News Flash

‘बॅरोनेस’ जेम्स

‘आयुष्यानं मला शिकवलंय की, सुख ही आपल्याला मिळालेली भेट असते

जेम्सने निर्मिलेलं कादंबरीविश्व कधी पारंपरिक, तर कधी आधुनिक असतं. तिच्या कादंबऱ्यांमध्ये खुनांची मालिका नसते, खून आडठिकाणी घडत नाही. कधी चर्च चॅपेलमध्ये, तर कधी न्यायवैद्यकशास्त्राच्या प्रयोगशाळेत घडतो, कधी आपल्या आजूबाजूच्या वाटाव्यात अशा बागा असतात. आपल्या कादंबऱ्यांमधील पात्रांचे व्यवसाय निवडताना, दिनक्रम ठरवताना ती अशीच काळजी घेई. त्यामुळे शेवटपर्यंत त्यातील अनपेक्षितता, उत्सुकता कायम राहायला मदत होते.

‘आयुष्यानं मला शिकवलंय की, सुख ही आपल्याला मिळालेली भेट असते, तो काही आपला अधिकार नसतो. त्या भेटीचा आनंद घ्यावा. आयुष्यातल्या किती तरी गोष्टी माझ्या लक्षात आहेत, पण त्या आठवणी त्रासदायक आहेत. त्यांच्याबद्दल आता मी काही लिहावं असं मला वाटत नाही. गतकाळातील त्या गोष्टी मी स्वीकारल्या आहेत. त्या त्या वेळी त्या अर्थपूर्णच असतील आणि एवढय़ा मोठय़ा आयुष्यात त्यांची जागा त्यांना मिळालीय. मग आपल्या सुप्त मनातील सगळी हिंस्र श्वापदं आत्मचरित्रात कशाला बाहेर काढायची? एका मानसशास्त्रज्ञानं म्हटल्याप्रमाणे, मनातल्या अंतर्गत संघर्षांवर निर्मिती, सर्जन हा उत्तम उपाय असतो. मी लेखक आहे, सुदैवी आहे, कारण माझ्याजवळ निर्मितीक्षमता आहे.’

आपल्या आयुष्याबद्दल लिहिताना इतकी समजूत दाखवणाऱ्या पी.डी. जेम्सनं आयुष्यभर वाटय़ाला आलेलं दु:ख, करावा लागलेला संघर्ष अशाच शांतपणे पेलला. आत्मचरित्रातून लिहिणाऱ्याची जीवनदृष्टी लक्षात येते. तिला सोबत होती ती केवळ आपल्या सर्जनशीलतेची आणि वाचकांच्या प्रेमाची. ती सोबतही फार उशिराच लाभली, कारण आधी तिची जाणीवच जेम्सला नव्हती.

कोण होती ही पी.डी. जेम्स? तिचं विशेष असं काय? फिलीस डोरोथी जेम्स व्हाईट म्हणजेच पी.डी. जेम्स ही ब्रिटिश लेखिका रहस्यकथांची दुसरी सम्राज्ञी होती. रहस्यप्रधान लेखनात अगाथा ख्रिस्ती ही पहिली मानाची लेखिका. तिच्यानंतर हा मान आपल्याला मिळाला याचा जेम्सला फारच आनंद होता. वयाच्या ७९व्या वर्षी आपल्या आत्मचरित्राचा केवळ एक तुकडाच प्रसिद्ध करणाऱ्या जेम्सचं वेगळेपण त्यातूनही लक्षात येतं. ‘टाइम टु बी इन अर्नेस्ट’ या नावाचं तिचं आत्मकथन म्हणजे केवळ एका वर्षांची दैनंदिनी आहे. तिनं पुढे याला ‘अ फ्रॅगमेन्ट ऑफ ऑटोबायोग्राफी’ असं उपशीर्षकही जोडून आपण सारं काही सांगत नाही याची स्पष्ट जाणीव करून दिली आहे. ३ ऑगस्ट १९९७ ते ३ ऑगस्ट १९९८ या एका वर्षांतल्या घडलेल्या गोष्टींबद्दल सांगताना ती स्वत: प्रसंगाप्रसंगात आठवणींच्या हिंदोळ्यांवर झुलते आणि आपल्यालाही तिच्याबरोबर त्या स्मृतींची सहल घडवते. गतकाळ आणि वर्तमान अशी काळाची दुहेरी मिती तिच्या निवेदनातून जाणवते; पण त्यातही शंभर वर्षांपूर्वीचे इंग्लंड, तेथील सामाजिक वातावरण, परंपरा यांचे दर्शन अगदी सहजपणे घडते, तिची निकोप जीवनदृष्टीही लक्षात येते.

