गिरीश कुबेर

जिवंत रसरशीत लोकशाही काम करताना पाहण्याचा हा आनंद अवर्णनीय म्हणावा असा! या सर्वाचं थेट प्रक्षेपण बीबीसी, सीएनएनवर आपल्या प्रमाणवेळेनुसार पहाटेपर्यंत सुरू होतं..

‘‘या देशाचे, घटनेचे निर्माते इतिहासात सम्राटांसमोर झुकले नाहीत. वर्तमानात आम्हीही आजच्या युगाच्या उद्योगसम्राटांसमोर दबून जाण्याची शक्यता नाही,’’ रिपब्लिकन पक्षाचे लोकप्रतिनिधी डेव्हिड सिसिलीन यांनी हे वाक्य उच्चारलं आणि सुरू झाला एक अपूर्व सोहळा. एका बाजूला होते ज्यांच्याविषयी फारसं काही माहीत नाही, असे बरेच कोणी. आणि दुसऱ्या बाजूनं पडद्यावर होते ज्यांच्याविषयी फारसं काही माहीत नाही असं अजिबात नाही, असे मोजकेच चार. ते चौघेही नव्या युगाचे नवे शिलेदार. यशवंत आणि कीर्तिवंत. कल्पनाही करू शकणार नाही इतक्या अवाढव्य औद्योगिक विश्वाचे निर्माते आणि सूत्रधार. त्यांची वैयक्तिक संपत्ती आपल्या काही प्रांतांच्या महसुलाइतकी. आणि या चौघांच्या साम्राज्याची किंमत एकत्र केली तर या देशाच्या परकीय चलन गंगाजळीस पर्याय ठरू शकेल अशी धडधाकट. पण हे चार महारथी मुकाट बसून होते. एरवी यांच्या शब्दांवर जगाची अर्थव्यवस्था वरखाली होते. पण आज त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. हा सोहळा सलग सहा तास चाललेला. अनेक नाटय़पूर्ण प्रसंगांनी ओतप्रोत भरलेला. डोळ्याचं/ मनाचं/ कानाचं पारणं फेडणारा. आणि अंतिमत: मनात अपूर्णतेच्या वेदनेचं काहूर उमटवणारा.

मुद्दा इतकाच की अ‍ॅपल, गूगल, अ‍ॅमेझॉन, फेसबुक या चार कंपन्यांनी आपल्या नावीन्यपूर्ण उत्पादनांनी कमावलेल्या आर्थिक ताकदीचा वापर स्पर्धकांचा गळा घोटण्यासाठी आणि एक प्रकारे मक्तेदारी निर्माण करण्यासाठी केला का, याची चौकशी. त्यात टिम कुक, सुंदर पिचाई, जेफ बेझोस आणि मार्क झुकरबर्ग या चार कंपन्यांच्या प्रमुखांची उलटतपासणी झाली. अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या उपसमितीसमोर या चौघांना त्यांच्या व्यवसाय प्रारूपाविषयी अनेक प्रश्न विचारले गेले. वर उल्लेखिलेले सिसिलीन हे या उपसमितीचे प्रमुख. या उपसमितीच्या प्रत्येक सदस्याला बोलायला प्रत्येकी पाच मिनिटं. पाच म्हणजे पाचच. तो बोलायला लागला की शेजारी स्टॉपवॉच सुरू. चार मिनिटं ५० सेकंदांनी तो आवरतं घ्यायचा म्हणजे घ्यायचा. उगाच आपली वक्तृत्वकला दाखवण्याचा जराही प्रयत्न नाही. बरोबर पाच मिनिटांत आटोपेल इतकाच ऐवज प्रत्येकानं लिहून आणलेला. उत्स्फूर्तता मिरवण्याचा आगाऊपणा एकाकडूनही नाही. या लोकप्रतिनिधींप्रमाणे उद्योगपतींनाही तितकाच वेळ. एखादा जास्त मोठा अब्जाधीश आहे म्हणून त्याला थोडी सवलत वगैरे प्रकार नाही. ही अशी नियमांची चौकट त्यांनी आखून घेतली आणि मग त्यात हा मेंदू दिपवणारा प्रकार घडत गेला.

