News Flash

अन्यथा – पद्मावतीचा प्रश्न

अरिवदच्या अहवालामुळे वाहन उद्योगात खळबळ माजते, पण एकदाही त्या कंपनीकडनं किंवा तिच्या वतीनं..

अरिवदच्या अहवालामुळे वाहन उद्योगात खळबळ माजते, पण एकदाही त्या कंपनीकडनं किंवा तिच्या वतीनं.. साहेब, जरा सांभाळून घ्या.. असा किंवा तत्सम संदेश आला नाही. इतकंच काय.. तुम्ही काय करताय ठाव है का.. कोणाच्या वाटय़ाला जाताय.. असंही  त्याला कोणी विचारलं नाही..

अरविंद थिरुवेंगडम पद्मावती हा गेली बरीच वर्षे भारतात आला नसावा. त्यामुळेच त्याला वाटेल ती स्वप्नं पडतात. भलतीच इच्छा आहे त्याची. बरंच काही करता येईल..करायला हवं भारतात असं वाटतं त्याला. अरिवद मूळचा चेन्नईचा. तिथल्या महाविद्यालयात अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि अलीकडच्या प्रथेप्रमाणं एमएस करण्यासाठी म्हणून अमेरिकेला गेला. आणि त्या प्रथेच्या परंपरेप्रमाणं गेला तो गेलाच. तिकडे एमएस केलं त्यानं. चांगलं अगदी उत्तम गुणांनी. मग तिथल्याच एका संस्थेत नोकरी पत्करली. या अशा प्रज्ञागमनाची आपल्याला सवयच झालीये. आपल्या पंतप्रधानांच्या मते ही प्रज्ञाठेव आहे..गमन नाही. ही मुदत ठेव कधी संपणार हे माहिती नाही, हा एक मुद्दा आहे. असो.

तर अरविंदनं एमएस झाल्यावर संगणक, माहिती क्षेत्र, बँका, वित्तसंस्था वगरे क्षेत्राची चाकरी पत्करली नाही. तो चक्क सहप्राध्यापक म्हणून काम करतो. तसं आश्चर्यच. अजूनही कोणाला तरी कोणाला काही तरी शिकवता यावं यासाठी शिक्षक व्हावं असं वाटतं हेच किती आनंददायक. अगदी गळा दाटून यावा, असं. अर्थात हे अध्यापन काही तो भारतात करणार नाहीये..पण तरी का असेना. अमेरिकेत तर अमेरिकेत. शिक्षक व्हावंसं वाटलं या तरुण मुलाला हेच काय कमीये. असो. तर त्याला त्यानं तिकडे अमेरिकेत जे काही करता आलं ते आपल्याकडे भारतातही करता येईल्का..असा प्रश्न पडून राहिलाय. आणि आपणच ते करावं असं काही त्याचं म्हणणं नाही. कुणी तरी या प्रश्नाला हात घालावा असं आणि इतकंच त्याचं म्हणणं आहे. पण त्या आधी त्याला काही भागातनं िहडवून आणायला हवं..काही बातम्या सांगायला हव्या.

बातम्या अगदी अलीकडच्याच. मुंबई-पुणे महामार्गावर पुढच्या ट्रकला मागनं रात्रीच्या अंधारात एखादी मोटार धडकल्याच्या. कडेला उभ्या असणाऱ्या ट्रकला असंच कोणतं वाहन येऊन आदळल्याच्या. या आणि अशा असंख्य अपघातांमागच्या नसíगक कारणांची त्याला माहिती द्यायला हवी. नसíगक म्हणायचं कारण आपल्याकडच्या कित्येक ट्रक्सना ना मागे दिवा असतो, ना प्रकाश परावíतत करणारी पट्टी. तेव्हा अपघात झाला तर तो तसा नसíगकच. या आणि अशा वाहनांतून, मोटारींतून भकाभक बाहेर पडणारा धूर त्याला दाखवायला हवा. या धुरामुळे वाढणाऱ्या फुप्फुसांच्या आजारांची कल्पना त्याला द्यायला हवी. कालबाह्य़ झालेल्या, भंगार म्हणूनसुद्धा लायकी नसलेल्या मोटारी आपण कसे अभिमानाने वापरतो, याचा तपशील त्याला द्यायला हवा. नव्यापेक्षा जुन्या मोटारींचीच दुकानं आपल्याकडे कशी गजबजलेली असतात, हे त्याला सांगायला हवं. या सगळ्याची काहीच माहिती न देता त्याला स्वप्नरंजनात मोकळं सोडणं हे काही बरोबर ठरणार नाही.

