सगळी पदे मिळत असताना वा मिळाल्यानंतरही सुषमा स्वराज यांचा सहजसंपर्क, स्वभावातील ममत्व आणि साधेपणा हे गुण टिकून राहिले..

भारतीय राजकारणाच्या उत्साही निरीक्षकांना हे दृश्य सहज आठवेल. अपेक्षेपेक्षाही प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या शपथविधीचा प्रसंग. संभाव्य मंत्री कोण असतील, याची उत्कंठा शिगेला गेलेली. समारंभस्थळी येणारा उजवीकडे वळून मंचाकडे जाणार की डावीकडे दर्शकांत बसणार, यावरून ती व्यक्ती नव्या मंत्रिमंडळात असणार की नाही हे लक्षात येत होते. सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती सुषमा स्वराज यांच्याबाबत. आणि ती केवळ तटस्थ उत्सुकता नव्हती. तर तीमागे एक इच्छा होती. त्यामुळे आपल्या नेहमीच्या डौलात ज्या वेळी सुषमा स्वराज तेथे आल्या, तेव्हा त्या उजवीकडे वळतात की डावीकडे हे पाहताना अनेकांचे श्वास रोखले गेले होते आणि त्यांनी डावे वळण घेतल्यावर एक सामुदायिक चुकचुकाट घराघरांतून उमटला.

ही सुषमा स्वराज यांची कमाई. पूर्णपणे स्वत:ची अशी. वास्तविक आपण प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी आधीच जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्या रिंगणात उतरल्या नाहीत. परंतु तरीही अनेकांना.. यात बिगर भाजपीयदेखील आले.. स्वराज मंत्रिमंडळात असायला हव्यात असेच वाटत होते. राजकारणाच्या पक्षीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक अशा चौकटी ओलांडून लोकसंग्रह करण्याची क्षमता असणाऱ्या आणि तिचा वापर करणाऱ्या मोजक्या नेत्यांत सुषमा स्वराज यांचा समावेश होतो. हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्टय़. जनसंघाचे सार्वजनिक संघटनेतून व्यापक अशा राजकीय पक्षात रूपांतर करण्याचे श्रेय ज्या दोघांनाही जाते, त्या अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी सहिष्णू दृष्टिकोनाच्या आणि सुस व्यक्तिमत्त्वाच्या नेत्यांची एक पिढी घडवली. प्रमोद महाजन, अरुण जेटली, अनंतकुमार, वेंकय्या नायडू आदी या पहिल्या पिढीच्या उत्साही राजकारण्यांतील बिनीच्या शिलेदार म्हणजे सुषमा स्वराज. स्वभावाचे मोकळेपण हा या सगळ्यांच्या व्यक्तिमत्त्वांतील समान धागा. राजकारणासह अन्य विषयांवरही त्यांच्याशी मुक्त संवाद होत असे. सहभागींची वैचारिक बांधिलकी वा राजकीय निष्ठा हा त्यांच्याशी संवादाचा अडथळा कधीच नसे. यापैकी महाजन वा जेटली वगळता अन्य हे वैयक्तिक जीवनातही साधे म्हणावे असे होते. ‘मध्यमवर्गीय’ हे विशेषण ज्या वेळी काहीएक सांस्कृतिक आणि बऱ्याचशा आर्थिक मूल्यांचे निदर्शक होते, त्या वेळेस हे सर्व राजकारणात आले. सहजसंपर्क क्षमता हे या मूल्याचे एक लक्षण. सुषमा स्वराज यांच्याकडून ते शेवटपर्यंत पाळले गेले. त्यांचे हे मूल्यवास्तव ध्यानात घेतल्यास, परराष्ट्रमंत्री असताना त्या सहज अडीअडचणीतील कोणालाही मदत कशी करत हे लक्षात येईल.