साधा एखादा लोकप्रतिनिधी, म्हणजे आपला खासदार म्हणता येईल असा. पण ज्या पद्धतीनं, आत्मविश्वासानं आणि चोख मुद्दय़ांच्या आधारे यातील एकेका उद्योगपतीला- आजच्या भाषेत सांगायचं तर- ‘घेत’ होता ते पाहून डोळे पाणावायचेच बाकी राहावेत. आपल्याकडचे असे समांतर प्रसंग आठवत राहिले ते पाहताना. अलीकडे गेटवे ऑफ इंडिया इथल्या कार्यक्रमात देश मुठ्ठी में घेऊन बसलेल्या उद्योगपतीची पत्नी. लक्षात घ्या फक्त पत्नी, म्हणजे एकटी- उद्योगपतीशिवाय- प्रवेश करती झाली तर पहिल्या रांगेत बसलेल्या पांढऱ्या शुभ्र राजकीय व्हीआयपींची तिला लवलवून कुर्निसात करण्याची कोण लगबग झाली होती.

आणि इथे भांडवलशाही म्हणून हिणवल्या जाणाऱ्या प्रदेशात या उद्योगपतींवर लोकप्रतिनिधी सटासट कोरडे ओढतायत. उदाहरणार्थ : रिपब्लिकन पक्षाचे केन बक यांनी सुंदर पिचाई यांना गूगलच्या चीनमधल्या उद्योगांविषयी प्रश्नांची सरबत्ती करून घाम फोडला. फक्त पाच मिनिटांत त्यांनी अमेरिकी भांडवलशाहीचा इतिहास आणि त्या इतिहासानं नव्या उद्योगांस दिलेला वाव यांचा इतका सुंदर आढावा घेतला की, लोकप्रतिनिधी आणि अभ्यास हे नातं कुठे तरी जिवंत आहे हे पाहून दिलासा मिळाला. आणि आपल्या प्रतिपादनाच्या अखेरीस ते अलगदपणे गूगल आणि चीन संबंधांवर आले. ‘‘अशा मुक्त वातावरणातच जन्माला येऊ शकेल अशा गूगलला इतक्या बंदिस्त, मानवताविरोधी आणि साम्यवादी चीनचे का बरे इतके आकर्षण’’, हा त्यांचा प्रश्न पट्टीचा गायक कुठूनही समेवर कसा अलगद उतरू शकतो त्याची आठवण करून देणारा होता.

मॅट गात्झ यांनी अ‍ॅपलच्या टिम कुक यांना अ‍ॅपल फोनच्या अ‍ॅपस्टोअरविषयी विचारलेले प्रश्न त्यांच्या तयारीची जाणीव करून देणारे होते. अ‍ॅपल फोनसाठी तुम्ही अ‍ॅप निवडता कशी, पात्रता कशी ठरवता, त्याबदल्यात तुम्हाला किती कमिशन मिळतं, त्या लहानग्या अ‍ॅप डेव्हलपरला किती देता.. बंदुकीच्या गोळ्यांसारखे सटासट येणारे हे प्रश्न विचारले म्हणून त्या लोकप्रतिनिधीचं कौतुक करायचं की आपल्याला का ते सुचले नाहीत म्हणून विषाद वाटून घ्यायचा हा विचार ते ऐकताना सारखा यायचा. जेमी रास्किन हे डेमॉक्रॅटिक पक्षाचे. तुलनेने तरुण. त्यांचे प्रश्न इतके टोकदार होते की, ते ऐकून यांना पुढच्या निवडणुकीसाठी देणगी कशी मिळणार याची काळजी दाटून आली. या कंपन्यांच्या व्यावसायिक धोरणांविषयी आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते हे रास्किन बरोब्बर समोरच्या उद्योगपतीकडून काढून घेत होते.