स्त्रियांबद्दलच्या काही समजुती वर्षांनुर्वष जगभरच्या समाजात प्रचलित आहेत. अमुक एक प्रकारची कामं ही त्यांच्यासाठी अयोग्य असतात असं मानलं जातं. स्त्रियांनी लेखन केलं तरी त्या काही ठरावीक प्रकारचंच लेखन करू शकतात. स्त्रिया आणि रहस्यकथा-कादंबरी? छे, छे! तशी रचना त्यांना कसली जमतेय? पण यालाही छेद देत काही लेखिका लिहितात आणि तेही दर्जेदार लिहितात. जेम्स ही अशा लेखिकांमधलीच एक.

मराठी साहित्यात रहस्यकथांचं दालन फारसं समृद्ध आहे असं दिसत नाही. अर्नाळकरांच्या रहस्यकथा लोकप्रिय होत्या; पण आजवर आपल्या स्त्रियांसाठी ही वाट अनोळखीच राहिली आहे असं दिसतं. एका शतकाची साक्षीदार असणाऱ्या जेम्सला मात्र खात्री होती की, स्त्रिया रहस्यप्रधान साहित्याची निर्मिती अधिक समर्थपणे, यशस्वीपणे करू शकतात. इंग्रजीत अगाथा ख्रिस्ती, डोरोथी सेयर्स, नॅगोई मार्श, रूथ रॅन्डेल यांसारख्या किती तरी रहस्यकथा लेखिका प्रसिद्ध आहेत. एखाद-दोन कादंबऱ्यांचा अपवाद वगळता, जेम्सने रहस्यप्रधान कथा वा कादंबऱ्या याशिवाय इतर काही लिहिलं नाही.

ऑक्सफर्ड येथे जन्मलेल्या फिलीसचं कुटुंब कनिष्ठ मध्यमवर्गीय होतं. तिला दोन लहान भावंडं होती. आईवडिलांना लिहिण्या-वाचण्याची आवड नव्हती. पापभीरू आई आणि सतत उपरोधिक बोलणारे वडील. जेम्स म्हणते, ‘आईवडिलांचं लग्न हे अयशस्वी, निष्प्रेम लग्न होतं. घटस्फोट घेणं हे पाप समजलं जाई असा तो काळ. पोटगी व मुलांचा खर्च देणं वडिलांना परवडणारं नव्हतं, म्हणूनच ते एकत्र राहिले.’ नंतर आई आजारपणात गेल्यानं घराची जबाबदारी जेम्सवरच आली. घरकाम, नोकरी यात ती पिचून गेली. निद्रानाशासारखा विकार जडू पाहात असताना, त्यावर उपाय म्हणून ती मनोमन आपलं वेगळं विश्व रेखाटून त्यातच रमू लागली. लहानपणापासून आपण लेखिका व्हायचं असं तिचं स्वप्न होतंच. या काळात हे मनोविश्व आणि वाचन यांचाच तिला आधार होता.

दुसऱ्या महायुद्धाचे चटके बसत होते. जागतिक मंदी होती. १९४१ मध्ये आर्मीमधल्या कॉनॉर व्हाईट या डॉक्टरशी तिचा विवाह झाला. दोन मुली झाल्या आणि तो युद्धावर गेला. मात्र परतला तो मनोरुग्ण होऊन, अपंगावस्थेत. डॉक्टरची बायको म्हणून यशस्वी संसार, आर्थिक समृद्धी मिळण्याऐवजी दोन मुली व नवरा या साऱ्यांनाच सांभाळण्याची वेळ आली. अतिशय धैर्याने व सामर्थ्यांने तिनं निभावलं. तिच्या वयाच्या ४४ व्या वर्षीच पतिनिधनाचा आघात तिला सोसावा लागला. त्यानंतर आपल्याला कधीच, कुणा पुरुषाबद्दल प्रेम किंवा आकर्षणही वाटण्याची शक्यताच नव्हती, एवढंच म्हणत ती आपलं प्रेम व्यक्त करते, पण त्या आठवणींनी हळवी होऊनही, ती अधिक व्यक्त होत नाही. जणू त्या आठवणी उघड करणं म्हणजे आपल्या खासगीपणावर आक्रमण आहे असं तिला वाटतं.

