पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यांमागचा मूळ हेतू नागरी सरकारच्या खुर्चीखाली सुरुंग लावणे हाच आहे.

दहशतवाद म्हणजे दहशतवादच आणि त्यामुळे भारत वा अफगाणिस्तानात हिंसक कृत्ये करणाऱ्या संघटना याही दहशतवादीच आहेत, हे वास्तव जोवर पाकिस्तानी राज्यकर्ते आणि तेथील जनताही समजून घेत नाही, तोवर हा प्रश्न सुटणार नाही..

पेशावरमधील लष्करसंचालित शाळेत झालेल्या हत्याकांडाच्या पहिल्या स्मृतिदिनाची फुले सुकलीही नसतील तोच पेशावरपासून जवळच, चारसद्दा शहरातील बाचा खान विद्यापीठावर तालिबानी दहशतावाद्यांनी हल्ला केला असून, त्यात अनेक विद्यार्थी मृत्युमुखी पडले आहेत. कोणत्याही सुसंस्कृत समाजाकरिता शोकदायी अशीच ही घटना. पेशावरमधील १३२ अजाण बालकांना वेचून गोळ्या घालणाऱ्या त्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी त्या वेळीच कंठस्नान घातले. गेल्या ३ डिसेंबर रोजी त्या हत्याकांडास जबाबदार असलेल्या चौघांना फासावर चढविण्यात आले. मात्र असे कितीही दहशतवादी मारले, कित्येकांना फासावर चढविले तरी पाकिस्तानातील दहशतवाद थांबणार नाही, थांबू शकत नाही हेच या ताज्या हल्ल्यातून पुनश्च अधोरेखित झाले आहे. यापूर्वीच्या अनेक हल्ल्यांचाही संदेश तोच होता; परंतु त्यातून पाकिस्तानने कोणताही धडा घेतल्याचे दिसत नाही. तोंडाने दहशतवादाशी लढण्याच्या बाता मारल्या म्हणजे दहशतवादाशी लढले असे होत नसते. त्यासाठी प्रबळ राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्तीची आवश्यकता असते. हे काम अर्थातच सरकारचे; परंतु पाकिस्तानात एक सरकार नाही. रशियन बाहुलीप्रमाणे पाकिस्तानातील सरकार नामक यंत्रणेच्या आत अनेक सरकारे स्वतंत्रपणे काम करीत असतात. अशा गोंधळातून जी परिस्थिती निर्माण होते ती देशाला राज्यहीनतेकडे नेणारी असते. पाकिस्तानमध्ये आज सत्तेवर नागरी सरकार असले, तरी त्यावर लष्करशहा, धर्ममरतड, अमेरिकेसारखे मालकराष्ट्र यांची अनेकविध प्रकारची दडपणे आहेत आणि परिणामी तेथील सरकार नावाची यंत्रणा निष्प्रभ बनलेली आहे. अशा परिस्थितीत असे हल्ले हे पाकिस्तानचे भागधेयच बनल्यासारखे झाले आहेत. कदाचित पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या सरकारसाठी हा हल्ला म्हणजे उंटाच्या पाठीवरची काडी ठरू शकेल. तशा प्रकारचे राजकारण गेल्या कित्येक महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये शिजत असल्याचे डिसेंबर २०१४ मध्ये तहरिक-ए-इन्साफचे नेते इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या आझादी मोर्चाने दाखवून दिले होते. शरीफ सरकारला सत्तेवरून खेचण्याचे त्या मोर्चाचे उद्दिष्ट साध्य झाले नसले, तरी त्यामागे असलेल्या लष्करी शक्तींचे दर्शन त्या वेळी सगळ्या जगाला झाले होते. पोलिसांनी बलप्रयोग करताना संयम दाखवावा, असे जाहीर आवाहन तेव्हा लष्कराने केले होते. पेशावरमधील शाळेवरील हल्ला याच मोर्चाच्या मुहूर्तावर झाला होता ही बाबही येथे लक्षणीय आहे. या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे या हल्ल्यांचा मूळ हेतू नागरी सरकारच्या खुर्चीखाली सुरुंग लावणे हाच आहे. त्या सुरुंगाची दारू किती स्फोटक आहे हे लवकरच दिसून येईल. दरम्यानच्या काळात पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र समजणे कसे चुकीचे आहे आणि मुळात तोच कसा दहशतवादाचा बळी आहे अशी कांगावखोर चर्चा सुरू झालेली असेल.

