News Flash

फोनवरून पासपोर्ट

शहरी भागात इलेक्ट्रिशियन किंवा प्लंबर मिळवणं हे महाकठीण काम.

फोनवरून पासपोर्ट
पासपोर्ट हा आता प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक घटक बनला आहे. पहिल्यांदाच परदेशात जाण्याची तयारीच मुळी पासपोर्टपासून सुरू होते; पण त्याखेरीजही पासपोर्ट हा एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वपूर्ण पुरावा ठरू शकतो. एके काळी पासपोर्ट काढणे हे परदेशात जाण्याइतकेच कठीण आणि कटकटीचे काम होते; परंतु गेल्या काही वर्षांत ही प्रक्रिया अतिशय सुटसुटीत आणि जलद बनली आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करत पासपोर्ट विभागाने पासपोर्ट मिळवण्याची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. त्यामुळे अर्ज घेण्यापासून कागदपत्रांच्या छाननीपर्यंत आणि पोलीस ठाण्यांचे खेटे घालण्यापासून पासपोर्ट येण्याची प्रतीक्षा करेपर्यंतच्या अनेक अडचणींतून नागरिकांची सुटका झाली आहे. याचाच पुढचा भाग म्हणून आता स्मार्टफोनवरून पासपोर्ट मिळवणे सोपे झाले आहे. भारतीय नागरिकांना जलद, सहज आणि पारदर्शकपणे पासपोर्ट मिळवता यावा, यासाठी केंद्र सरकारने टाटा कन्सल्टन्सीच्या सहकार्यातून ‘पासपोर्ट सेवा’ हे अॅप सुरू केले आहे. ‘एमपासपोर्ट सेवा’ (mPassport Seva) नावाचे हे अॅप पासपोर्टसाठी अर्ज भरणे, नजीकचे पासपोर्ट सेवा केंद्र शोधणे, पासपोर्ट अर्जाची सद्य:स्थिती जाणून घेणे, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि शुल्काची माहिती पुरवणे अशा अनेक गोष्टींसाठी साहाय्य करते. याशिवाय तुमच्या हद्दीतील पोलीस ठाण्याची माहितीही या अॅपवरून मिळते.

‘सेवेकरी’ तुमच्या घरी
शहरी भागात इलेक्ट्रिशियन किंवा प्लंबर मिळवणं हे महाकठीण काम. तसं पाहायला गेलं तर ही अतिशय किरकोळ कामं, पण ती करून घेण्यासाठी आपल्याला हार्डवेअरवाल्याच्या दुकानांत फिरून इलेक्ट्रिशियन किंवा प्लंबरची शोधाशोध करावी लागते. सुतार, पेस्ट कंट्रोलवाले यांच्या बाबतीतही तसंच घडतं. बऱ्याचदा अर्धकुशल कामगारांकडून ही कामे करावी लागतात. त्यात कामाचा दर्जा ढासळतोच, शिवाय पुढच्या वेळी नव्याने ही कामे करण्यासाठी आर्थिक भरुदडही सोसावा लागतो. अशा वेळी ही सेवा घरबसल्या मिळवायची असेल तर ‘अर्बन क्लॅप’ (Urban Clap) हे अॅप वापरून पाहायला हरकत नाही. सुतारापासून लाँड्रीवाल्यापर्यंत आणि छायाचित्रकारापासून गिटार प्रशिक्षकापर्यंत असंख्य गृहोपयोगी तसेच व्यावसायिक कामे करणारे कामगार स्मार्टफोनच्या माध्यमातून पुरवण्याचे काम हे अॅप करते. या अॅपमध्ये ५०हून अधिक सेवा पुरवण्यात येतात. तुम्ही स्मार्टफोनवरून एखाद्या कामाची नोंद करताच संबंधित कामे करणारा कामगार तुमच्या घरी पाठवण्यात येतो. तुमच्या सोयीच्या वेळेत येऊन तो ते काम पूर्ण करतो. विशेष म्हणजे, या कामगाराला थेट पैसे न देतान paytm walletच्या माध्यमातून तुम्ही अतिशय सुरक्षितपणे त्या सेवेचा मोबदला देता. याशिवाय विविध सेवाकामे करणाऱ्या कामगारांची माहिती या अॅपवर उपलब्ध आहे. त्या माध्यमातून तुम्ही योग्य व्यक्तीची निवड करू शकता. घरातील विद्युत उपकरणांची दुरुस्ती, साफसफाई, पेस्ट कंट्रोल, प्लंबिंगची कामे अशा सेवांसोबतच ब्युटिशियन, नृत्य प्रशिक्षक, इंटीरिअर डिझायनर या सेवांचाही अॅपच्या माध्यमातून लाभ घेता येतो. प्रत्येक कामाचे पैसे आधी ठरवले जात असल्याने घासाघीस करण्याचा किंवा जास्त पैसे उकळण्यात येण्याचा प्रश्नच उरत नाही. प्रत्येक कामगाराची माहिती अॅपवर उपलब्ध असल्याने त्यांच्याकडून दगाफटका होण्याचीही भीती उरत नाही. ही सेवा सध्या मुंबई, नवी मुंबई, पुणे या महाराष्ट्रातील शहरांसह देशातील प्रमुख शहरांत उपलब्ध आहे.

असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2016 1:47 am

Web Title: information and use of mobile apps 2
Next Stories
1 इंग्रजीचा महाकोश
2 ‘सेल्फी’चे सौंदर्य
3 पारंपरिक फोनबुकला पर्याय
Just Now!
X