ज्यांना ‘उद्या’ आहे, त्यांना मातृभूमी ‘आज’ आपली वाटत नसेल तर या देशाच्या प्रगतीची धुरा वाहणार कोण, याचा विचार देशाच्या धुरीणांनी करायला हवा..

प्रगतीची, उत्तम जगण्याची ऊर्मी अधिक आकर्षक असते, आणि त्या साध्यासाठी आजच्या पिढीस मातृभूमीची सेवा, स्वदेशी वा आत्मनिर्भरता असले शब्दप्रयोग बांधून ठेवू शकत नाहीत. त्यामुळे उत्पादक वयांतील तरुण/तरुणींचे परदेशांकडे वाढते स्वेच्छा विस्थापन पाहता, शब्दसेवेपेक्षा अधिक काही रोकडे करावे लागेल..

भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान ना केवळ आर्थिक आहे, ना सामाजिक, ना धार्मिक. ते आहे प्रज्ञावंतांच्या देशत्यागाचे. ‘लोकसत्ता’ गेली काही वर्षे सातत्याने हा धोका दाखवून देत आला आहे. त्याची सत्यता ‘द इंडियन एक्स्प्रेस’मधील वृत्तान्त सिद्ध करतो. या वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींनी गेल्या दोन दशकांतील दहावी-बारावी परीक्षांतील गुणवंतांचा धांडोळा घेतला. आपल्याकडे मोठे कवतिक असते या परीक्षांतील गुणवंतांचे. जणू गगनासच गवसणी घातली अशा पद्धतीने या गुणवंतांचे लाडकोड केले जातात. स्थानिक लोकप्रतिनिधी ते पालक या गुणवंतांना पेढे भरवितानाची हास्यास्पद छायाचित्रे प्रसिद्ध होतात आणि विविध खासगी क्लासवाले या विद्यार्थ्यांच्या शिकवण्यावर दावा करू लागतात. गुणवंत यादीत यावयाचे असेल तर आमची शिकवणी घ्या, असा त्याचा अर्थ. तेव्हा असे कोडकौतुक करवून घेतलेले गेल्या दोन दशकांतील प्रज्ञावान सध्या काय करीत आहेत हे शोधून काढणे, हा या वृत्तान्तामागील विचार. त्यातून दिसते ते असे की, गेल्या २० वर्षांत आपल्याकडे गुणवंतांच्या यादीत जे कोणी झळकले त्यातील निम्म्याहून अधिक यशस्वी विद्यार्थी आज भारतात नाहीत. विकसित देश, त्यातही अमेरिका, या विद्यार्थ्यांना मातृभूमीपेक्षा अधिक जवळची वाटते, असे हा वृत्तान्त तपशिलासह दाखवून देतो. तो अजिबात धक्कादायक नाही. देशप्रेम वगैरे ठीक. ते असेलच. पण त्यापेक्षा प्रगतीची, उत्तम जगण्याची आणि काहीएक करून दाखवण्याची ऊर्मी अधिक आकर्षक असते, आणि त्या साध्यासाठी आजच्या पिढीस मातृभूमीची सेवा, स्वदेशी वा आत्मनिर्भरता असले शब्दप्रयोग बांधून ठेवू शकत नाहीत. हा इशारा आहे.

आपल्या राज्यकर्त्यांनी त्याची दखल घ्यायला हवी. कारण अत्यंत उत्पादक वयांतील तरुण/तरुणींचे परदेशांकडे स्वेच्छा विस्थापन आपण सध्या मोठय़ा प्रमाणावर अनुभवत असून जगातील सर्वात मोठा ‘मानवी निर्यातदार’ अशी आपली ओळख होऊ लागली आहे. या संदर्भात २०१८ पर्यंत प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार त्या वेळी या वयोगटातील पावणेदोन कोटी भारतीय परदेशांत होते. त्यात आजमितीस वाढच झालेली असण्याची शक्यता अधिक. या स्थलांतरितांच्या मुद्दय़ावर आपण मेक्सिको वा चीन या देशांनाही मागे टाकल्याचे दिसते. एका मुद्दय़ाबाबत तरी आपण चीनवर आघाडी घेऊ शकल्याचा आनंद मानायचा असेल तर गोष्ट वेगळी. पण चिनी तरुणांच्या आशाआकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा यांची परिपूर्ती करण्याची क्षमता त्या देशाने गाठली असा याचा खरा अर्थ आहे. कारण चिनी तरुणांना उच्च शिक्षण वा उद्यमशीलतेच्या संधी यासाठी चीन सोडावा लागत नाही. आपल्याबाबत मात्र असे नाही, असा ठाम निष्कर्ष या वृत्तावरून काढता येईल. कारण स्थलांतरित गुणवंतांतील निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांनी विज्ञान वा तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्चशिक्षण/संशोधन यासाठी अमेरिका वा अन्य विकसित देशांचा आसरा घेतल्याचे दिसते. या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियाही बोलक्या आहेत. परदेशाने काय दिले, या प्रश्नावर यातील बहुसंख्यांचे उत्तर- ‘संधी’ असे होते. काही वर्षांपूर्वीची रसायनशास्त्रातील नोबेल विजेते डॉ. वेंकटरमण रामकृष्णन यांची प्रतिक्रिया या संदर्भात नोंदवायला हवी. ‘‘भारतात राहिलो असतो तर नोबेल वगैरे सोडा, पण हे संशोधनही करू शकलो नसतो,’’ असे जळजळीत उद्गार या डॉ. रामकृष्णन यांनी आपल्या शाळेकडून सत्कार स्वीकारताना काढले होते, याचे स्मरण याप्रसंगी दाहक पण वास्तववादी ठरेल. त्या डॉ. रामकृष्णन व अन्यांचे अनुकरण आजचा तरुणवर्ग करताना दिसतो. तो भारतात थांबण्यास अजिबात तयार नाही.

