दीड-दोन वर्षांपूर्वी अॅस्ट्राझेन्का ही ब्रिटिश कंपनी ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात सपाटून मार खाल्ला; मग ग्लॅक्सो-स्मिथक्लाइन या लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या अन्य एका कंपनीशी सूत जमविण्याचे प्रयत्नही फसले.. सरतेशेवटी आयरिश कंपनी अॅलर्गनच्या रूपात फायझरला इच्छित साथीदार सापडला. औषध उद्योगातील हा आजवरचा सर्वात महागडा सौदा परवाच्या सोमवारी अधिकृतपणे जाहीरही झाला. अॅलर्गनला सामावून घेऊन फायझरकृत जगातील सर्वात मोठी औषध कंपनी यातून अवतरेल. पण एवढय़ापुरतेच या सौद्याचे कौतुक व कर्तृत्व सीमित राहात नाही. पौरुषशक्ती वाढविणारे व्हायग्रा आणि वृद्धत्व झाकणाऱ्या तुळतुळीत त्वचेच्या चेहऱ्यासाठी बोटॉक्स या अनुक्रमे फायझर आणि अॅलर्गनच्या उत्पादनांनी साधलेला हा काम-शृंगारिक मेळ, असे या सौद्याचे केवळ कवित्वही नाही. जगातील हा सर्वात मोठा ‘करदायित्व झटकणारा’ सौदा आहे. वार्षिक तब्बल २९ अब्ज डॉलरच्या करांच्या ओझापासून मुक्ततेसाठी फायझरने केलेली ही एकरकमी १६० अब्ज डॉलरची (सुमारे साडेदहा लाख कोटी रुपयांची) गुंतवणूकच आहे. त्यामुळे व्यवसाय स्वारस्यातून नव्हे तर करबचाऊगिरीतून पुढे आलेला हा कावेबाज व्यवहार आहे. फायझर ही अमेरिकेच्या भूमीवर, तेथील रुग्णाईतांच्या स्वास्थ्य-व्ययावर फळली- फुललेली कंपनी आहे. न्यूयॉर्कस्थित या कंपनीला तिच्या नफ्यातील २६ ते ३५ टक्के हिस्सा करापोटी गिळंकृत केला जाणे जिवावर आले होते हे लपलेले नव्हते. अॅलर्गनच्या संपादनातून कंपनीला आपले तळ हे अमेरिकेबाहेर आर्यलडला कायदेशीररीत्या हलवून करांचे हे ओझे लक्षणीय कमी करून १७-१८ टक्क्यांवर आणता येईल. उल्लेखनीय म्हणजे अनेक वर्षांच्या असफल धडपडीतून फायझरचे मुख्याधिकारी इयान रीड यांनी चांगलेच धडे घेतले आहेत. ताज्या व्यवहाराची त्यांनी इतकी कडेकोट आखणी केली आहे की तो कायद्याच्या कचाटय़ात सापडण्याची शक्यता कमीच, असेच विश्लेषकांचे म्हणणे आहे. एकुणात या विक्रमी उलाढालीच्या व्यावसायिक सौद्याने अमेरिकेतील नियामक यंत्रणा आणि करप्रणालीपुढेच आव्हान उभे केले आहे. नुकत्याच कुठे सावरू पाहत असलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या सुकर उभारीत या सौद्याने जणू विघ्नच निर्माण केले. याचे अपेक्षित राजकीय पडसादही लागलीच उमटले आहेत. फायझरने घालून दिलेली पायवाट त्या भूमीवर अन्य अनेक कर-भित्र्या कंपन्यांकडूनही चोखाळली जाईल, अशी अमेरिकेला रास्त भीती आहे. अध्यक्ष बराक ओबामा यांनी या प्रकारचा करबचाऊपणा म्हणजे देशद्रोहच असल्याचा शेरा मारताना, कायद्यात दुरुस्तीचा विचार यापूर्वीच मांडला होता. तर हिलरी क्लिंटन आणि बर्नी सँडर्स या आगामी अध्यक्षपदाच्या शर्यतीतील परस्परविरोधी कंपूतील संभाव्य प्रतिस्पर्धीनी फायझरसदृश देशविघातक कर-पलायनाच्या विरोधात रणशिंग फुंकून निवडणुकीच्या आखाडय़ाला नवा पैलू दिला आहे. अमेरिकी व्यवस्थेतील राजकारणाचा पोत पाहता, फायझरच्या या सौद्यातून साधला जाणारा व्यावसायिक विस्तार, नवीन रोजगारनिर्मिती या सद्य:कथित बाबींचे पारडे पुढे जाऊन जड ठरणे अपरिहार्य आहे. दोन्ही हाती लाडू असणारे फायझरचे भागधारक हे नेमके जाणतात. तेथील बाजारात उसळलेला फायझरचा समभाग हेच दाखवितो.
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2015 रोजी प्रकाशित
करबचाऊ महा-सौदा
दीड-दोन वर्षांपूर्वी अॅस्ट्राझेन्का ही ब्रिटिश कंपनी ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात सपाटून मार खाल्ला; मग ग्लॅक्सो-स्मिथक्लाइन या लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या अन्य एका कंपनीशी सूत जमविण्याचे प्रयत्नही फसले.. सरतेशेवटी आयरिश कंपनी अॅलर्गनच्या रूपात फायझरला इच्छित साथीदार सापडला. औषध उद्योगातील हा आजवरचा सर्वात महागडा सौदा परवाच्या सोमवारी अधिकृतपणे जाहीरही झाला. अॅलर्गनला सामावून घेऊन फायझरकृत जगातील सर्वात मोठी औषध कंपनी […]
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद

First published on: 25-11-2015 at 01:11 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pfizer could save in taxes after allergan merger