तातडीचे उपाय अन्य प्रगत देशांप्रमाणे आपणही केले आहेत. ‘हात धुवा’ हे सांगावे लागते हे खरे, परंतु तेही केले आहे. दीर्घकालीन उपायाची चर्चा तूर्तास नाहीच..

जागतिकीकरणाचे काटे उलटे फिरवू पाहणारे संकुचित सुरक्षावादी नेते जगात अनेक ठिकाणी सत्तेत येत असतानाच करोना विषाणूचा धुडगूस रंगात यावा हा दुहेरी दुर्दैवी योगायोग! एखाद्याचा साप आणि विंचू दोघांनीही पाठोपाठ चावा घ्यावा इतका दुर्दैवी! या दुर्दैवाची लक्तरे जगभरातील बाजारपेठांत लटकलेली दिसतात ती याचमुळे. भारतीय भांडवली बाजार तर गुरुवारी सुमारे तीन हजार अंशांनी गडगडला. खरे तर बाजारात जे काही झाले त्याचे वर्णन घसरणे, कोसळणे, गडगडणे अशा गुरुत्वबल निदर्शक विशेषणांनी करता येणार नाही इतके भयानक आहे. आधीच मुळात आपल्याकडे अर्थव्यवस्थेची साग्रसंगीत बोंब होती. गेल्याच आठवडय़ात ‘येस बँके’ने आचके दिल्याने सरकारी हृदय आणि बाजारही द्रवलेला होता. त्यातूनच राणा कपूर याच्यासारख्या उचापतखोर गृहस्थाने केलेल्या भानगडींची नुकसानभरपाई प्रामाणिक करदात्यांच्या पशातून करावी असा सद्विचार आपल्या कल्याणकारी जनहितदक्ष सरकारने घेतला. त्या धक्क्यातून बाजार सावरायच्या आतच या करोना विषाणूने भारतात हातपाय पसरायला सुरुवात केल्याचे वृत्त आले आणि हा बेसावध बाजार पुरताच गत्रेत गेला. मुंबई, पुणे, नागपूर आदी ठिकाणी हे विषाणूबाधित रुग्ण आढळून आल्याने या जागतिक आजाराने आपल्याही अंगणात हातपाय पसरल्याचे यातून स्पष्ट झाले. परिणामी बाजाराला हुडहुडीच भरली. अशा परिस्थितीत या आजाराने निर्माण झालेल्या आरोग्य वास्तवाचा विचार करायला हवा.

तो करू गेल्यास या आजाराच्या गांभीर्याचा गुणाकार होत असल्याचे आढळेल. अशा प्रकारच्या आजाराची ही काही पहिलीच साथ नव्हे. या संदर्भात प्लेग, हगवण आदी पुरातन साथींचा इतिहास काढण्याचे कारण नाही. अलीकडच्या काळात प्रारंभी आलेला सार्स (सीव्हिअर अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम), बर्ड फ्लू, एड्स आदींच्या आठवणी ताज्या आहेत. सार्सचाही उगम चीनमधलाच आणि त्याचीही लक्षणे आताच्या करोनासारखीच. पण तो आताच्या करोनापेक्षा जास्त भयानक होता. त्याचा पसरण्याचा वेग करोनाच्या तुलनेत मंद होता पण सार्सबाधित रुग्णांनी प्राण सोडण्याचे प्रमाण करोनापेक्षा काही पटींनी अधिक होते. साधारण आठ हजार लोकांना जगभर त्याची बाधा झाली आणि त्यापैकी ७७५ जणांनी प्राण सोडले. याचा अर्थ बाधितांपैकी सुमारे १० टक्के या आजारात बळी पडले. त्या तुलनेत करोना हा अगदीच मवाळ वाटावा असा. लाखांहून अधिकांना करोनाने गाठले असले तरी त्यातील बळींची संख्या तीन हजारांच्या आसपास आहे, ही बाब लक्षात घेण्यासारखी. पण तरीही करोनाचा प्रभाव आणि परिणाम सार्सपेक्षा अधिक दिसतो. असे का?

या प्रश्नाचे उत्तर सार्सकाळात जी ‘सोय’(?) नव्हती पण आता आहे अशा रचनेत आहे. ती म्हणजे समाजमाध्यमे. माहितीचे वहन ही एरवी कौतुकाची बाब असली तरी अशा काळात तो शाप ठरू लागल्याचे दिसून येते. दिल्लीतील दंगल असो वा करोना विषाणूची साथ. यात समाजमाध्यमांचा वाटा जीवघेणा राहिलेला आहे. महाराष्ट्र सरकारातील उच्चपदस्थ वैद्यक अधिकाऱ्याने हे वास्तव समोर मांडताना खऱ्या आजाराच्या साथीपेक्षा भीतीचीच साथ किती वेगाने पसरली आहे हे दाखवून दिले. हा परीक्षेचा काळ. त्यात या साथीची भुमका मोठय़ा प्रमाणावर उठल्याने अनेक घराघरांत पालकांना जणू फेफरे भरू लागले असून त्या साथीपेक्षा या आजारी मनांवर प्राधान्याने उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर आली आहे. वास्तविक महाराष्ट्रापुरते पाहू गेल्यास जे काही मोजके(च) रुग्ण या आजाराची बाधा झाल्याचे सापडले आहेत त्यांची ही आजार लक्षणे एरवी दुर्लक्ष करावी अशी क्षुल्लक आहेत. त्यातील काहींच्या अंगी ना ज्वर आहे ना त्यांना तीव्र सर्दीखोकला झाल्याचे दिसते. पण तरीही करोनाच्या चाचणीत ते बाधित आढळले आहेत. यामुळे वैद्यकीय वर्गदेखील गोंधळात पडला असून या आजाराचे नक्की स्वरूप काय याबाबतच संशय निर्माण झाला आहे.

