंगा यात्रेस हिरवा झेंडा दाखवताना शहा  यांनी गेल्या ७० वर्षांत देशाने काहीही प्रगती साधली नाही, असे विधान केले. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सत्ताधारी पक्षातर्फे देशभर अशा तिरंगा यात्रांचा जल्लोश आयोजित करण्यात येणार असून शहा यांनी झेंडा दाखवलेली यात्रा उत्तर प्रदेशातील होती. या तिरंगा यात्रेसाठी शहा यांनी उत्तर प्रदेशचीच निवड करण्याचे कारण अर्थातच त्या राज्यात येऊ घातलेल्या निवडणुका, हे आहे, हे उघड आहे. वास्तविक एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष या नात्याने शहा यांनी त्यांची यात्रा जम्मू वा काश्मिरातून सुरू केली असती तर ते अधिक लक्षणीय ठरले असते. खेरीज, त्या राज्यातील वाहत्या जखमांच्या पाश्र्वभूमीवर ते फुंकर घालणारेही ठरले असते. परंतु त्याऐवजी शहा यांनी राष्ट्रभावनेचा अंगार वगरे चेतवण्यासाठी सोपा पर्याय निवडला. तो म्हणजे निवडणूककांक्षिणा उत्तर प्रदेश. त्यांच्या मते गेल्या ७० वर्षांत देशात प्रगतीचा पूर्ण अभाव आहे आणि याचे एकमेव कारण म्हणजे एकाच कुटुंबाच्या हाती एकवटलेली सत्ता. या घराणेशाहीने देशाचे तीनतेरा वाजले असे शहा म्हणतात. एरवी या विधानाकडे दुर्लक्ष करणे शहाणपणाचे ठरले असते. परंतु स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित तिरंगा यात्रेत ते केले गेल्याने त्याचा समाचार घेणे आवश्यक ठरते. तो घेतानाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गत ७० वर्षांतील किमान ८ ते ९ वष्रे अमित शहा यांचाच भाजप हा केंद्रात सत्तेवर होता. १९९६ साली काही दिवस आणि पुढे १९९८ ते २००४ या काळात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. भाजप आणि त्या परिवारातील सदस्यांच्या राष्ट्रवादाच्या ऊर्मी चेतवणाऱ्या पोखरण २ च्या अणुचाचण्या वाजपेयी यांच्याच काळात घडल्या आणि पाकिस्तानला कारगिल युद्धात धूळ त्यांच्याच काळात चारली गेली. किरकोळ किराणा क्षेत्रात १०० टक्के परकीय भांडवल येऊ देण्यासाठी आवश्यक असलेली ५६ इंची छाती असल्याचे फक्त वाजपेयीच आतापर्यंत दाखवून देऊ शकले आणि देशातील चार महानगरे महामार्गाने जोडण्याचा आणि त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचा शहाणा निर्णय वाजपेयी यांनीच घेतला. तसेच आíथक सुधारणांना मोठी गती देण्याचे धाडस दाखवले ते वाजपेयी यांनीच. तब्बल २२ वर्षांच्या खंडानंतर वाजपेयी यांच्याच काळात अमेरिकेचे अध्यक्ष भारतभेटीवर आले. अर्थात तत्कालीन अध्यक्ष क्लिंटन यांना बिल नावाने पुकारण्याइतकी वाजपेयी यांची त्यांच्याशी मत्री नसेलही. परंतु ज्या अध्यक्षाने १९९८ साली भारतावर आर्थिक र्निबध लादले त्यालाच भारतभेटीसाठी भाग पाडण्याइतका राजनतिक मुत्सद्दीपणा वाजपेयी यांच्या ठायी निश्चितच होता. हा सर्व तपशील नमूद करावयाचे कारण हे सर्व देशाच्या ७० वर्षांच्या इतिहासकाळातच घडले. परंतु अमित शहा यांच्या मते या ७० वर्षांत देशाने काहीही प्रगती केली नाही. तसेच या ७० वर्षांतील गेली अडीच वष्रे अमित शहा यांच्याच भाजपचे नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. तेव्हा या काळातही देशाने काही प्रगती केली नाही, असे मानावयाचे काय? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल तर इतका प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल शहा हे समस्त देशवासीयांतर्फे अभिनंदनास पात्र ठरतात.

या ७० वर्षांतील सहा दशके देशाची सूत्रे एकाच कुटुंबाच्या हाती होती हे दुसरे कारण प्रगतिशून्यतेसाठी शहा देतात. म्हणजे घराणेशाहीने देशास हतबल केले असा त्याचा अर्थ. याबाबत आम्ही त्यांच्याशी सहमतच आहोत. ही घराणेशाही हा देशातील राजकारणाला लागलेला शाप आहे, हे मान्यच. परंतु याबाबत शंका अशी की आज भाजपत अनेक नेत्यांची पोरेटोरे, पत्नी आदींचा भरणा झालेला दिसतो, तो का? उत्तर प्रदेशात माजी मुख्यमंत्री कल्याणसिंहांच्या इटाह मतदारसंघाचे प्रतिनिधित्व चिरंजीव राजबीर सिंगच करतात, महाराष्ट्रात दिवंगत प्रमोद महाजन ते गोपीनाथ मुंडे व्हाया एकनाथ खडसे अशी अनेक राजकीय घराणी तयार झाली आहेत, केंद्रात भाजपचे दिवंगत खजिनदार वेदप्रकाश गोयल यांचे सुपुत्र पीयूष मंत्रिपदी आहेत, दिवंगत राजमाता विजयाराजे शिंदे यांची कन्या राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी आहे, या कन्येचा पुत्र दुष्यंत हा खासदार आहे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांचे सुपुत्र अभिषेक लोकसभा सदस्य आहेत, हिमाचलचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धूमल यांचे चिरंजीव अनुराग ठाकूर हे भाजपच्या चमकत्या ताऱ्यांतील एक आहेत, दिवंगत इंदिरा गांधी यांच्या कनिष्ठ स्नुषा मेनका गांधी यांचे चिरंजीव वरुण हे खासदार आहेत आणि उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहत आहेत, देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे पंकज हे पुत्रकमल उत्तर प्रदेशात सरचिटणीसपदी आहे, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे सुविद्य चिरंजीव जयंत हे तर मोदी मंत्रिमंडळात आहेत, कर्नाटकात भाजपचे सोईस्कर बंडखोर येडियुरप्पा यांची गादी चालवणारे चिरंजीव राघवेंद्र हे आमदार आहेत, मध्य प्रदेशातील ज्येष्ठ भाजप नेते सुंदरलाल पटवा यांचेदेखील घराणे तयार झाले आहे. ही केवळ वानगी झाली. अशी आणखीही अनेक उदाहरणे देता येतील. खेरीज महाराष्ट्र पातळीवर घराणेशाहीचे प्रतीक असलेल्या शिवसेनेबरोबर तर भाजपची सत्तासोबतदेखील आहे. तेव्हा काँग्रेसची घराणेशाही ही जर शाप असेल तर ही नवघराणी देशाला मिळालेला उ:शाप मानावयाचा काय, याचेही उत्तर शहासाहेबांनी दिले असते तर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस देशाचे राजकीय प्रबोधन होण्यास मदत झाली असती. असो.

या प्रतिपादनाचा उद्देश इतकाच की देशाचा सत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना राजकीय पक्षांनी या मुहूर्तावर काही किमान प्रामाणिकपणा दाखवावा. तूर्त तो कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाही, हे स्वातंत्र्याच्या सत्तरीतील सत्य आहे.