वरवरची वस्तुस्थिती लक्षात घेतली तर पाकिस्तानच्या या वक्तव्यांना ऊरबडवेपणा म्हणणे चुकीचे वाटेल. जिहादी दहशतवादाची अनेक रूपे त्या देशात नांदत असून, ती एकमेकांविरोधात लढत आहेत. त्यात पाकिस्तानातील मुस्लीमच बळी पडत आहेत. असे असताना या देशाला दहशतवादाची शिकार म्हणायचे की दहशतवादी असा प्रश्न कोणासही रास्तच वाटेल; परंतु वास्तवाचे रंग थोडे खरवडले की ही विधाने किती अर्धसत्य आहेत ते दिसते. अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चांगला दहशतवाद आणि वाईट दहशतवाद असा प्रकार नसतो’ अशी भूमिका घेतली होती. तसा फरक मानावा की नाही ही खरे तर आंतरराष्ट्रीय समुदायाचीच समस्या आहे; परंतु त्याहून अधिक ती पाकिस्तानची आहे. केवळ पाकिस्तानी सरकारची नव्हे, तर तेथील जनतेचीही आहे. याचे कारण याच्या झळा अखेर त्यांनाच सोसाव्या लागत आहेत. आपल्याकडील अनेक पाकप्रेमींच्या भावना यामुळे नक्कीच हताहत होतील; परंतु ही बाब नीटच समजून घेतली पाहिजे, की आजही पाकिस्तानातील बहुसंख्याकांच्या भावना तेथील भारतविरोधक यंत्रणांनाच मान्यतेचा टेकू देणाऱ्या ठरतात. या यंत्रणांच्या- आणि निमूट पाठिंबादारांच्याही- मते भारताविरोधात लढणारे दहशतवादी हे चांगले दहशतवादी असतात. काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांविरोधात लढणारे दहशतवादी हे तर त्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्यवीरच. पाकिस्तानात वाईट दहशतवादीही आहेत. म्हणजे सुन्नींना मारणारे सुन्नींसाठी वाईट आहेत. शियांना मारणारे शियांसाठी वाईट आहेत. यामुळेच पाकिस्तानातील अनेकांच्या दृष्टिकोनातून लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या संघटना या दहशतवादी संघटना नव्हत्या वा नाहीत. फार कशाला, तहरिक-ए-तालिबान ही पेशावर आणि आताच्या बाचा खान विद्यापीठावरील हल्ल्यास जबाबदार असलेली संघटनाही चुकीची नाही, असे मानणारे लोकही पाकिस्तानच्या संघराज्यशासित आदिवासी भागात आणि खैबर पख्तुन्वा प्रांतात आहेत. असे लोक इस्लामाबादेत वा लाहोरमध्ये नाहीत असे मानणेही चूक ठरेल. पाकिस्तानातील बिगरइस्लामी प्रभाव पुसून, तेथील धर्मद्रोह्य़ांना- त्यात अहमदिया, शिया वगैरे सारेच आले- जहन्नुममध्ये पाठवून, हे राष्ट्र शरियतवर चालणारे असे पाक राष्ट्र बनावे अशी आकांक्षा केवळ खैबर पख्तुन्वा वा अफगाणिस्तानातील तालिबान्यांचीच आहे असे मानणे हा वास्तवाशी केलेला द्रोह ठरेल; परंतु तो सरसकट केला जातो आणि मग अशा संघटनांनी एखादा दहशतवादी हल्ला करून अनेक निरपराधांचे प्राण घेतले की पाकिस्तानच कसा दहशतवादाचा