कुपोषण, लठ्ठपणा आणि हवामान बदल ही सध्याच्या जगापुढील सगळ्यात महत्त्वाची आव्हाने आहेत, ती एकेकटी नसून एकमेकांशी संबंधित आहेत. मात्र त्याचा मुकाबला भारतासारखा जास्त लोकसंख्या असणारा देश नेमका कसा करतो आहे, याचे उत्तर फारसे समाधानकारक नाही. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार सन २०५० पर्यंत भारतातील सुमारे चौदा कोटी नागरिक हवामान बदलाचे लक्ष्य ठरणार आहेत. गेल्या काही वर्षांत भारतातील नागरिकांच्या खाण्याच्या बदललेल्या सवयी तर अनारोग्यकारकच आहेत, असे ईट-लान्सेट कमिशनच्या अहवालात म्हटले आहे. भारताने या अहवालाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही तर येणारा काळ अतिशय धोक्याचा असणार आहे. साधारणत: भारतीय लोक कबरेदके अधिक प्रमाणात खातात आणि त्यांच्या आहारातील प्रथिनांचे तसेच फळांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी असते. भारतीयांच्या खाण्यात साखरेचे प्रमाण अधिक असते. अहवालातील या बाबींना भारतातील, निदान शहरातील नागरिक नाकारूच शकणार नाहीत. मधुमेहींची राजधानी होण्याचा मान मिळवणाऱ्या भारतात आजमितीस ३९ कोटी नागरिक मधुमेही आहेत आणि ही संख्या सन २०३० पर्यंत ७९ कोटींच्या घरात पोहोचण्याचा अंदाज आहे. या लान्सेट कमिशनने गेल्या आठवडय़ात आहाराबाबतची नवी सूत्रे जाहीर केली. त्यानुसार प्रत्येकाच्या आहारात कबरेदकांचे प्रमाण शहरी भागात ३४७ ग्रॅम असायला हवे. सध्या ते १०५८ ग्रॅम इतके असून ग्रामीण भागात जे ४३२ ग्रॅम असायला हवे, तेथे ते १३१८ ग्रॅम एवढे आहे. प्रथिनांच्या बाबतही या अहवालात जी आकडेवारी दिली आहे, ती धोक्याची सूचना देणारी आहे. भारतात चुकीच्या माध्यमांतून मिळणारे उष्मांक (कॅलरी) अधिक असल्याचेही या अहवालात नोंदवण्यात आले आहे. रोजच्या आहारात धान्याचे प्रमाण २३२ ग्रॅम, तर भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थाचे प्रमाण ३०० ग्रॅम आणि फळांचे प्रमाण २०० ग्रॅम असावे, असे आहाराची नवी सूत्रे सांगतात. भारतीयांच्या विद्यमान खाद्यसवयी या तिन्ही सूत्रांशी फटकूनच आहेत. ‘जंक फूड’ हा जगाला लागलेला मोठा रोग आहे. या क्षेत्रातील औद्योगिक गुंतवणूक सातत्याने वाढते आहे. मात्र जगाच्या आरोग्यासाठी त्यावर नियंत्रण आणणे अतिशय तातडीचे असून त्यासाठी जगातील सगळ्याच देशांच्या राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता ‘लान्सेट’ने व्यक्तकेली आहे. अन्नधान्याच्या बाबतीत केवळ स्वयंपूर्ण असणे उपयोगाचे नसून सुदृढ समाजासाठी आहारातील चौरसपणावर भर देणे आवश्यक असते. नव्या जीवनशैलीमुळे वेळेवर खाणे, पुरेसे पाणी पिणे, वेळेवर झोपणे, नियमित व्यायाम करणे या गोष्टींना फाटा मिळू लागला आहे. त्यामुळे जिभेचे चोचले पुरवणाऱ्या आणि रस्तोरस्ती मिळणाऱ्या तयार अन्नाकडे आकृष्ट होणाऱ्यांच्या संख्येत रोजच भर पडते आहे. शहरी भागात सेंद्रिय धान्यांच्या दुकानातील गर्दी लक्षात घेतली तरीही, त्यांची पुरेशा प्रमाणात नसलेली उपलब्धता आणि त्यांच्या किमती यामुळे अनारोग्यकारक पदार्थ खाण्यावाचून अनेक वेळा पर्यायही राहत नाही, अशी भारतातील स्थिती. संतुलित आहार ही आरोग्याची गुरुकिल्ली असते, याचे पालकांनाच भान न राहिल्याने, आजच्या लहान मुलांना तयार अन्नाची चटक लागल्याचे दिसते. युवकांमध्ये हीच आवड जोपासली जाते आणि त्याचे दुष्परिणाम आयुष्याच्या ऐन मध्यात भोगावे लागतात. परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आहाराच्या नवनवीन सवयी आपल्या आयुष्याचे मातेरे करतात, याचा अनुभव सारे जगच घेत आहे. त्यापासून दूर राहणे हाच त्यावरील उपाय. आपण याबाबत शहाणे होणार का, हा भविष्यापुढील सर्वात मोठा प्रश्न आहे.