वयाच्या ज्या टप्प्याचे वर्णन ‘गद्धे’ या उपाधीशी जोडून केले जाते, त्या अवघ्या पंचविशीत सुषमा स्वराज हरयाणा राज्य मंत्रिमंडळात मंत्री बनल्या. घरात संस्कार संघाचे. पण त्यांची राजकीय तडफ ओळखली ती समाजवादी जॉर्ज फर्नाडिस यांनी. सुषमा स्वराज यांच्या अंगभूत साधेपणाचे रहस्य संघ अधिक समाजवाद या बेरजेत असावे. आणीबाणीच्या काळात गाजलेल्या बडोदा डायनामाइट प्रकरणात जॉर्ज यांना वाचवणाऱ्या वकिली समूहात सुषमा स्वराज होत्या. पण नंतर त्यांचा समाजवादी टप्पा संपुष्टात आला. या टप्प्याची त्यांच्या आयुष्यात राहिलेली कायमस्वरूपी खूण म्हणजे त्यांचे पती स्वराज कौशल. आपल्या पत्नीप्रमाणे त्यांनी वकिली सोडली नाही. सुषमा स्वराज मात्र पूर्णवेळ राजकारणी बनल्या. हरयाणा भाजपच्या अध्यक्ष या नात्याने त्यांची कामगिरी त्या काळात पुरेशी लक्षवेधक होती.

आणि त्या वेळी भाजपदेखील भरताड भरतीपासून दूर होता. सत्तेची झूल अंगावर चढायची होती. त्यामुळे भुरटय़ांची भाऊगर्दी सुरू झाली नव्हती. आणि त्या पक्षाच्या महिला आघाडीवर तर अगदीच मोजकी नावे होती आणि इतके उत्तम वक्तृत्व असलेली दुसरी कोणी महिलाच नव्हती. त्यामुळे वाजपेयी-अडवाणी या नेतेद्वयीने सुषमा स्वराज यांना हेरले. त्यामुळे सुषमा स्वराज यांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली. त्या कोणत्या साली कोणत्या खात्याच्या मंत्री झाल्या वगैरे तपशील नव्याने येथे सांगण्यात काही हशील नाही. ही सगळी पदे मिळत असताना वा मिळाल्यानंतरही सुषमा स्वराज कशा होत्या, हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे.

भाजपमध्ये त्या अडवाणी गटाच्या मानल्या जात. आणि ते खरेही होते. पण म्हणून पक्षापेक्षा आपल्या नेत्याच्या हितास महत्त्व देण्याचा अलीकडे सर्वच पक्षांत फोफावलेल्या लांगूलचालनी अवगुणाचा स्पर्श त्यांनी कधीही स्वत:ला होऊ  दिला नाही. त्यामुळे २००९ सालच्या पराभवानंतरही आपले गुरू, मार्गदर्शक अडवाणी हे नेतृत्व सोडण्यास तयार नाहीत हे दिसल्यावर, त्या मुद्दय़ावर सरसंघचालकांना भेटावयास जाणाऱ्या प्रमुख नेत्यांत त्या एक होत्या. वेंकय्या नायडू आणि अरुण जेटली हे अन्य दोघे. या भेटीनंतर पक्षाध्यक्षपदाची सूत्रे नितीन गडकरी यांच्याकडे आली, ही बाब महत्त्वाची. या घटनेतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, त्यांनी व्यापक पक्षहितासाठी जेटली यांनाही साथ दिली. जेटली आणि स्वराज यांच्या राजकीय संबंधांतील ताणतणाव ज्यांना माहीत असतील, त्यांना या घटनेचे महत्त्व लक्षात येईल (पुढे मोदी मंत्रिमंडळातही जेटली यांना स्वराज यांच्यापेक्षा अधिक महत्त्व होते, पण म्हणून त्यांनी कधीही राग वा त्रागा केला नाही.). याच काळात सोनिया गांधी यांच्याविरोधात बेल्लारी मतदारसंघात निवडणूक लढण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. त्या निवडणुकीचा निकाल काय लागणार, हे स्पष्ट होते. पण तरीही सुषमा स्वराज हिरिरीने लढल्या. त्या हरल्या. पण या निवडणुकीत पराभवापेक्षाही दोन गालबोटे त्यांच्या व्यक्तिमत्त्वास कायमची चिकटली. ते झाले नसते, तर सुषमा स्वराज यांनाही आवडले असते.

