News Flash

पुरोगाम्यांचे प्राक्तन

आताही केंद्रात नरेंद्र मोदी यांना सत्ता मिळाल्याबद्दल हे पुरोगामी सामूहिक अश्रू ढाळताना दिसतात.

२० जानेवारीच्या बैठकीनंतर मोदींना समन्स पाठवायचे की नाही याचा निर्णय घेतला जाईल.

 

पुरोगामी विचारास बंदिस्त करून जखडून टाकण्यास पुरोगाम्यांचीच दांभिकता जबाबदार आहे..

वास्तविक, भरभक्कम बहुमत असूनही मोदी सरकार अनेक आघाडय़ांवर गंभीर चुका करीत असताना जनमत पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्याची उत्तम संधी पुरोगामी घटकांसमोर चालून आली आहे. पण ती साधण्यासाठी आवश्यक ते राजकीय चापल्य पुरोगामी शक्तींना दाखवावे लागेल. याचे कारण ही लढाई वैचारिक असली तरी तिचे रणांगण राजकीयच असणार आहे.

इंग्रजीत Converting the converted  असा वाक्प्रचार आहे. म्हणजे ज्यांना जो मुद्दा मान्य आहे त्यांनाच तो पुन्हा समजावून सांगण्यात वेळ घालवणे. आपल्या देशातील पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांचे हे असे झाले आहे. ज्यांची प्रामाणिक पुरोगामी, निधर्मी विचारावर श्रद्धा आहे त्यांनाच हे पुरोगामी म्हणवून घेणारे पुरोगामित्वाचे महत्त्व सांगत बसतात. गोव्यातील मडगाव येथे नुकतीच संपलेली दक्षिणायन ही परिषद हे याचे ताजे उदाहरण. गणेश देवी यांच्यासारखी सत्शील विद्वान व्यक्ती या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होती. गणेश देवी यांनी भाषा विचाराची सामाजिक, सांस्कृतिक अंगाने मांडणी करण्यात आपली हयात खर्च केली असून त्या क्षेत्रातील त्यांचे काम अतुलनीय असेच आहे. या अभ्यासाबरोबरच प्रचलित राजकीय घडामोडींकडेही ते सामाजिक विश्लेषकाच्या भूमिकेतून बघतात. त्यामुळे त्यावरील त्यांचे भाष्य हे विचार करावे असे असते. दक्षिणायनच्या या अध्यायाचे अध्यक्षपद गणेश देवी यांच्यासारख्याकडे असल्यामुळे ही परिषद दखलपात्र ठरते. कारण एरवी या व्यासपीठावरचे मान्यवर हे नेहमीचेच यशस्वी कलाकार होते आणि त्यांच्याकडे आता नव्याने मांडण्यासारखे काहीही उरलेले नाही, हेदेखील दिसून येत होते. पुरोगाम्यांचे वैचारिक संचित असे आटत जाणे हे काळजी वाढवणारे असून या वास्तवाचे भान या मंडळींना आहे की नाही, असा प्रश्न पडतो. तसा तो पडण्याचे कारण म्हणजे वर उल्लेखिलेल्या इंग्रजी शब्दप्रयोगाप्रमाणे पुरोगामी मंडळींचे एकमेकांतच सुरू असलेले वैचारिक रोटीबेटी व्यवहार. या एकमेकांच्या परिघाबाहेर या मंडळींच्या मागे लोक नाहीत. अशा वेळी वास्तविक हे असे का झाले, याचा विचार या मंडळींनी करणे ही काळाची गरज आहे.

गणेश देवी यांनी केलेली मीमांसा वगळता अन्यत्र या निकडीची जाणीव या परिषदेत दिसून आली नाही. आपण आपल्याआपल्यातच किती काळ बोलत राहणार? आपल्यांतल्यांखेरीज अन्य कोणी आपले ऐकावयास का उत्सुक नाही? एकेकाळी सशक्त असलेला हा मुक्त, पुरोगामी विचारप्रवाह आता करंगळीपेक्षाही क्षीण का झाला? अशा प्रश्नांचा सविस्तर ऊहापोह या परिषदेत झाला नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा सध्या संकोच होत आहे, असे मत या परिषदेत व्यक्त झाले. ते योग्यच. वास्तविक या संकोचाबद्दल सामान्य नागरिकास खंत वाटावयास हवी. तसे होताना दिसत नाही. उलट ‘बरे झाले जिरली या पुरोगामी म्हणवणाऱ्यांची.’ अशाच प्रकारची भावना सामान्यांतील मोठय़ा वर्गाकडून व्यक्त होते. हे असे का झाले? आणीबाणी काळात असाच अभिव्यक्ती अधिकाराचा संकोच होत असताना सामान्य जनमताचा त्या विरोधातील हुंकार हा सत्ताबदल घडवणारा ठरला. हा ताजा इतिहास आहे. याचा अर्थ सामान्यांच्या मनात अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या संकोचाबद्दल संताप निर्माण होऊ शकतो. मग तो आता मात्र का नाही? या आणि अशा प्रश्नांना भिडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या परिषदेत होणे अपेक्षित होते. ते झाले नाही. ज्या सामाजिक भल्यासाठी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा उपयोग होणे अपेक्षित आहे त्याच समाजाला अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरील अतिक्रमणाने आनंद होत असेल तर ते जसे सामाजिक अनारोग्याचे लक्षण ठरते तसेच ते पुरोगाम्यांवरील अविश्वास निदर्शकही ठरते. त्यांच्याविषयी असा अविश्वास निर्माण झाला याचे कारण पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांनी या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वापर समन्यायी विचाराने केला नाही.

