News Flash

सर्व ई मेल एका क्लिकवर

अँड्रॉइड स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाकडे एक जी मेल अकाउंट असतोच. कारण त्याखेरीज स्मार्टफोनवरून गुगलच्या कोणत्याही सुविधा वापरता येत नाही. पण गेल्या काही वर्षांत ईमेल हे संवादाचे

अँड्रॉइड स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाकडे एक जी मेल अकाउंट असतोच. कारण त्याखेरीज स्मार्टफोनवरून गुगलच्या कोणत्याही सुविधा वापरता येत नाही. पण गेल्या काही वर्षांत ईमेल हे संवादाचे सर्वात प्रमुख माध्यम बनत चालले असल्याने बहुतांश लोकांकडे एकापेक्षा अधिक ईमेल अकाउंट असतात. त्यापैकी एक वैयक्तिक असतो, एखादा कंपनीचा असतो, एखादा हौसेखातर निर्माण केलेला असतो. हे सगळे ईमेल वापरात असतात तेव्हा प्रत्येक वेळी वेगवेगळे अ‍ॅप ओपन करावे लागतात. यात जाणारा वेळ आणि खर्च होणारा इंटरनेट डेटा वाचवायचा असेल तर क्लाउडमॅजिक  हे अ‍ॅप अतिशय उत्तम आहे. आजवर ४० लाख लोक वापरत असलेल्या या अ‍ॅपद्वारे जीमेल, याहू, आउटलूक, आयक्लाउड, गुगल अ‍ॅप्स, एक्स्चेंज अशा विविध प्रकारच्या खात्यांना एकत्रितपणे हाताळता येते. या अ‍ॅपमध्ये आपले सर्व अकाउंटवरील ईमेल एकत्रितपणे दर्शवले जातात. तसेच या अ‍ॅपमधून आपण कोणत्याही अकाउंटमधून ई मेल पाठवूदेखील शकतो. तसेच एखाद्या ईमेलमधील महत्त्वाचे ईमेल दुसऱ्या ईमेल खात्यातून हाताळणेही सहजशक्य होते. याशिवाय सर्व इमेल खात्यातील इन्बॉक्समधील ईमेल एकत्रितपणे नष्ट करणे, अन्यत्र हलवणे या क्रियाही क्लाउडमॅजिकद्वारे करणे शक्य होते. हे अ‍ॅप तुमच्या सर्व ईमेल खात्यातील महत्त्वाच्या अपॉइंटमेंट्स एकत्रितपणे दर्शवते.

मोठय़ांसाठी चित्रकलेचा आनंद

आपल्यातल्या प्रत्येकात एक चित्रकार दडलेला असतो. चित्रकलेत गती असो वा नसो आपल्यातला प्रत्येकजण चित्रे काढण्याचा किंवा रंगवण्याची आवड जोपासत असतो. मग वर्गात बसल्या बसल्या वहीतील पानांच्या समासात केलेले ‘अबोध’ नक्षीकाम असो की कार्यालयातील मिटिंगदरम्यान सहज चाळा म्हणून केलेलं रेखाटन असो, असे चित्रकाम आपल्यासाठी विरंगुळा असतं. हाच विरंगुळा आपल्याला स्मार्टफोनवरही उपलब्ध झाला आहे. स्मार्टफोनवर जसे गेमचे विविध अ‍ॅप्स आहेत तसेच, चित्र काढण्याचे किंवा रंगवण्याचेही अ‍ॅप आहेत. परंतु, यातील बरेचसे अ‍ॅप लहान मुलांना डोळय़ांसमोर ठेवून बनवले जातात. त्यामुळे अशा अ‍ॅपची रचना किंवा त्यातील चित्रे प्राणी, पक्षी किंवा कार्टून इथपर्यंतच मर्यादित राहतात. मात्र, ‘अ‍ॅडल्ट कलिरग बुक प्रीमियम’ हे अ‍ॅप खास प्रौढासाठी बनवले गेलेले अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या नक्षी, चित्रे, व्यक्ती यांच्या रेखाचित्रांत रंग भरण्याची संधी मिळते. अतिशय आकर्षक नक्षींमध्ये रंग भरताना तुम्ही या अ‍ॅपमध्ये अगदी गुंतून जाल. शेकडो प्रकारच्या रंगछटा या अ‍ॅपमध्ये पुरवण्यात आल्या असून त्यासाह्याने आपल्याला आपली चित्र रंगवण्याची हौस भागवता येते. ‘आता या वयात काय चित्र रंगवायची’ असा प्रश्न काहींना पडेल. पण प्रवासादरम्यान विरंगुळा म्हणून स्मार्टफोनवरील गेम खेळण्याऐवजी या अ‍ॅपमधील चित्रांमध्ये रंग भरण्याची मजा अधिक आहे, हे अनुभवाने जाणवेल. विशेष म्हणजे, रंगवलेली चित्रे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवरून शेअर करण्याची सुविधाही या अ‍ॅपमध्ये देण्यात आली आहे.

 

असिफ बागवान

asif.bagwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2016 1:14 am

Web Title: app world
Next Stories
1 झटकन संदर्भ, पटकन माहिती
2 संगणकाचा ‘रिमोट कंट्रोल’
3 फोटोंच्या ‘मूव्ही’ बनवा!
Just Now!
X