हे गंभीर आहे. कारण ज्यांना ‘उद्या’ आहे, त्यांना मातृभूमी ‘आज’ आपली वाटत नसेल तर या देशाच्या प्रगतीची धुरा वाहणार कोण, याचा विचार देशाच्या धुरीणांनी करायला हवा. इतक्या मोठय़ा संख्येने जर आपल्या इथून स्थलांतर होत असेल तर येथे काही तरी चुकते आहे, याचा विचार तरी आपण करणार आहोत की नाही? आपल्या विद्यमान सत्ताधीशांना स्वदेश, स्वधर्म आदी मुद्दय़ांवर गजर करणे आवडते. या चित्ताकर्षक शब्दसेवेने त्यांना मिळणाऱ्या मतांचे प्रमाण वाढलेही असेल. पण त्याबरोबर स्वदेशाचा त्याग करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसते. याचा अर्थ असा की, आजच्या तरुणांना हृदयास हात घालणाऱ्या शब्दांपेक्षा खिशात हात घालून जे काही बाहेर येते ते अधिक मोलाचे वाटते. पण त्याकडे आपले पूर्ण दुर्लक्षच. आपल्या शिक्षणावरील खर्चात वाढ केली जावी अशी मागणी गेली सहा वर्षे अनेकांनी केली. त्यात रा. स्व. संघप्रणीत संघटनाही आहेत. पण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या जेमतेम दोन टक्क्यांची मर्यादा आपण अद्यापही ओलांडू शकलेलो नाही. विज्ञान वा तंत्रज्ञान क्षेत्राबाबत तर आपली स्थिती यापेक्षाही अगदी दयनीय. त्यासाठी आपली तरतूद जेमतेम एक टक्क्याची. चांद्रयान मोहिमेबाबत गोडवे गाणारे खूप. पण प्रत्यक्षात अवकाश संशोधनाच्या तरतुदीस कात्री. हीच बाब मुंबईस्थित टाटा मूलभूत संशोधन संस्थेस मिळणाऱ्या आर्थिक अनुदानाची. अशा परिस्थितीत विज्ञान/तंत्रज्ञान आणि अन्य उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सातत्याने वाढतेच असेल, तर त्यात आश्चर्य ते काय?

ही परिस्थिती बदलायची असेल तर आपणास शब्दसेवेपेक्षा अधिक काही रोकडे करावे लागेल. ‘‘सैन्य पोटावर चालते’’ असे नेपोलियनसारखा कसलेला युद्धनेता म्हणत असे. म्हणजे देशभक्ती, देशाभिमान यांच्या जोडीला सैन्यासाठी उत्तम पोटापाण्याची व्यवस्था करावी लागते. म्हणजेच त्यासाठी भरभक्कम तरतूद करावी लागते. हे नग्नसत्य विद्यार्थी वर्गासाठी त्याहूनही अधिक रोकडेपणाने लागू होते. या विद्यार्थ्यांसाठी सढळ हस्ते पैसे खर्च करण्याची आपली ऐपत नाही आणि वर त्यांनी खावे काय, प्यावे काय, प्रेम कोणत्या धर्मीयांवर करावे वगैरे निर्थक-निरुपयोगी सल्ले मात्र देणार, हे कसे सहन होईल? उच्च शिक्षणासाठी परदेशांत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीवर नजर जरी टाकली तरी सहज उठून दिसणारी बाब म्हणजे या विद्यार्थ्यांचे मूलस्थान. यातील बहुतांश विद्यार्थी हे उत्तरेकडील राज्यांचे आहेत. म्हणजे तेथे त्यांना प्रगतीच्या संधी नाहीत. हे विद्यार्थी प्राणपणाने अभ्यास करून अशा परीक्षांतून यश मिळवतात आणि अधिक शिक्षणासाठी परदेशाची वाट धरतात. हे विदारक सत्य आज देशात सर्वत्र दिसते. ग्रामीण भागांतून स्थलांतरितांची पहिली पिढी मुंबई/दिल्लीपर्यंत पोहोचते आणि मुंबई/दिल्लीतले परदेशी विद्यापीठांतूनच सुरुवात करतात. या बुद्धिवहनाची (ब्रेन ड्रेन) चर्चा आपल्याकडे कित्येक दशके सुरू आहे. पण त्यानंतरही वास्तवात तसूभरही बदल झाल्याचे दिसत नाही. आज शहरांत तर अशा अनेक वस्त्या आहेत की जेथे फक्त स्थलांतरित विद्यार्थ्यांचे जीर्ण पालक राहतात. तरुण औषधालाही सापडणार नाही, अशी स्थिती.

ती बदलावी असे आपणास वाटते काय, तो मुद्दा आपल्या राष्ट्रीय कार्यक्रमपत्रिकेवर असतो काय, नसल्यास आपल्या देशातील सुजाण नागरिकांना हे सत्य टोचते काय, असे अनेक प्रश्न या संदर्भात उपस्थित होतात. देशाच्या दुर्दैवाने त्या सर्वाची उत्तरे नकारात्मक आहेत. ‘‘पुढची पिढी ही पायाने मतदान करते,’’ असे मत अलीकडे अनेक चर्चातून व्यक्त होते. याचा अर्थ या पिढीचा तरुणवर्ग स्थलांतर करून आपले मत व्यक्त करतो. हे पावलांचे मतदान थांबवण्यास सर्वाधिक प्राधान्य हवे. ती खरी देशसेवा ठरेल.