मुळातील सहिष्णु हिंदूंनाच सहिष्णुतेच्या मात्रा चाटवीत बसण्याखेरीज या पुरोगाम्यांहातून अन्य काहीही भरीव घडले नाही. या मंडळींच्या बेगडी पुरोगामित्वामुळे बहुसंख्याकत्वाचा असा एक गंड तयार होत गेला. त्यात या मंडळींच्या माध्यमचातुर्य आणि माध्यमस्नेहामुळे त्यांचेच मत सर्वत्र व्यक्त होत गेले. त्यामुळे आपल्याला जे आवडते तेच हे ऐकत गेले. हे पुरोगामी म्हणवून घेणारे लोकशाहीवर आपली श्रद्धा आहे असे सांगतात. परंतु याच लोकशाही व्यवस्थेने १९९५ साली महाराष्ट्रात सेना-भाजप या पक्षांच्या हाती सत्ता दिली त्या वेळी या मंडळींनी त्रागा केला. हे वर्तन अलोकशाही होते. त्या वेळी असे करणाऱ्या पुरोगाम्यांतील मेरूमणी अशा पुष्पा भावे यांना चार खडे बोल सुनावण्याचे काम केले ते दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या नि:स्पृह विदुषीने. आताही केंद्रात नरेंद्र मोदी यांना सत्ता मिळाल्याबद्दल हे पुरोगामी सामूहिक अश्रू ढाळताना दिसतात. मात्र हे असे का झाले याचे उत्तर शोधण्याचा प्रामाणिकपणा त्यांच्या अंगी नाही. सध्याचा पुरोगामी विचार बंदिस्त आहे, असे गणेश देवी म्हणतात. ते खरेच आहे. परंतु त्यास बंदिस्त केले कोणी याचे उत्तर ते देत नाहीत. ते दिल्यास लक्षात ढळढळीतपणे एक सत्य समोर येईल. ते म्हणजे पुरोगामी विचारास बंदिस्त करून जखडून टाकण्यास पुरोगाम्यांचीच दांभिकता जबाबदार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी जेव्हा अब्दुल रहेमान अंतुले या पहिल्या मुसलमान नेत्याची निवड झाली तेव्हा यातील काही नामांकित पुरोगाम्यांनी हे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावरचे शिक्कामोर्तब असल्याचे विधान केले. ते योग्यच होते आणि महाराष्ट्रासारख्या राज्याने ही प्रागतिकता दाखवणे गरजेचे होते. परंतु त्यानंतर काही काळाने जम्मू काश्मिरात सत्ताबदल होऊन तेथे पुन्हा फारूख अब्दुल्ला यांच्याकडे सत्तासूत्रे गेली असता त्यावर भाष्य करताना याच पुरोगामी नेत्यांनी त्याचेही समर्थन केले. जम्मू काश्मिरात मुसलमान बहुसंख्याक असल्याने त्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदी बहुसंख्याकच असणे रास्त अशी त्यांची मखलाशी. म्हणजे महाराष्ट्रात बहुसंख्य हिंदू असताना मुख्यमंत्रिपद अल्पसंख्याकाकडे जाणे हे मोठेपणाचे. पण म्हणून जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी एकदाही अल्पसंख्य हिंदू व्यक्ती का नाही, असे विचारण्याचा प्रामाणिकपणा त्यांच्या ठायी नाही. या आणि अशा असंख्य प्रसंगांतून सामान्यांच्या मनात पुरोगाम्याविषयी संशय निर्माण होत गेला आणि तो दूर करण्याची निकड या मंडळींना कधीही वाटली नाही.

आणि आता तर नरेंद्र मोदी यांच्यामागे उभे राहून जनतेने या पुरोगाम्यांना पूर्णपणे भिरकावूनच दिले. खरे तर अशा वेळी आपले काही चुकले हे मान्य करण्याचा मोकळेपणा या मंडळींनी दाखवणे आवश्यक होते. त्यास हे तयार नाहीत. उलट प्रतिगामी शक्तींना बळ दिल्याबद्दल हे जनतेलाच बोल लावीत असून त्यातून त्यांचा अप्रामाणिकपणाच अधोरेखित होतो. वास्तविक भरभक्कम बहुमत असूनही मोदी सरकार अनेक आघाडय़ांवर गंभीर चुका करीत असताना जनमत पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्याची उत्तम संधी पुरोगामी घटकांसमोर चालून आली आहे. पण ती साधण्यासाठी आवश्यक ते राजकीय चापल्य पुरोगामी शक्तींना दाखवावे लागेल. याचे कारण ही लढाई वैचारिक असली तरी तिचे रणांगण राजकीयच असणार आहे. याचा अर्थ प्रत्येकाने निवडणुकीच्या रिंगणात उतरावे असा नाही. परंतु नागरिकांची वैचारिक मशागत मात्र जरूर केली जावी. त्यामुळे पुरोगामी शक्तींना पुनरुज्जीवन मिळू शकते. तेही करण्याचे कष्ट या मंडळींनी घेतले नाहीत तर प्रतिगाम्यांकडून चेपले जाणे हेच यांचे प्राक्तन ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 3:09 am

Web Title: narendra modi and progressive forces
Next Stories
1 बिरबलाच्या खिचडीची चूल
2 भविष्य करपण्यापूर्वी..
3 धोक्याची घंटा
Just Now!
X