13 August 2020

News Flash

गणिताशी मैत्री

शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत अनेकांसाठी सर्वात कठीण वाटणारा विषय हा गणित असतो.

शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत अनेकांसाठी सर्वात कठीण वाटणारा विषय हा गणित असतो. गणिताचे नाव जरी घेतले की विद्यार्थी आळसावून जातात. ‘नको ती आकडेमोड’ असे उद्गार ऐकायला मिळतात. या संज्ञा, समीकरणांचा काय उपयोग? असा प्रश्नही विचारण्यात येतो. पण प्रत्यक्षात पाहिलं तर गणित हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. आपल्या रोजच्या जगण्यात वापरात असलेला गणिताइतका मोठा विषय कोणताही नाही. त्यामुळे गणिताबाबतची भीती मुलांच्या मनातून लहानपणापासूनच घालवली पाहिजे. यासाठी गणिताच्या अध्ययनाच्या सोप्या, रंजक पद्धती आता प्रचलित होऊ लागल्या आहेत. पण त्यानंतरही हा विषय अवघड वा अगम्य वाटत असलेल्यांनी ‘पॉकेट मॅथमॅटिक्स’ हे अ‍ॅप एकदा तरी आजमावून पाहायला हरकत नाही.

गणितातील महत्त्वाच्या संकल्पना, समीकरणे आणि सूत्रे यांचा समावेश असलेले हे शैक्षणिक अ‍ॅप विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. अगदी छोटय़ा आकडेमोडीपासून ‘लॉजिक’ गणितीपर्यंतच्या गोष्टी सहजसोप्या करून समजवण्यात हे अ‍ॅप यशस्वी ठरते. मॅथमॅटिकल लॉजिक, संच, अंकांचे वर्गीकरण, क्रिया-प्रतिक्रिया, सरासरी, फंक्शन्स, डेरिव्हेटीव्हज, व्हेक्टर, क्षेत्रफळ, आकारमान अशा असंख्य गणिती सूत्रे, समीकरणांबाबत या अ‍ॅपमधून माहिती मिळते. शिवाय या संकल्पना समजावून सांगणारी उदाहरणेदेखील आपल्याला या अ‍ॅपमधून जाणून घेता येतात. या अ‍ॅपचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे, प्रत्येक संकल्पनेचे विषयानुसार वर्गीकरण करण्यात आले असल्याने आपल्याला हवी ती माहिती पटकन मिळते.

वर म्हटल्याप्रमाणे गणिताशी दोस्ती केली तर त्याच्यासारखा मित्र कुणी नाही. सूत्रे, समीकरणे एकदा डोक्यात फिट्ट बसली की, आयुष्यभर कधीही, कोठेही, कोणत्याही क्षणी तुम्ही यासंबंधित आकडेमोड अगदी सहज करू शकता. पण यासाठी ही सूत्रे लक्षात राहिली पाहिजेत. हे करण्यासाठी हसतखेळत गणित जाणणे उपयुक्त ठरते. हे करण्यासाठी ‘निक्सगेम’चे हे अ‍ॅप तुम्हाला फायदेशीर ठरते. हे अ‍ॅप म्हणजे गणिताचा खेळच आहे. मात्र, हा खेळ खेळता आपल्याला कठीण व गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या गणिती संकल्पना एकदम उलगडून दाखवल्या जातात. विशेष म्हणजे, या अ‍ॅपमध्ये अगदी काही क्षणांत मोठमोठय़ा संख्यांचे गुणाकार, वर्ग, वर्गमूळ, भागाकार, घन कसे शोधायचे याच्या युक्त्याही नमूद करण्यात आल्या आहेत. अगदी लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत प्रत्येकासाठी या अ‍ॅपमध्ये गणिती खेळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या अ‍ॅपमध्ये दोन वेगवेगळय़ा वर्गामधील १६ गणिती कसोटय़ा पुरवण्यात आल्या आहेत.

हे अ‍ॅप गणिताशी संबंधित असले तरी ते आपल्या बुद्धिमत्तेचे सर्वागीण कसब तपासते व त्याला वाढवण्यास मदत करते. स्मरणशक्ती, एकाग्रता, वेग आणि प्रतिक्रिया यांची कसोटी हे अ‍ॅप पाहते. त्यामुळे हे अ‍ॅप विविध स्पर्धा परीक्षा, बुद्धिमत्ता चाचणी यांच्यासाठीही उपयोगी आहे.

asif.bagwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2016 12:57 am

Web Title: app for maths
Next Stories
1  ‘बोलता बोलता ‘नोट्स’
2 ‘ऑनलाइन’ भाजीबाजार
3 दिवाळीनंतरचा व्यायाम
Just Now!
X