पण करतो काय हा अरविंद थिरुवेंगडम पद्मावती?

अरविंद अमेरिकेतल्या वेस्ट व्हर्जििनया विद्यापीठात आहे. दोनेक वर्षांपूर्वी इंटरनॅशनल कौन्सिल फॉर क्लीन ट्रान्स्पोर्टेशन, म्हणजे आयसीसीटी, या संघटनेनं एक आवाहन केलं होतं. युरोपातल्या कोणत्याही तीन कंपन्यांच्या डिझेलवर चालणाऱ्या मोटारींच्या उत्सर्जनाची जिवंत तपासणी करायची. जिवंत म्हणजे फक्त प्रयोगशाळांतून नव्हे. तर मोटारी सुरू असताना, रस्त्यात असताना, वळणावर, घाटात..किंवा कुठेही सुरू असताना त्यांतून निघणाऱ्या धुरांची तपासणी करायची.

आव्हान होतं ते. कारण ते तसं करणं वाटतं तितकं सोपं नसतं. अनेक अभियांत्रिकी क्रिया, संगणक आज्ञावली वगरे बरीच काही तयारी करावी लागते. अरविंद काही मोटार वाहतूकतज्ज्ञ नव्हे. तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी. पण त्याच्या अभ्यासातली एक शाखा त्याला या विषयाच्या जवळ घेऊन गेली. इंधनाचं ज्वलन होत असताना कमीत कमी प्रदूषण कसं होईल हा त्याच्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय. त्यामुळे त्याच्या वेस्ट व्हर्जििनया विद्यापीठानं या प्रकल्पासाठी बोली लावली. अरिवदला विचारलं सहभागी होशील का. तो आनंदानं हो म्हणाला. कारण एकच. ते म्हणजे अशा संशोधनात, पाहणीत प्रचंड म्हणता येईल अशी माहिती, तपशील, आकडेवारी हाती लागत असते. कोणत्याही शास्त्रीय अभ्यासकासाठी ही इतकी माहिती म्हणजे पर्वणीच. नंतर निवांतपणे प्रयोगशाळेत बसून तिचं पृथक्करण करणं आणि त्या निष्कर्षांच्या आधारे नवे आडाखे बांधणं, अभियांत्रिकी तंत्रज्ञांना तिच्या आधारे त्यांच्या त्यांच्या उत्पादनांत बदल सुचवणे..आणि एकंदरच प्रगतीचा भाग होणं..हे सगळंच बुद्धिगम्य. त्यामुळे अरिवद आनंदानं हो म्हणाला. ते फारच छान झालं. कारण तिथे इतिहास घडला.

अरिवदच्या हाती आल्या फोक्सवॅगन कंपनीच्या मोटारी.

या अरिवदचा संदर्भ आता अनेकांच्या लक्षात आला असेल. नक्की काय केलं त्यानं?

तो म्हणतो..फार काही नाही. मुख्य म्हणजे आमचा उद्देश होता तो फक्त माहिती गोळा करण्याचा. आम्हाला मिळेल ती माहिती हवी होती. विशिष्ट प्रकारच्या रस्त्यावर विशिष्ट वाहनाचं इंजिन कसं वागतं..त्यातला बदल कसा होतो..बाहेर पडणाऱ्या धुरातले घटक कसे आणि किती बदलतात..वगैरे अनेक मुद्दे त्याला संशोधनासाठी हवे होते. खरं तर या टप्प्यावर त्याला सांस्कृतिक धक्का बसला असावा. कारण त्यांचं भारतीय मूळ. कोणाला कशासाठी तरी पकडण्यासाठी पाहणी करायची नसेल आणि त्यातनं काही चिरीमिरी मिळणार नसेल तर अर्थच काय त्या पाहणीचा? आपल्याकडे चौकात, नाक्यावर दबा धरून बसलेले वाहतूक पोलीस त्याला आठवले असतील. असो. मार्क बेस हा त्याचा स्विस सहकारी या कामात त्याला साथीदार बनला.