पण तसे काही बोलून दाखवावे तरीही पंचाईतच. तसे केल्यास या अति माध्यम-केंद्री काळात संबंधितांवर बेजबाबदार आणि असंवेदनशील वर्तनाचा ठपका यायचा. तो टाळणे असाच सरकारी यंत्रणांचा प्रयत्न असून त्याबाबत त्यांना दोष देता येणार नाही. अशा वातावरणात ज्यावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवणे केवळ अशक्य आहे ती जबाबदारी सरकारने नागरिकांच्या गळ्यात टाकणेही साहजिकच. त्यामुळेच मग हात धुवा आदी सूचनांचा मारा. वास्तविक नागरिकांना हात धुवा असे सांगावे लागणे हाच मुळात कमीपणा आहे हे आपल्या लक्षातही येत नाही. हात धुणे आणि काही किमान स्वच्छता नियमन करणे यासाठी कोणत्याही साथीच्या आजाराची गरज नाही. पण तरीही आपल्याला इतक्या ‘गंभीर’ आजारासाठी इतक्या शालेय सूचना द्याव्या लागतात. त्या दिल्या म्हणजे काय जणू आणीबाणीच असे समजून त्यामुळे हात धुण्याच्या रसायनांचा बाजारात तुटवडा. जसे काही या रसायनांशिवाय हात धुताच येत नाहीत. अशा वेळी अशा प्रकारच्या भयनिर्मितीचा फायदा सर्वाधिक कोणास होतो याचाही विचार करण्याइतका विवेक आपल्या समाजात नाही. तेव्हा विविध सूचना जारी करण्याचा सुलभ मार्ग सरकारांनी अंगीकारल्यास त्यात त्यांना दोष कसा देणार?

अशा मार्गात बंदी हे सर्वात प्रभावी अस्त्र ठरते. मग जमावबंदी ते परदेश प्रवासबंदी असे अनेक उपाय योजले जातात. तसे करणे सोपे आणि राजकीयदृष्टय़ा शहाणपणाचे असते. तेच आपण करीत आहोत. जगात या संदर्भात काय काय घडामोडी घडत आहेत ते पाहून आपल्याकडेही उपाययोजना केल्या जात आहेत ही स्वागतार्हच बाब. असे उपाय लगेच दिसून येतात आणि त्याचे श्रेयअपश्रेयही लगेच पदरात पडते. त्या तुलनेत दीर्घकालीन उपायांचे महत्त्व आपणास कमी. उदाहरणार्थ सार्वजनिक आरोग्यावर आपला होणारा खर्च. तो सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या जेमतेम एक टक्का इतकाच आहे. तो २.५ टक्क्यांवर नेण्याच्या वल्गना गेली काही वर्षे अनेकदा केल्या गेल्या. पण परिस्थितीत काडीचीही सुधारणा नाही. या आघाडीवर विद्यमान सत्ताधाऱ्यांनी ठेवलेले लक्ष्य आहे किमान १,४५,००० कोटी रुपयांच्या खर्चाचे. पण प्रत्यक्षात यासाठी तरतूद त्याच्या निम्म्यापेक्षाही, म्हणजे ७० हजार कोटी रुपयांपेक्षाही कमी आहे. जी आहे तीदेखील प्राधान्याने ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’साठी. म्हणजे अन्य आरोग्यदायी उपाययोजनांवर खर्च करण्याइतका पसाच आपल्या हाती नाही. अशा वेळी एक महिन्यासाठी परदेशांतून भारतात येण्याची बंदी घालण्याचा निर्णय स्वागतार्ह खचितच. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घातलेल्या युरोपीय प्रवासबंदीच्या तुलनेत आपल्या निर्णयाचे नकारात्मक परिणाम अधिक संभवतात.

बाजारपेठेत गुरुवारी जे काही झाले त्यातून हेच दिसून येते. आता तर परिस्थिती अशी की या आजाराने होणाऱ्या नुकसानीपेक्षा त्याच्या भीतीने सहन करावे लागणारे आर्थिक नुकसान अधिक संभवते. तेव्हा समाजमाध्यमे आदींच्या कच्छपि न लागता नागरिकांनी जास्तीत जास्त विवेक दाखवावा. सार्स, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू वगैरे अलीकडच्या साथींपेक्षा करोना भयानक असल्याचे अद्याप तरी दिसून आलेले नाही. तसे दिसले तर तेव्हा त्याची भीती बाळगावी. संभाव्य संकटास सामोरे जाण्याची तयारी ठेवणे आणि त्याची भीती वाटून आकसणे या दोन भिन्न बाबी आहेत. त्यातील फरक आपण लक्षात घ्यायला हवा. त्यासाठी तोपर्यंत समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकांतील २७व्या श्लोकात थोडा बदल करून ‘भयाच्या भयीं काय भीतोस लंडी। धरी रे मना धीर धाकांसी सांडी॥’ याचा आठव योग्य ठरेल.