यातील एक म्हणजे, त्यांनी सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर केशवपन करून आलवणसदृश श्वेतवस्त्रांत राहण्याची दिलेली कर्कश्श आणि अतिरेकी धमकी. ती सुदैवाने त्यांना अमलात आणावी लागली नाही. आणि दुसरा मुद्दा म्हणजे, या एका निवडणुकीपुरती बेल्लारीच्या वादग्रस्त खाणसम्राट रेड्डी बंधूंची त्यांनी केलेली भलामण. ‘ते आपल्या भावासारखे आहेत,’ असे त्या वेळी त्या म्हणाल्या. या दोन्ही गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वास शोभणाऱ्या आणि राजकीयदृष्टय़ा शहाणपणाच्या होत्या असे म्हणता येणार नाही. पण यापैकी रेड्डी बंधूंचा मुद्दा स्वराज यांना फार काही चिकटला नाही आणि सोनिया गांधींशी त्यांचे संबंध नंतर अत्यंत सौहार्दाचे झाले.

हेच सुषमा स्वराज यांचे वैशिष्टय़ आणि मोठेपण. आपले स्नेहाळ, बालसुलभ हास्य आणि समोरच्याशी जवळीक निर्माण करणारी हात हातात घेऊन बोलायची शैली, यामुळे सुषमा स्वराज पदाचे आणि अधिकाराचे वगैरे अंतर सहज मिटवून टाकीत. त्यांच्या स्वभावात एक स्त्रीसुलभ ममत्व होते. ते त्यांनी शेवटपर्यंत जपले. दिल्लीच्या राजकारणात त्यांच्या प्रतिस्पर्धी शीला दीक्षित यांच्यातही असा गुण होता. त्यामुळे एकमेकींविरोधात लढूनही त्यांच्यात कटुता नव्हती. सुषमा स्वराज खट्टू झाल्या त्या एकदाच. आंतरधर्मीय विवाह केला म्हणून महिलेस आक्षेपार्ह प्रश्न विचारणाऱ्या धर्माभिमानी पारपत्र अधिकाऱ्यावर परराष्ट्रमंत्री या नात्याने स्वराज यांनी कारवाई केली असता समाजमाध्यमांतील टोळ्यांनी त्यांच्याविरोधात रान उठवले. स्वराज यांनी या नवधर्माभिमान्यांना खमकेपणाने तोंड दिले खरे. पण ही लढाई त्या एकटेपणाने लढल्या. ही घटना २०१८ सालची.

त्यानंतर वर्षभरातच असलेली निवडणूक न लढण्याचे त्यांनी जाहीर केले. असे करावयाची वेळ आलेल्या नेत्यांत एक प्रकारचा कडवेपणा येतो. सुषमा स्वराज यांच्यात तो अजिबात दिसला नाही. त्याचमुळे काश्मीरसंदर्भात ३७० कलम रद्द करण्याच्या धाडसी प्रक्रियेचे त्यांनी मन:पूर्वक स्वागत केले. ‘हा दिवस या जन्मात पाहायला मिळावा,’ अशी त्यांची इच्छा होती. ती पूर्ण झाली. पाठोपाठ सुषमा स्वराज यांचेही जीवन सफळसंपूर्ण झाले. ६७ हे काही जायचे वय नाही. पण तरी त्या गेल्या. कमी वयात मोठय़ा पायरीवर पोहोचण्याचा नेम त्यांनी याबाबतही पाळला. राजकारणातील सभ्य, सुसंस्कृत, सालस आणि लोभस अशा या व्यक्तिमत्त्वास ‘लोकसत्ता’ परिवाराची आदरांजली.