‘वॉल स्ट्रीट जर्नल’चे पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेला जिहादी अहमद उमर सईद शेख याला पाकिस्तानातील कनिष्ठ न्यायालयाने दिलेली मृत्युदंडाची शिक्षा सिंध उच्च न्यायालयाने ‘तांत्रिक तफावती आढळल्याने’ रद्द ठरवली. ‘जिहादी दहशतवादाचा नि:पात करण्याप्रति कटिबद्ध आहोत’ या दाव्यावरून तो देश एक पाऊल मागे गेल्याचेच हे लक्षण आहे. गेली १८ वर्षे प्रथम कराची आणि नंतर सिंध प्रांतातील हैदराबाद येथे हा खटला सुरू होता. सिंध उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांनी आरोपपत्रातील तारखांच्या तफावतीवर बोट ठेवले. काही परदेशी साक्षीदारांच्या मते ज्या तारखेला उमर सईदला अटक झाली, त्यापेक्षा वेगळ्याच तारखेला त्याला अटक झाल्याचा उल्लेख तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या आरोपपत्रात आहे. त्यामुळे डॅनियल पर्ल यांचे अपहरण केल्याचा त्याच्यावरील गुन्हा सिद्ध झाला आहे. मात्र त्यानेच पर्ल यांची हत्या केली हे सिद्ध होऊ शकले नाही. अपहरण केल्याबद्दलची सात वर्षांची शिक्षा त्याने भोगून झालेलीच आहे. कारण गेली १८ वर्षे तो तुरुंगात होता. त्यामुळे तांत्रिकदृष्टय़ा तो आणि त्याचे तीन साथीदार तुरुंगाबाहेर पडू शकतात. या खटल्याचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन पाकिस्तान सरकारनेच या निकालाच्या विरोधात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे ठरवले आहे; पण ते केव्हा? अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानेही निकालावर नाराजी व्यक्त केल्यानंतर. पर्ल यांची गळा चिरून झालेली नृशंस हत्या हा अमेरिकेत अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. त्यामुळे इतक्यात तरी उमर सईद उजळ माथ्याने तुरुंगाबाहेर पडण्याची शक्यता नाही. तरीही यातून काही प्रश्न उपस्थित होतातच आणि ते पाकिस्तानच्या हेतूंविषयी शंका वाढवण्यात भरच घालतात.

डॅनियल पर्ल हे कराचीमध्ये कार्यरत होते आणि अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संलग्न पाकिस्तानी गटांवर शोधवृत्त बनवत होते. उमर सईदने त्यांच्याशी मैत्री करून या वृत्तासंबंधी काही महत्त्वाची माहिती पुरवण्याचे आश्वासन दिले. जानेवारी २००२ मध्ये कराची येथूनच पर्ल यांचे अपहरण झाले आणि महिन्याभरात त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले. ही हत्या उमर सईदने नव्हे, तर आणखी एक जहाल जिहादी खालिद शेख मोहम्मद याने केल्याचा दावा त्याच्यासकट इतर काही जणांनी केलेला आहे. हा दावा उमर सईदच्या खटल्यासंबंधी गोंधळात भर घालणारा आहे. शिवाय आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे, ज्या वेळी त्याला अटक झाली त्याच्या एक आठवडा आधी तो एक पाकिस्तानी ब्रिगेडियर इजाज अहमद शाह यांच्या संपर्कात होता. जिहादींचे हस्तक म्हणून आयएसआयचे अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी आजही सक्रिय आहेत. प्रस्तुत ब्रिगेडियर इजाज अहमद शाह आज पाकिस्तानचे गृहमंत्री आहेत! त्यामुळे कायदेशीर तांत्रिक त्रुटी असल्या, तरी पाकिस्तानी न्यायव्यवस्था या व अशा काही महत्त्वाच्या घटकांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. डॅनियल पर्ल यांचे अपहरण उमर सईदने केले, ते काही खंडणीच्या मागणीसाठी नव्हे! त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे, उमर सईदची पार्श्वभूमी अपहरणासारख्या एकटय़ादुकटय़ा गुन्ह्य़ाची नाहीच. भारतात आणि पाकिस्तानात अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये तो सामील होता.

डिसेंबर १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या अपहृत प्रवाशांच्या सुटकेसाठी ज्या तीन दहशतवाद्यांना तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने सोडले त्यांपैकी एक होता मौलाना मसूद अझर. दुसरा होता हाच तो अहमद उमर सईद शेख ऊर्फ उमर सईद. भारतात परदेशी पर्यटकांचे अपहरण केल्याबद्दल त्याला शिक्षा झाली होती. १९९४ ते १९९९ असा प्रदीर्घ काळ तो तुरुंगात होता. ब्रिटनमध्ये त्याचा जन्म झाला आणि विद्यापीठात शिकत असतानाच जिहादी विचारांच्या प्रभावाखाली आला. काही काळ बोस्नियातही जाऊन आला. तो त्या वेळी ब्रिटनच्या एमआय-६ गुप्तचर संस्थेचा हस्तक होता, हा दावा परवेझ मुशर्रफ यांचा. मौलाना अझर सुटल्यानंतर जैश-ए-मोहम्मद संघटनेतून सक्रिय झाला. डिसेंबर २००१ मध्ये भारतीय संसदेवरील हल्ल्यात याच संघटनेचा हात होता. त्या वेळी जैशमध्ये समन्वयाचे काम उमर सईदच करत होता. तुरुंगात १८ वर्षे होता, पण त्याही काळात थेट परवेझ मुशर्रफ यांना जिवे मारण्याची धमकी दूरध्वनीवरून देण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. त्याच्या साथीदारांनी वारंवार धमकी दिल्यामुळेच उमर सईदची रवानगी कराचीतून पाकिस्तानातील हैदराबादेत करण्यात आली होती. त्यामुळे तो कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकतो आणि त्याच्यावर कोणाकोणाचा वरदहस्त आहे, हे पुरेसे स्पष्ट होते. तरुण वयातच आंतरराष्ट्रीय जिहादी बनलेला उमर सईद आज केवळ ४७ वर्षांचा आहे. ही व्यक्ती पुन्हा समाजात वावरू लागली, तर किती विध्वंसक ठरेल याचा विचार भारतासाठी अस्वस्थ करणाराच आहे.