आर्थिक अडचणींना तोंड देत असताना वेगवेगळ्या नोकऱ्या तिने केल्या. बुद्धिमान जेम्सला नॅशनल हेल्थ सव्‍‌र्हिस, न्यायवैद्यकखाते, गृहमंत्रालयाच्या गुन्हेखात्यात मुख्य प्रशासकीय अधिकारी अशा पदांवर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे विषांच्या विविध नमुन्यांपासून गुन्हेगारांच्या विविध कार्यपद्धतींपर्यंत तत्संबंधित गोष्टींची अधिकृत माहिती तिला आपोआपच मिळे. आईचं व पतीचं आजारपण, त्यासाठी हॉस्पिटलच्या खेपा, यामुळं त्या वातावरणाचा अनुभव आला. त्यामुळे जेव्हा तिनं लिहायला आरंभ केला तेव्हा तिच्याजवळची अनुभवाची शिदोरी भक्कम  होती. आपला व्यवसाय व आवड ही परस्परपूरक ठरणं हा दुर्मीळ योग तिला लाभला होता.

या सगळ्यामुळे तिनं रहस्यकथा लिहायचं ठरवलं का? तर असं मुळीच नाही. पहिल्यापासून तिला रहस्यकथा-कादंबरी यांचंच आकर्षण होतं. ती म्हणते, ‘एक दिवस असा आला की, आपण लिहिल्याशिवाय जगू शकणारच नाही अशी भावना तीव्र झाली आणि मी कोरे कागद पुढे ओढले. पहिला आराखडा रहस्यकथेचाच तयार झाला.’ इतक्या दिवसांपासून मनात साचलेल्याला वयाच्या चाळिशीनंतर शब्दरूप मिळालं.

‘कव्हर हर फेस’ ही तिची पहिली कादंबरी १९६२ मध्ये प्रसिद्ध झाली. ‘फेबर अन्ड फेबर’ या ख्यातनाम प्रकाशकाकडे हस्तलिखित पाठवल्यानंतरची अस्वस्थता आणि त्यांच्या होकारानंतर झालेली मनाची हर्षोत्फुल्ल अवस्था तिने आत्मचरित्रात फार सुंदर रीतीने व्यक्त केली आहे. नवरा हॉस्पिटलमध्ये आणि मोठय़ा झालेल्या मुली दूर. शिवाय आपल्या आईच्या लेखनशक्तीची कल्पना त्यांना तोवर नसल्याने त्याविषयी त्या साशंक! कुणाशी बोलणार ती? जेम्स म्हणते, ‘पहिल्यापासून माझा स्वभाव शंकेखोर. सारखे का, कसं, केव्हा, कशावरून, असे प्रश्न माझ्या मनात येत. त्याचाच फायदा मला रहस्यकथा, कादंबरी लिहिताना झाला असावा. मात्र पहिल्या पुस्तकापासून मी कधीच अडखळले नाही. कदाचित अशा शंकेखोर वृत्तीने मीच सारे प्रश्न मनात उभे करून मीच त्यांची उत्तरे देई.’

या पहिल्या कादंबरीपासूनच ती वाचकांना प्रिय झाली. तिने एकापाठोपाठ एक अशा वीस रहस्यप्रधान कादंबऱ्या लिहिल्या. आपल्याला मिळालेले यश जर आधी मिळाले असते तर त्यामुळे आपल्या पतीला कदाचित मानसिक आधार मिळाला असता याची खंत मात्र तिला वाटे.

जेम्सने निर्मिलेलं कादंबरीविश्व कधी पारंपरिक, तर कधी आधुनिक असतं. तिच्या कादंबऱ्यांमध्ये खुनांची मालिका नसते, खून आडठिकाणी घडत नाही. कधी चर्च चॅपेलमध्ये, तर कधी न्यायवैद्यकशास्त्राच्या प्रयोगशाळेत घडतो, कधी आपल्या आजूबाजूच्या वाटाव्यात अशा बागा असतात. आपल्या कादंबऱ्यांमधील पात्रांचे व्यवसाय निवडताना, दिनक्रम ठरवताना ती अशीच काळजी घेई. त्यामुळे शेवटपर्यंत त्यातील अनपेक्षितता, उत्सुकता कायम राहायला मदत होते. कथानकाचा आशय गडद होईल, अशी शीर्षकं निवडण्याकडे तिचा कल असे. तिच्या लेखनाला अनुभवांचा आधार व पाया असल्याने इतरांपेक्षा तिचं लेखन जास्त वास्तवाधारित व विश्वसनीय आहे असं लक्षात येतं. कोणत्याही रीतीने ती शंकेला जागाच ठेवत नसे. अनेक समीक्षकांच्या मते तिचं लेखन अधिक दर्जेदार व कलात्मक होतं. खरं म्हणजे प्रत्येक कादंबरी म्हणजे वाचकांना मेजवानी असते.

