प्रामाणिक निधर्मीत सोयीस्कर सेक्युलरिष्टांविषयी नाराजी आहे ती रास्तच, पण घटनात्मक पदावरून प्रामाणिक निधर्मवाद जपायचा की कुत्सित उल्लेख करायचा?
अंगावर झूल मिरवायची घटनात्मक पदाची, शपथ घ्यायची त्याच घटनेनुसार काम करेन याची आणि प्रत्यक्षातील कृती मात्र ‘वरून कीर्तन आतून तमाशा’ अशी हे अयोग्यच. बरे, हा आग्रह शाळा, लोकल, व्यायामशाळा, ग्रंथालये यांबद्दल नाहीच..
पोलिसाने नागरिकास कायदाभंग करीत नाही म्हणून हिणवावे, भ्रष्टाचार करून करबुडवेगिरी करीत नाही म्हणून सरंजामदाराने नोकरदाराची छीथू करावी, अरबटचरबट खात नाही म्हणून वैद्याने आरोग्यदायी जगणाऱ्यास कमी लेखावे, परस्त्रीशी गैरवर्तन करत नाही म्हणून कोणास नेभळट म्हटले जावे आणि राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांस ‘धर्मनिरपेक्ष’ असे कुत्सितार्थी संबोधावे यात काहीही गुणात्मक भेद नाही. उलट यात उभयपक्षी साम्यच. उभयपक्षी म्हणजे वर उल्लेखिलेल्या काल्पनिक उदाहरणांतील व्यक्ती आणि वास्तवातील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या दोघांचीही ‘उंची’ एकच. सर्वसाधारणपणे आपल्या कर्मातून व्यक्तीची उंची आहे त्यापेक्षा अधिक वाटू शकते. पण अलीकडील काही कृत्यांतून या महामहिमांनी स्वत:ची उंची दिवसेंदिवस कमी करण्याचा चंग बांधलेला दिसतो. अर्थात यातही काही धक्का बसावा असे नाही. पदावरून उतरताना त्या पदाची उंची होती त्यापेक्षा किती तरी कमी करून दाखवण्याची उदात्त परंपरा आपल्या देशास आहे. राज्यपालपद हे अशा यशस्वी उंचीआकसूंतील अग्रणी. महाराष्ट्राचे हे सध्याचे महामहीम तर या राष्ट्रव्यापी राज्यपाल उंचीआकसू अभियानाचे नेतृत्व करू शकतील. केंद्रातील सत्ताधारी भाजपकडून त्यांनी या अभियानासाठी एखादे चमचमीत नाव तसेच यशस्वितेसाठी ‘चार य’ किंवा ‘पाच प’ यांसारखा गुरुमंत्रही मिळवावा. या संभाव्य स्पर्धेत अनेक राज्यपालांत अहमहमिका असली तरी महाराष्ट्राचे महामहीम त्यातही आघाडी घेतील यात तिळमात्रही शंका नाही.
याचे कारण त्यांनी थेट राज्यघटनेलाच घातलेला हात. हे महामहीम ज्या पदावर आहेत ते घटनात्मक. ते स्वीकारताना त्यांनी जी शपथ घेतली ती राज्यघटनेच्या आधारे. तेव्हा या बुद्धिमान महामहिमांस या घटनेत काय आहे हे ठावकी नाही, असे कसे म्हणणार? मग प्रश्न असा की ‘सेक्युलर’ या शब्दाचा त्यांना इतका दुस्वास कसा? आणि तो आहे हे स्वीकारले तरीही घटनात्मक पदावरच आरूढ झालेले असल्याने तो दुस्वास निदान बाहेरून दिसणार नाही, इतके चातुर्य तरी आपले महामहीम दाखवते. ‘सेक्युलर’ म्हणवून घेणाऱ्यांनी गेली कित्येक वर्षे ज्या बौद्धिक लांडय़ालबाडय़ा केल्या त्यामुळे प्रामाणिक निधर्मीत या सोयीस्कर सेक्युलरिष्टांविषयी नाराजी आहे; ती मान्य आणि रास्तही. पण म्हणून प्रामाणिक निधर्मी संकल्पनेचा राग बाळगणे योग्य नव्हे. औषधाची मात्रा चुकली म्हणून सरसकट वैद्यकीय पेशाविषयी काही कोणी राग बाळगत नाही. पण हे कळण्यासाठी काहीएक प्रौढत्व लागते. आणि मुळात आपले महामहीम काही प्रामाणिक निधर्मीच्या गटात असल्याचा दावा स्वत:ही करणार नाहीत. पण म्हणून निधर्मिकतेचा उच्चार अपशब्दाच्या पातळीवर नेण्याची त्यांना गरज नव्हती. या निधर्मिकतेला एकदाची मूठमातीच द्यायला हवी असे त्यांना व्यक्ती म्हणून वाटू शकते. त्यात काही गैर नाही. अशा अनेक नेत्यांची सध्या चलती आहेच. पण हे अन्य नेते महामहीम नाहीत. त्यामुळे या कोश्यारी यांनीही आपली राज्यपालपदाची वस्त्रे उतरवावीत आणि खुशाल त्रिशूल/ कमंडलू घेऊन उत्तराखंडाची वाट धरावी. एकही मराठीजन त्यांना हिंग लावून विचारायला जाणार नाही. पण निदान राज्यपालपदी आहेत तोवर तरी त्यांना नाइलाजाने का असेना ‘निधर्मी’तत्त्वाचा आदर करावाच लागेल.
हे महामहीम संतापले कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवस्थानांची टाळेबंदी अद्याप उठवलेली नाही, म्हणून. हे महामहीम ज्या दिवशी या विषयावर काही खरडत होते त्याच दिवशी महाराष्ट्राने आणखी किती खबरदारी घेणे आवश्यक आहे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी देत होते. त्याच वेळी भाजपचे कार्यकर्ते राज्यभर मंदिर उघडण्यासाठी आंदोलने करीत होते. या आंदोलनांत अंतर-आरोग्य किती पाळले गेले हे दिसलेच. ते असो. पण या सर्व तीन घटना एकत्र पाहिल्यास, या महामहिमांनी स्वत:स कोणा किरकोळ बुद्रुक नेत्याच्या पातळीवर आणून बसवल्याचे दिसेल. अर्थात, आसिंधुहिंदुविदुषी कंगना राणावत आणि वंगविद्याचंडिका पायल घोष यांच्याशी संस्कृतिसंवर्धनाच्या उपायांवर चर्चा करण्याइतका वेळ या महामहिमांहाती असेल तर त्यांना भाजपमधील अलीकडील नवहिंदुत्ववादी वंदनीय वाटल्यास नवल नाही. त्यास कोणी आक्षेप घेण्याचेही कारण नाही. पण या महामहिमांची दखल घ्यावी लागते ती त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामुळे.
या पत्रात अजूनही बंद राहणाऱ्या शाळांविषयी चिंता व्यक्त केली असती तर या महामहिमांच्या मनांत किती बुद्धिप्रेम आहे हे पाहून मनी हर्ष दाटला असता. पण ते त्यांनी केले नाही. या महामहिमांनी लोकल प्रवासाअभावी अतोनात वाहतूक यातना भोगणाऱ्या सामान्य मुंबईकरांची व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडली असती तर त्यांच्या हृदयातील ओलाव्याचा आदर करता आला असता. ते त्यांनी केल्याचे दिसले नाही. गेले आठ महिने व्यायामशाळांच्या टाळेबंदीने रोजगार गमावणारे प्रशिक्षक आणि आरोग्य गमावणारे सभासद यांच्याविषयी महामहिमांनी मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकला असता तर त्यांच्या ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्’ वगैरे तत्त्वज्ञानावरील विश्वासाचे दर्शन घडून त्यांच्याविषयी आदराचे तृणांकुर उगवू शकले असते. ग्रंथालये- वाचनालये उघडावयास सांगितले असते तरी १५ ऑक्टोबरचा वाचन प्रेरणा दिन गोड झाला असता. पण राज्यपालांनी तेही केले नाही. तेही ठीक. मग केले काय? तर धर्मस्थळे उघडली नाहीत, म्हणून तक्रार. ‘निधर्मी’ या तत्त्वाविषयी त्यांनी जी काही भावना व्यक्त केली ती पाहता धर्मस्थळे म्हणजे त्यांना काय अभिप्रेत आहे हे स्वतंत्रपणे सांगण्याची गरज नाही. खरे तर, महामहिमांचे वय लक्षात घेतल्यास त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ाविषयीही खूप तक्रार करण्यासारखे काही वाटणार नाही. सहस्रचंद्रदर्शनाच्या सोहळ्याकडे मोठय़ा वेगाने झेपावणाऱ्या महामहिमांना कधी एकदा जपजाप्य करण्यास मंदिरात जाईन असे होणे साहजिक.
पण मग त्यांनी घटनात्मक पदावर राहण्याचा लोभ सोडावा आणि राजकारणाची वैषयिक भूक भागवावी. अंगावर झूल मिरवायची घटनात्मक पदाची, शपथ घ्यायची त्याच घटनेस स्मरून काम करेन याची आणि प्रत्यक्षातील कृती मात्र ‘वरून कीर्तन आतून तमाशा’ अशी, हे अयोग्यच. या निमित्ताने वयाच्या या टप्प्यावर तरी निदान महामहिमांनी आपल्या प्रवासाची दिशा धर्माकडून अध्यात्माकडे वळवावी. त्याची त्यांस (आणि ते आपले महामहीम असल्याने महाराष्ट्रास) गरज आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रात ते ‘देवदेवता कुलूपबंद आहेत’ अशी तक्रार करतात, त्यातून या अध्यात्म वळणाची गरज ध्वनित होते. देवदेवतांना कसे कुलूप? तो तर चराचरात वसलेला असल्याचे जाणते सांगतात! ‘देवळे म्हणजे नाना शरीरे, जेथे जिवेश्वर राईजे’ असे म्हणणारे रामदास वा ‘तुम्हापाशी आम्ही येऊनिया काय, वृथा सीण आहे चालण्याचा’ असे विचारणारे तुकाराम पेलणे वयोमानामुळे महामहिमांना जड जात असेल तर त्यांनी राजभवनातील मोरांना चारा घालता घालता ‘देव देव्हाऱ्यात नाही’, ‘कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी’ वगैरे उत्तम मराठी गाणी ऐकून प्रबोधन करून घ्यावे. कंगना, पायल या विदुषींशी चर्चेइतका आनंद त्यात नसेल हे कबूल. पण प्रबोधनातील आनंद हा आध्यात्मिक
असतो, धार्मिक नव्हे हेदेखील त्यांना या निमित्ताने कळेल.
आणि हेही कळेल त्यांना की आपण हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि भारतीय असंतोषाचे पितृत्व स्वीकारणाऱ्या, तर्कवादाचे अधिष्ठान असणाऱ्या, समाजसुधारणेची गंगोत्री, घटनाकाराचे जन्मस्थान असणाऱ्या महाराष्ट्र नामक राज्याचे राज्यपाल आहोत. ‘मुकी बिचारी कुणी हाका’ या प्रकारे चालणाऱ्या मेंढय़ांना हाकणारे मेंढपाल नाही.