News Flash

‘मुंबई स्पिरिट’चे लोढणे..

प्रत्येक संकटानंतर  मुंबई स्पिरिटचे हे लोढणे उरी बाळगण्याचा आता मुंबईकरांना वीट येऊ लागला आहे.

प्रत्येक संकटानंतर  मुंबई स्पिरिटचे हे लोढणे उरी बाळगण्याचा आता मुंबईकरांना वीट येऊ लागला आहे.

मुंबईच्या एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील नव्या पादचारी पुलाच्या उद्घाटनाच्या मुहूर्तावरच अंधेरी रेल्वे स्थानकावरील गोखले उड्डाण पुलावरील पादचारी पुलाचा भाग कोसळून पश्चिम रेल्वेची संपूर्ण वाहतूक पुरती थांबली आणि कोणत्याही संकटसमयी मुंबईची जेवढी जास्तीत जास्त दैना होऊ शकते तेवढी पुन्हा एकदा मुंबईकरांना अनुभवायला मिळाली. सकाळची गर्दीची वेळ, धुवांधार पावसाचा मारा, जागोजागी रस्त्यावर तुंबलेले पाणी आणि त्यातून वाट काढत हतबलपणे पोटासाठी घडय़ाळाशी स्पर्धा करीत पळापळ करणाऱ्या मुंबईकरांना अशी संकटे नेहमीच वेठीस धरत असतात. अगदी हे असेच मंगळवारच्या या एका दुर्घटनेनंतर घडले. असे काही घडले, की प्रशासन नावाच्या साऱ्या यंत्रणा जणू कार्यक्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाल्याच्या आवेशात दुर्घटनास्थळी गर्दी करतात, कामाला लागतात. सरकार जागे होते. जबाबदारीच्या मुद्दय़ावरून नेहमीचा चिखलफेकीचा खेळ सुरू होतो.. आणि घराबाहेर पडून अडकलेला मुंबईकर, सुरक्षिततेच्या शोधात हतबलपणे या खेळाकडे पाहत हात चोळत बसतो. गेल्या दशकभरात मुंबईत पायाभूत सुविधांच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणावर नवी कामे हाती घेतली गेली आणि त्याच काळात मुंबईवरील संकटांचे सावट गडद होत गेले. मृत्यू जणू दबा धरून प्रत्येकाभोवती घिरटय़ा घालत असावा आणि संधी सापडताच त्याने अकल्पितपणे एखाद्यावर झडप घालून त्याचा घास घ्यावा असे हृदयद्रावक प्रसंग या महानगराने असंख्य वेळा अनुभवले. कुठेच आश्वासक सुरक्षितता नाही आणि अनपेक्षितपणे संकट चालून आलेच तर त्यातून बाहेर पडण्याची सोयदेखील नाही अशा कचाटय़ात सापडलेल्या मुंबईकरांना कायम भयाच्या सावटाखाली वावरताना पुढच्या क्षणाची शाश्वती राहिलेली नाही आणि सुधारणा, प्रगतीच्या नावाखाली जे काही सुरू आहे त्याच्यावर भरवसा ठेवावा अशीही स्थिती राहिलेली नाही. कुणी चालताचालता गटारात पडून पाण्याच्या प्रवाहासोबत समुद्रात खेचला जाऊन होत्याचा नव्हता होतो, कुणी एखाद्या खड्डय़ात पडून मरण पावतो, तर कुणी अंगावर झाड कोसळून मरणाला सामोरा जातो. आता तर, डोक्यात विमान कोसळून मृत्यू ओढवण्याचे अघोरी प्रकारदेखील या महानगरात घडू लागल्याने, सारे काही बेभरवशाचे होऊन गेले असून सुरक्षिततेसाठी स्वत:च सावधगिरी बाळगावी अशीच परिस्थिती उद्भवली आहे. या महानगराची अवस्था अक्षरश: बेभरवशाची झालेली असून कोणत्याही क्षणी कोणासही कोणत्याही संकटाचा सामना करावा लागेल अशी परिस्थिती झालेली असताना, नागरिकांच्या सुरक्षिततेची, त्यांना सुरक्षित सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासन यंत्रणा मात्र, कोणतीही दुर्घटना घडून गेल्यानंतर दाखविण्याच्या चपळाईबाबतच स्वत:च्या पाठी थोपटून घेताना दिसतात. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे मार्गावरील सर्व पादचारी वा उड्डाणपुलांची सुरक्षितता सातत्याने तपासण्याची गरज अधोरेखित झाली होती. तसे सरकारने जाहीरही केले होते. पण अंधेरीच्या पुलाच्या नशिबी या तपासणीचा योग आलाच नाही. सरकारी कामाच्या गतिमान कारभारानुसार, या पुलापर्यंत तपासणी यंत्रणा पोहोचण्याआधीच त्याला मोक्ष मिळाला. या दुर्घटनेत सुदैवानेच जीवितहानी झाली नाही, पण म्हणून त्याचे गांभीर्य कमी होत नाही. या एका घटनेनंतर काही मिनिटांतच संपूर्ण मुंबईला लकवा भरला. लाखो नोकरदार जागोजागी अडकून पडले. रस्त्यांवर वाहनांची तुडुंब गर्दी झाली आणि अगोदरच पावसामुळे विकलांग झालेल्या रस्ते वाहतुकीची पुरती दाणादाण उडाली. एखाद्या ठिकाणी कोंडी झाली की त्याचा परिणाम अन्य रस्त्यांवर होऊ लागतो. या दुर्घटनेनंतर तेच घडले. दक्षिण मुंबईकडे जाणारे सर्व रस्ते वाहनांच्या गर्दीत घुसमटून गेले आणि नेहमी ठरावीक गतीने वाहणाऱ्या मुंबईवर मुंगीच्या वेगाने रस्ता कापण्याची वेळ आली. मुंबईत वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांची आणि त्यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अवस्था कशी असते, हे अनुभवल्याशिवाय कळणारे नाही. गाडीचा दरवाजादेखील उघडणे अशक्य ठरावे अशा दाटीवाटीने आसपासच्या वाहनांच्या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना भर पावसात नैसर्गिक गरजादेखील पूर्ण करता येत नसल्याने, त्याचा त्यांच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच, पण मानसिक स्थर्यासाठीदेखील ही परिस्थिती विपरीतच असते. अशा प्रसंगी संयमाची कसोटी लागते आणि कदाचित, कायदा सुव्यवस्था स्थितीसमोरही आव्हान निर्माण होऊ शकते. पण त्याचा आजवर कधीच गांभीर्याने विचार केला गेलेलाच नाही.

देशाचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे मुंबईकर आहेत. मुंबईची जीवनरेखा असलेली रेल्वे सेवा बंद पडल्यावर कोणत्या हलाखीस सामान्यांना तोंड द्यावे लागते, ते त्यांना कदाचित ऐकून तरी माहीतच असेल. अंधेरीच्या दुर्घटनेनंतर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्याच्या सूचना देऊन चौकशीचे आदेश त्यांनी दिले. महापालिका आणि रेल्वे प्रशासनात, या घटनेच्या जबाबदारीवरून उंदरामांजराचा खेळ सुरू झाला आणि अगोदरच रखडलेले अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करून वाहतूक अन्यत्र वळविण्यासाठी वाहतूक पोलीस यंत्रणा रस्त्यावर आली. घराबाहेर पडलेला व जागोजागी अडकलेला मुंबईकर मात्र परिस्थिती पूर्वपदावर येण्याची वाट पाहत, जेथे आहे तेथे ताटकळत राहिला. मुंबईच्या प्रशासकीय यंत्रणा आपत्ती ओढवल्यानंतर वेगाने कामाला लागतात, हे खरे आहे. पण आपत्तींचे संभाव्य सावट कोठे दडलेले असते, ते त्यांना अगोदर सहसा सापडत नसते. त्यामुळे आपत्ती घडून गेल्यानंतरच्या परिस्थितीतून मार्ग काढणे हेच आपले काम असावे असा या यंत्रणांचा समज असावा. त्यानुसार, मंगळवारीही त्या यंत्रणा कामाला लागल्या. अथकपणे काम करून या यंत्रणा मुंबई पूर्वपदावर आणतात, मग पुन्हा मुंबई पहिल्या वेगाने धावू लागते. संकटांचे सावट शिरावर घेऊन, आपल्याआपल्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळत प्रत्येक मुंबईकर जगण्याची कसरत करू लागतो आणि पहिले संकट दूर होताच, धडपडीला मुंबई स्पिरिट असे नाव देत यंत्रणांचे कत्रेकरविते मुंबईकरांचे कौतुक करू लागतात.

प्रत्येक संकटानंतर  मुंबई स्पिरिटचे हे लोढणे उरी बाळगण्याचा आता मुंबईकरांना वीट येऊ लागला आहे. त्याचेच पडसाद मंगळवारच्या दुर्घटनेनंतरच्या दैन्यावस्थेनंतर समाजमाध्यमांवरून उमटले. प्रगतीची नवी स्वप्ने दाखविणाऱ्यांनी हा सूर ओळखला पाहिजे. जीविताच्या सुरक्षिततेची हमी ही मुंबईकराची पहिली गरज आहे. कारण ही मुंबई फक्त ऐषारामी, धनवंतांची नाही. ती कष्टकऱ्यांची आहे. त्याच्या घामातून, श्रमातून मुंबई बहरली आहे. अशा तकलादू, बेभरवशाच्या सुविधांवर विसंबून जगणे पणाला लावण्याची ताकद या हतबल कष्टकऱ्यांच्या मनगटात आहे तोवर सारे ठीक आहे. ती संपली, की त्यासोबत कदाचित त्याची सहनशक्तीही संपेल. इथले भय संपत नाही असे त्याला वाटेल, तेव्हा तो भयाची मुळे उपटून टाकण्यासाठी सरसावेल, तेव्हा तो उद्रेक आवरण्यासाठी केवळ स्वप्नांचे फुलोरे पुरेसे ठरणार नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 3:23 am

Web Title: railways administration responsible for andheri bridge collapse
Next Stories
1 अघोरी आणि अपरिपक्व
2 शहा विरुद्ध वसुंधरा राजे
3 धोकादायक उलटा प्रवास
Just Now!
X