डॅलग्लिएश या पुरुष डिटेक्टिव्हप्रमाणेच जेम्सने आपल्या दोन कादंबऱ्यांमधून कॉर्डेलिया ग्रे नावाच्या स्त्री डिटेक्टिव्हचे पात्रही निर्मिले. तरुण, सुस्वरूप कॉर्डेलिया ही काही व्यावसायिक डिटेक्टिव्ह नाही, हे जेम्स ‘अँन अनसुटेबल जॉब फॉर अ वुमन’ या कादंबरीच्या नावातूनच सुचवते. हा व्यवसाय स्त्रियांचा नाही, हे परंपराप्रधान इंग्लंडने ठरवले आहे; पण प्रसंगवशात तिच्यावर हे काम आल्यावर ती आपल्या स्त्रीसुलभ कौशल्याने व बुद्धिचातुर्याने रहस्याची उकल करून स्त्रियाही अशी कामे उत्तम रीतीने करू शकतात हे सिद्ध करते.

जेम्स धार्मिक वृत्तीची, अँग्लिकन पंथाची कट्टर अनुयायी होती. त्यामुळे तिच्या लेखनात चांगले-वाईट, उचित-अनुचित अशा बाबींची चर्चा पात्रांच्या तोंडी असते. ‘परमेश्वर जन्मलेल्या प्रत्येकाला दाणापाणी देतो, पण तो तुमच्या घरटय़ात आणून देत नाही’, या श्रद्धेने जीवन जगणारी जेम्स. डिटेक्टिव्ह डॅलग्लिएश धर्मगुरूचा मुलगा असे दाखवल्याने त्या चर्चेला सहज, नैतिक अधिष्ठान मिळते.

जेम्सच्या रहस्यप्रधान नसणाऱ्या, ‘इनोसन्ट ब्लड’ व ‘चिल्ड्रेन ऑफ मेन’ अशा दोन वेगळ्या कादंबऱ्या भरपूर गाजल्या. ‘इनोसंट ब्लड’ ही कादंबरी अमेरिकेत किती तरी दिवस बेस्टसेलर होती. ‘चिल्ड्रेन ऑफ मेन’ ही विज्ञानशोधावर आधारित कादंबरी मानवजातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करते. त्यावर निघालेला चित्रपटही गाजला आहे. जेम्सने अगदी शेवटी, म्हणजे २०११ मध्ये कादंबरीलेखनाचा वेगळा प्रयोग सादर केला. जेन ऑस्टेन या लेखिकेच्या ‘प्राइड अन्ड प्रेज्युडिस’ या गाजलेल्या कादंबरीचा पुढचा भाग ‘डेथ कम्स टू पेम्बर्ली’ नावाच्या या कादंबरीत, जेनच्या कादंबरीतील पात्रांच्या आयुष्यात सहा वर्षांनंतर काय घडले यासंबंधी तिने काल्पनिक गूढ निर्माण केले.

साहित्यासाठीचे अनेक मानाचे पुरस्कार तिला मिळाले. तरीही मुख्य प्रवाहातील कादंबरीचा बुकर पुरस्कार मिळाल्याशिवाय आपल्याला समाधान नाही असे तिला वाटे. अल्पशिक्षित जेम्सला इंग्लंडमधील सात विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट दिली. सर्वात मानाचा पुरस्कार इंग्लंडच्या राणीकडून मिळालेला ‘बॅरोनेस जेम्स ऑफ हॉलंड पार्क’ हा जीवनगौरव पुरस्कार होता. त्यामुळे ती ‘हाऊस ऑफ लॉर्डस्’मध्ये मानाने बसत होती. स्त्रियांच्या हक्कांसाठी, स्त्रियांना समान वेतन मिळावे यासाठी ती प्रयत्नशील होती. आधुनिक जगातील आत्यंतिक व्यक्तिवाद, चंगळवाद यांचे तिला वावडे होते. मोठय़ा जीवनसंघर्षांनंतर आपले बुद्धिकौशल्य वापरून वाचकांना रहस्यपूर्ण कोडी घालणे आणि सोडवणे यात जेम्सने मिळवलेले हे यश पाहून स्त्रियांसाठी हा उद्योग खरंच अयोग्य आहे का, असाच प्रश्न पडतो.

 

फिलीस डोरोथी जेम्स (१९२०-२०१४)

  • २० कादंबऱ्या, ३-४ कथासंग्रह, (रहस्यप्रधान) आत्मचरित्र
  • क्राइम रायटर्स असोसिएशनतर्फे अनेक पुरस्कार.
  • त्यात सिल्वर डॅगर, डायमंड डॅगर असे रहस्यप्रधान लेखनासाठीचे मानाचे पुरस्कार.
  • बी.बी.सी.च्या रेडिओ ४ या विभागाची संचालिका

 

डॉ. मीना वैशंपायन

 meenaulhas@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 3:29 am

Web Title: phyllis dorothy james
Next Stories
1 ‘ती’ तर प्रेमदिवाणी
2 मल्याळी कवितेची ‘जननी’
3 साहित्यरती
Just Now!
X