मग हे दोघे मिळून फोक्सवॅगनच्या मोटारी घेऊन िहडायला लागले. वेगवेगळे रस्ते आणि वेगवेगळी माहिती. सोबत होता या वाहनांच्या प्रयोगशाळेतील चाचण्यांच्या निकालांचा तपशील. हे करताना प्रचंड माहिती साठा, निरीक्षणं त्यांच्या हाती लागली. ती इतकी प्रचंड होती की त्या माहितीचं पृथक्करण करण्यातच सहा महिने गेले. ते केल्यानंतर त्याला एक जाणवलं.

ते म्हणजे कंपनी दावा करतीये ते प्रयोगशाळेतले निष्कर्ष आणि मोटार प्रत्यक्ष धावत असताना केलेल्या पाहणीतले निष्कर्ष यात खूप तफावत आहे. अरिवद म्हणतो, प्रयोगशाळेतल्या निष्कर्षांपेक्षा प्रत्यक्ष पाहणीतले निष्कर्ष वेगळे असणार हे माहीत होतं. पण यात असून असला तर फरक पाचदहा टक्क्यांचा. म्हणजे प्रयोगशाळांतल्या निष्कर्षांपेक्षा खऱ्या पाहणीतले निष्कर्ष काही प्रमाणात वेगळे असणार हे मान्यच. परंतु म्हणून ते चौपट, पाचपट इतके भिन्न असू शकत नाहीत. पण मग ते इतके भिन्न कसे? त्याला वाटलं आपलंच चुकलं असेल. म्हणून मग त्यानं पुन्हा सगळी पाहणी नव्यानं केली. नवे रस्ते. कंपनी तीच. पण नवीन, वेगळ्या मोटारी. नवी वाहतूक परिस्थिती आणि नवे निष्कर्ष. सगळाच्या सगळा माहिती साठा त्या दोघांनी पुन्हा नव्यानं जमवला. आधीचा बाजूला ठेवला आणि मग या नव्याचं विश्लेषण केलं. निकाल तोच. कंपनीचा दावा आणि वस्तुस्थिती यात लक्षणीय तफावत. हे असं का? आणि कसं?

या प्रश्नाच्या उत्तरात समोर आला मोटार कंपन्यांच्या क्षेत्रातला महाघोटाळा. हा संपूर्ण व्यवसायच त्यामुळे हादरून गेला. त्याचा धक्का इतका तीव्र होता की फोक्सवॅगन कंपनीचे प्रमुख मार्टनि िवटरकॉर्न यांना पायउतार व्हावं लागलं. वर परत कंपनीच्या डोक्यावर १८०० कोटी डॉलर इतक्या भरभक्कम दंडाची तलवार आहेच. या कारवाईचं श्रेय जातं अरिवदच्या पाहणीला. त्यानं जे काही श्रम या पाहणीत घेतले त्यामुळे हा भलाथोरला घोटाळा उघड झाला. फोक्सवॅगन इतकी बलाढय़ कंपनी. पण तिच्या वाहनांविषयी असा प्रतिकूल अहवाल येतोय म्हटल्यावर कंपनीकडून काही तोडपाण्याचे प्रयत्न झालेच असणार?

अरिवद सांगतो एकदाही या कंपनीकडनं किंवा तिच्या वतीनं..साहेब, जरा सांभाळून घ्या.. असा किंवा तत्सम संदेश आला नाही. इतकंच काय..तुम्ही काय करताय ठाव है का ..कोणाच्या वाटय़ाला जाताय..असंही या दोघांना कोणी विचारलं नाही. तो म्हणतो..हे फक्त अमेरिका वगरे भागातच असं घडू शकतं.

आणि तरीही भारतात काही तरी करायची त्याची इच्छा आहे. कधी चेन्नईला आलो की आपल्याकडचं वाहनांचं प्रदूषण आणि त्याबाबतची सार्वत्रिक बेपर्वाई थक्क करणारी आहे..असं अरिवद म्हणतो. म्हणून त्याची इच्छा आहे भारतात काही तरी करायला हवं, यावर..ते का होत नाही, हा त्याचा प्रश्न आहे.

त्याला काय माहीत, गेली कित्येक वर्षे समग्र भारत याचंच तर उत्तर शोधतोय..
गिरीश कुबेर
girish.kuber@expressindia.com
@girishkuber

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 12:03 am

Web Title: article on arvind thiruvengadam padmavathy reports on car
Next Stories
1 काळ्या सोन्याचा सोनेरी मुलामा
2 ..जन्म एक व्याधी
3 करोगे याद तो..
Just Now!
X