बळी ठरतो आहे हे डोळ्यांत पाणी आणून जगासमोर सांगितले जाते. यातून कदाचित पाकिस्तानला अमेरिकेसारख्या मालकराष्ट्रांची सहानुभूती कमावता येईल; परंतु त्यामुळे मूळ प्रश्न मात्र कायमच राहतो. दहशतवाद म्हणजे दहशतवादच आणि त्यामुळे भारत वा अफगाणिस्तानात हिंसक कृत्ये करणाऱ्या संघटना याही दहशतवादीच आहेत, हे वास्तव जोवर पाकिस्तानी राज्यकर्ते आणि तेथील जनताही समजून घेत नाही, तोवर हा प्रश्न सुटणार नाही. यातील खरी समस्या ही आहे की, ते सुटावेत अशी मुळात पाकिस्तानातील सत्तेच्या दलालांचीच इच्छा नाही. तशी ती असती, तर आतापर्यंत पठाणकोटमधील हल्ल्याचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अजहर वा मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकीऊर रहमान लख्वी यांना त्यांचा योग्य तो ठिकाणा प्राप्त झाला असता.

पठाणकोटमधील वायुदलाच्या तळावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा मूळ हेतू भारत-पाक यांच्यातील शांतताचर्चा उधळून लावणे हा होता. तो पूर्णत: साध्य झाला असे जसे म्हणता येत नाही, तसेच तो पूर्णत: अपयशी ठरला असेही म्हणता येत नाही. सध्या ही चर्चा त्रिशंकू अवस्थेतच आहे. या चर्चेशी आताच्या विद्यापीठावरील हल्ल्याचा थेट संबंध लावता येणार नाही हे खरे; परंतु त्या हल्ल्याचा आडपरिणाम या चर्चेवर होणारच नाही असेही सांगता येणार नाही. मोदी यांच्या अफगाणिस्तान भेटीनंतर तातडीने पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. राहिल शरीफ अफगाणिस्तान सरकारशी चर्चा करण्यासाठी जातात ही बाब या हल्ल्यास कारणीभूत असू शकते. तसे असेल तर पाकिस्तानातील नागरी सरकारला दहशतवाद्यांनी दिलेला हा एक प्रकारचा इशारा आहे. आमच्या शत्रूंशी तुम्ही हस्तांदोलन करू पाहत असाल तर तुम्हीही आमचे शत्रूच असा त्याचा अर्थ आहे. नवाझ शरीफ यांचे सरकार या इशाऱ्यापुढे किती कोनात झुकते यावरच या चर्चेचे भवितव्य ठरणार आहे. खरे तर अशा परिस्थितीत भारताबरोबरच्या वाटाघाटीतील सर्व अडथळे दूर सारून शरीफ यांनी लष्कर आणि लष्करी गुप्तचर संस्था आयएसआय यांच्या डोळ्यांत पाहण्याचे धैर्य दाखविले तर तो एका अर्थी दहशतवाद्यांचा पराभवच ठरेल. शरीफ कोणता मार्ग स्वीकारतात हे लवकरच दिसेल. या हल्ल्यानंतर त्यांनीही पाकिस्तान कसा दहशतवादाचा बळी ठरतो आहे हीच ध्वनिफीत लावली तर मात्र त्यांच्या दहशतवादविरोधी लढय़ाच्या प्रामाणिकपणाबद्दलच शंका निर्माण होईल. चार-दोन दहशतवाद्यांना फासावर चढवून, आपण मोठा लढा देतो आहोत, असे त्यांना याउपरही म्हणता येईल, पण त्या छाती काढण्याला काहीही अर्थ नसेल.