जेरॉल्ड नॅडलर, जो नेग्युस या दोघांनी तर कमालच केली. फेसबुकच्या झुकेरबर्गनं सहकाऱ्यांना पाठवलेले ईमेल्स त्यांनी उद्धृत केले. ‘इन्स्टाग्राम’ हे कसं फेसबुकसाठी आव्हान होऊ शकतं असं काही त्यात होतं. नंतर यथावकाश ‘इन्स्टा’ फेसबुकनं विकत घेतलं. व्हॉट्सअ‍ॅप जसं आता फेसबुकचाच भाग झालंय, तसंच इन्स्टाचंही झालं. तुम्ही बलाढय़ होता आणि ताकद आली की प्रतिस्पध्र्याला गिळंकृत करता या दोघांचा आरोप. यातले नॅडलर हे रिपब्लिकन आहेत तर नेग्युस हे डेमॉक्रॅट. पण दोघांचंही या कंपन्यांबाबत एकमत. अनेक मुद्दय़ांवर भूमिका घ्यायला त्यांना पक्षादेश लागत नाही. म्हणजे पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांच्यावर काही कारवाई नाही होऊ शकत. कमालच म्हणायची!

प्रमिला जयपाल या डेमॉकॅट्रिक पक्षाच्या. जेफ बेझॉसकडून त्यांनी मिळवलेली कबुली लाजवाब म्हणावी अशी. आपल्या अ‍ॅमेझॉन साइटवरच्या विक्रेत्यांचा डेटा तुम्ही ‘चोरता’ का, असं काही बेझोस यांना विचारणं हेच थोर. या प्रश्नावर त्यांनी बेझोस यांना असं काही घोळात घेतलं की त्याचीच मोठी बातमी झाली : आम्ही असा डेटा पळवत नाही. पण तसा डेटा वापरला गेल्याचा एकही प्रकार घडला नसेल असं मी सांगू शकत नाही. हा डेटा वापरायचा नाही असं आमचं धोरण आहे पण म्हणून धोरणभंग झालाच नसेल असं नाही. ही बेझोस यांची कबुली. जयपाल या मूळच्या चेन्नईच्या. तिथेच असत्या तर जयललिता किंवा तत्समांची अशी तपासणी करता आली असती का, असा एक चुकार प्रश्न मनात आला. जिम जॉर्डन या लोकप्रतिनिधीनं फेसबुक आणि अमेरिकी निवडणुका या मुद्दय़ावर झुकेरबर्ग यांची लाज काढताना मोकळेपणा आणि स्वैराचार यातला फरक अलगदपणे उलगडून दाखवला.

असे किती दाखले द्यावेत. जिवंत रसरशीत लोकशाही काम करताना पाहण्याचा हा आनंद अवर्णनीय म्हणावा असा. जगातले अनेक राष्ट्रप्रमुख ज्यांना भेटण्यासाठी, त्यांनी आपल्या देशात गुंतवणूक करावी यासाठी आसुसलेले असतात अशा या उद्योगमहर्षीना या सहा तासांत लोकप्रतिनिधींनी शब्दश: आडवं घेतलं. एखाद्या दुय्यम सरकारी कारकुनाची उलटतपासणी घेताना आपल्या यंत्रणा जितकं धैर्य, शौर्य दाखवतात त्याच्या कित्येक पट ताकद या साध्या लोकप्रतिनिधींनी उद्योगपतींना फैलावर घेताना दाखवली. ही खरी यातली कमाल. आणि या सर्वाचं थेट प्रक्षेपण बीबीसी, सीएनएनवर आपल्या प्रमाणवेळेनुसार पहाटेपर्यंत सुरू होतं. विम्बल्डनवर बोर्ग-मॅकन्रो, फेडरर अशांची लढत पाहताना रात्र सरल्याचं कळूही नये तितकी उत्कटता या सुनावणीत होती. साधारण सहाएक तासांनी हा सोहळा संपला. त्यानंतर त्यावरची चर्चा ऐकता ऐकता आपल्या इथे उजाडलं.

..आणि अंधाराची जाणीव अधिकच गडद झाली.

ता.क. : दुसऱ्या दिवशी मुद्दाम वॉशिंग्टन पोस्ट पाहिला. त्यांनी संपूर्ण पानभर या सगळ्याचं वृत्तांकन केलं होतं. मुख्य भर होता जेफ बेझोस याची कशी भंबेरी उडाली यावर. या वृत्तांकनाच्या अखेरीस एक तळटीप : ‘‘वॉशिंग्टन पोस्ट’ हे वर्तमानपत्र जेफ बेझोस यांच्या मालकीचे आहे’, इतकीच.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber